I made this widget at MyFlashFetish.com.

Sunday, February 15, 2009

शिवकल्याण राजा:-



निश्चयाचा महामेरु....
निश्चयाचा महामेरु, बहुत जनांसी आधारु
अखंडस्थितीचा निर्धारु, श्रीमंत योगी

नरपती, हयपती, गजपती, गडपती, भूपती, जळपती
पुरंदर आणि शक्ती, पृष्ठभागी

यशवंत, किर्तीवंत, सामर्थ्यवंत, वरदवंत
पुण्यवंत, नीतीवंत, जाणता राजा

आचार शील, विचारशील, दानशील, धर्मशील
सर्वज्ञपणे सुशील, सकळांठायी

धीर उदार गंभीर, शूर क्रियेसी तत्पर
सावधपणे नृपवर, तुच्छ केले

देव धर्म गोब्राम्हण, करावया संरक्षण
हृदयस्थ झाला नारायण, प्रेरणा केली

या भूमंडळाचे ठायी, धर्मरक्षी ऐसा नाही
महाराष्ट्र धर्म राहिला काही, तुम्हा कारणे

कित्येक दुष्ट संहारिला, कित्येकांसी धाक सुटला
कित्येकांस आश्रय जाहला, शिवकल्याण राजा.

जय जय शिवराया:-
प्राणी मात्र झाले दुःखी, पाहता कोणी नाही सुखी
कठीण काळे, ओळखी धरीनात कोणी
माणसा खावया अन्न नाही, अंथरुण पांघरुण ते ही नाही
घर कराया सामुग्री नाही, विचार सुचेना काही
अखंड चिंतेच्या प्रवाही, पडले लोक

जय देव, जय देव, जय जय शिवराया
या, या अनन्य शरणां, आर्या ताराया

आर्यांच्या देशावरी म्लेच्छांचा घाला
आला आला सावध हो शिवभूपाला
सदगदीता भूमाता दे तुज हाकेला
करुणारव भेदूनी तव हृदय न का गेला
जय देव, जय देव, जय जय शिवराया

श्रीजगदंबा जी तव शुंभादीक भक्षी
दशमुख मर्दूनी ती श्रीरघुवर संरक्षी
ती पूता भूमाता, म्लेंच्छा ही छळता
तुजविण शिवराया तिज कोण दुजा त्राता
जय देव, जय देव, जय जय शिवराया

त्रस्त आम्ही दीन आम्ही, शरण तुला आलो
परवशतेच्या पाशी मरणोन्मुख झालो
साधुपरित्राणाया, दुष्कृती नाशाया
भगवन भगवदगीता सार्थ कराया या
जय देव, जय देव, जय जय शिवराया.

शिवरायांचा पाळणा:-
गुणी बाळ असा जागसि का रे वांया | नीज रे नीज शिवराया
अपरात्री प्रहर लोटला बाई | तरि डोळा लागत नाही ||

हा चालतसे चाळा एकच असला | तिळ उसंत नाही जिवाला ||
निजयावयाचा हरला सर्व उपाय | जागाच तरी शिवराय ||

चालेल जागता चटका
हा असाच घटका घटका
कुरवाळा किंवा हटका

का कष्टविसी तुझी सांवळी काया | नीज रे नीज शिवराया ||१ ||
ही शांत निजे बारा मावळ थेट | शिवनेरी जुन्नर पेठ ||
त्या निजल्या ना तशाच घाटाखाली | कोकणच्या चवदा ताली ||
ये भिववाया बागुल तो बघ बाळा | किति बाई काळा काळा ||

इकडे हे सिद्दीजवान
तो तिकडे अफझुलखान
पलिकडे मुलूख मैदान

हे आले रे तुला बाळ धराया | नीज रे नीज शिवराया || २ ||

आरती संग्रह:-

श्री गणप‍‍तीची आर‍‍ती:-
सुखकर्ता दुःखकर्ता वार्ता विघ्नाची।
नुरवी पुरवी प्रेम कृपा जयाची ।
सर्वांगी सुंदर उटी शेंदुराची ।
कंठी झळके माळ मुक्ताफळाची ।।1।।
जय देव जय देव जय मंगलमूर्ती ।
दर्शनमात्रे मनकामना पुरती ।।धृ।।
रत्नखचित फरा तूज गौरीकुमरा ।
चंदनाची उटी कुंकुमकेशरा
हिरे जडित मुकुट शोभतो बरा
रूणझुणती नुपुरे चरणी घागरिया ।।२ ।।
लंबोदर पीतांबर फ‍ण‍ीवरवंदना ।
सरळ सोंड वक्रतुंड त्रिनयना ।
दास रामाचा वाट पाहे सदना ।
संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवंदना ।
जय देव जय देव जय मंगलमूर्ती ।
दर्शनमात्रे मनकामना पुरती ।।

देवीची आरती:-
दुर्गे दुर्घट भारी तुजविण संसारी।
अनाथ नाथे अंबे करुणा विस्तारी।
वारी वारी जन्म मरणांते वारी।
हारी पडलो आता संकट निवारी॥१॥

जय देवी जय देवी महिषा सुरमथिनी।
सुरवर ईश्र्वर वरदे तारक संजीवनी॥धृ॥

तुजवीण भुवनी पाहता तुज ऐसे नाही।
चारी श्रमले परंतु न बोलवे काही।
साही श्रमले परंतु न बोलवे काही।
साही विवाद करिता पडले प्रवाही।
ते तू भक्तालागी पावसी लवलाही॥२॥

प्रसन्न वदने प्रसन्न होती निजदासा।
क्लेशांपासूनी सोडवी तोडी भवपाशा।
अंबे तुजवाचून कोण पुरवील आशा।
नरहरी तल्लीन झाला पदपंकजलेशा॥३॥

श्री कृष्णाची आरती:-
ओवाळू आरती मदनगोपाळा । श्यामसुंदरा गळा वैजयंतीमाळा ।।ध्रु।।
चरणकमल ज्याचे ति सुकुमार । ध्वजवज्राकुश ब्रीदाचे तोडर ।। ओवाळू।।1।।
नाभिकमल ज्याचे ब्रह्मचर्याचे स्थान । हृदयी पदक शोभे श्रीवत्सल छान ।। ओवाळू।।2।।
मुखकमल पाहता सुखिचिया कोटी । वेधले मानस हारपली दृष्टी ।। ओवाळू।।3।।
जडित मुगट ज्याचा देदीप्यमान । तेणे कोंदले अवघे त्रिभुवन ।। ओवाळू।।4।।
एका जनार्दनी देखियले रूप । पाहता जाहले अवघे तद्रूप ।ओवाळू।।5।।

श्री विठ्ठल आरती :-
युगे अठ्ठावीस विटेवर उभा ।
वामांगी रखुमाई दिसे दिव्य शोभा।
पुंडलिकाचे भेटी परब्रम्ह आले गा ।
चरणी वाहे भीमा उद्धरी जगा ।

जयदेव जयदेव जय पांडुरंगा ।
रखुमाईवल्लभा राईच्या वल्लभा पावे जीवलगा ।। धृ ।।

तुळसी माळा गळा कर ठेवुनि कटी ।
कासे पितांबर कस्तुरी लल्लाटी ।
देव सुरवर नित्य येती भेटी ।
गरूड हनूमंत पुढे उभे राहती ।। जय देव ।।

धन्य वेणुनाद अनुक्षेपत्रपाळा ।
सुवर्णाची कमळे वनमाळा गळा ।
राई रखुमाबाई राणीया सकळा ।
ओवाळिती राजा विठोबा सावळा ।। जय देव ।।

धन्य पुष्पावती भीमासंगम ।
धन्य वेणूनाद उभे परब्रम्ह ।
धन्य पुंडलिक भक्त निर्वाण ।
यात्रेसी येती साधु सज्जन ।। जय देव ।।

ओवाळू आरत्या कुरवंड्या येती ।
चंद्रभागेमध्ये सोडुनिया देती ।
दिंड्या पताका वैष्णव नाचती ।
पंढरीचा महिमा वर्णावा किती ।। जय देव ।।

आषाढी कार्तिकी भक्तजन येती ।
चंद्रभागेमध्ये स्नान जे करती ।
दर्शन हेळामात्रे तया होय मुक्ती ।
केशवासी नामदेव भावे ओवाळिती ।। जय देव ।।
- संत नामदेव

तुळशीची आरती:-
जय देवी जय देवी जय माय तुळशी।
निजपत्राहुनि लघुतर त्रिभुवन हे ‍तुळशी ।।धृ।।
ब्रम्हा केवळ मुळी मध्ये तो शौरी।
अग्री शंकर तीथे शाखा परिवारी।।
सेवा करिती भावे सकळहि नरनारी।
दर्शनमात्रे पापें हरती निर्धारी।।१।।

शीतळ छाया भूतळव्यापक तूं कैसी।
मंजिरीची बहु आवड कमळारमणासी।।
तव दलविरहित विष्णू राहे उपवासी।
विशेष महिमा तुझा शुभ कार्तिकमासी।।२।।

अच्युत माधव केशव पीतांबरधारी।
तुझिया पूजनकाळी जो हे उच्चारी।।
त्यासी देसी संतति संपति सुखकारी।
गोसावीसुत विनवी मजला तू तारी।।३।।

घालिन लोटांगण:-
घालीन लोटांगण वंदीन चरण ।
डोळ्यांनी पाहिन रूप तुझे ।
प्रेमें आलिंगीन आनंद पूजन ।
भावे ओवाळिन म्हणे नामा ।।

त्वमेव माता पिता त्वमेव ।
त्वमेव बन्धु: सखा त्वमेव ।
त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव ।
त्वमेव सर्वं मम देवदेव ।।

कायेन वाचा मनसेंद्रियैर्वा ।
बुध्यात्मना वा प्रकृति स्वभावात् ।
करमि यद्यत् सकलं परस्मै ।
नारायणायेती समर्पयामि ।।

अच्युतं केशवं राम नारायणम्
कृष्णदामोदरं वासुदेवं भजे।
श्रीधरं माधवं गोपिकावल्लभम्
जानकीनायकं रामचंद्र भजे ।।

हरे राम हरे राम राम राम हरे हरे
हरे कृष्ण हरे कृष्ण कृ्ष्ण कृ्ष्ण हरे हरे ।।

।। मंगलमुर्ती मोरया ।।
।। गणपतिबाप्पा मोरया ।।

हनुमंताची आरती:-
सत्राणें उड्डाणें हुंकार वदनी ।।
करि डळमळ भूमंडळ सिंधुजळ गगनी ।।
गडबडिलें ब्रम्हांड धाके त्रिभुनवी ।।
सुरवर नर निशाचर त्या झाल्या पळणी ।। १ ।।

जय देव जय देव जय हनुमंता ।।
तुमचेनी प्रसादें न भी कृतांता ।। जय।। धृ ।।

दुमदुमली पाताळें उठिला प्रतिशब्द ।।
थरथरिला धरणीधर मानीला खेद ।।
कडकडिले पर्वत उडुगणउच्छेद ।।
रामी रामदासा शक्तपचा शोध ।।
जय देव जय देव जय हनुमंता ।। २ ।।

श्री महालक्ष्मीची आरती:-
जय देवी जय देवी जय महालक्ष्मी
वससी व्यापकरूपे राहे निश्चलरूपे तू स्थूलसुक्ष्मी. जय.....

करवीरपूर वासिनी सुरवर मुनिमाता
पुरहर वरदायिनी मुरहर प्रियकांता
कमलाकारे जठरी जन्मविला धाता
सहस्त्र वदनी भूधर नपुरे गुणगाता. जय.....

मातुल्लिंग गदा खेटक रविकिरणी
झळके हाटकवाटी पीयुष रसपाणि
माणिक रसना सुरंग वसना मृगनयनी
शशीकर वदना राजस मदनाची जननी. जय......

तारा शक्ती अगम्या शीवभजका गौरी
सांख्य म्हणती प्रकृती निर्गुण निर्धारी
गायत्री नीजबीजा निगमागमसारी
प्रगटे पद्मावती निजधर्माचारी. जय.....

अमृत भरिते सरिते अघदुरिते वारी
मारी दुर्घट असुरा भवदुस्तर तारी
वारी माया पटल प्रणमत परिवारी
हे रूप चिद्रुप दावी निर्धारी. जय.....

चतुराननाने कुश्चित कर्मांच्या ओळी
लिहिल्या असतिल माते माझे निजभाळी
पुसोनि चरणातळी पदसुमने क्षाळी
मुक्तेश्वर नागर क्षीरसागर बाळी. जय.....

मंत्र पुष्पांजली:-
ॐ यज्ञेन यज्ञमयजन्त देवास्तनि धर्माणि प्रथमान्यासन् ।
ते ह नाकं महिमान : सचंत यत्र पूर्वे साध्या : संति देवा : ।।
ॐ राजाधिराजाय प्रसह्य साहिने ।
नमो वयं वैश्रवणाय कुर्महे ।
स मस कामान् काम कामाय मह्यं।
कामेश्र्वरो वैश्रवणो ददातु कुबेराय वैश्रवणाय ।
महाराजाय नम: ।
ॐ स्वस्ति। साम्राज्यं भौज्यं स्वाराज्यं
वैराज्यं पारमेष्ठ्यं राज्यं महाराज्यमाधिपत्यमयं
वैराज्यं पारमेष्ठ्यं राज्यं महाराज्यमाधिपत्यमयं
समंतपर्यायीस्यात् सार्वभैम: सार्वायुष आं
तादापरार्धात् पृथिव्यै समुद्रपर्यंताया एकेराळिति
तदप्येष: श्लोको भिगीतो मरूत: परिवेष्टारो
मरूतस्यावसन् गृहे ।
आविक्षितस्य कामप्रेर्विश्र्वेदेवा: सभासद इति ।।

एकदंतायविघ्महे वक्रतुण्डाय धीमहि ।
तन्नोदंती प्रचोदयात् ।

मंत्रपुष्पांजली समर्पयामि ।।
।। गणपतिबाप्पा मोरया ।।

श्री गजानन महाराजांचे शेगाव:-


शेगावमधली ती भर उन्हाळ्यातील दुपार होती. रणरणतं ऊन आसमंतात व्यापलं होतं. तेवढ्यात एका वडाच्या झाडाखाली एक विचित्रसा वाटणारा पण तेजःपुंज तरुण फेकून दिलेल्या पत्रावळीवरील अन्नाची शीत वेचून खात होता. त्याच्या तोंडातून 'गण गण गणात बोते' असा नामघोष चालला होता. त्या नामघोषात त्या तरुणाला रणरणत्या उन्हाचंही काही वाटत नव्हतं. गजानन महाराजांच पहिलं दर्शन असं झालं. बंकटलाल आणि दामोदर या दोघा तरुणांनी महाराजांना प्रथम पाहिलं आणि त्यांच्या त्या विचित्र वागण्यापेक्षाही त्यांच्या चेहर्‍यावरच्या तेजस्वी भावानेच हे त्यांच्याकडे आकर्षित झाले.

हे कोणी दिव्य पुरूष आहेत, याची त्यांना खात्री पटली. म्हणून ते त्यांना गावात घेऊन आले. लोकही त्यांना पाहायला गर्दी करू लागले. त्यांना पंचपक्वान्न, कपडे, दागिने असे काही वाहायला लागले. महाराज निरिच्छपणे ते सगळं फेकून देत असत. त्यांच्या वागण्याचा अदमास कुणालाही येत नसे. ते कुठेही झोप. काहीही खात आणि कपडे घातले तर घातले नाही तर दिगंबरावस्थेतही ते असत.

जगापासून ते स्वतःला तोडण्याचा प्रयत्न करत असत. भौतिक जगतात त्यांचे मन अजिबात रमत नव्हते. पण त्यांच्या विक्षिप्तपणाआड एक अतिशय विद्वान दिव्य पुरूष लपला आहे, याची जाणीवही हळू हळू होऊ लागली. त्यांच्या वेदशास्त्रसंपन्नतेचा दाखला लोकांनाही मिळाला. त्यांची तपश्चर्याही मोठी असल्याची जाणीव लोकांना झाली. त्यांच्यातला योगीही दिसून आला. एवढेच नव्हे, तर प्राण्यांची भाषाही या अवलियाला येत होती, हेही लोकांना कळले.

त्यांची कीर्ती सगळीकडे पसरू लागल्यानंतर मोठमोठी मंडळी त्यांना भेटायला येऊ लागली. दस्तूरखुद्द लोकमान्य टिळकांनीही त्यांची भेट घेतली होती. अकोल्यात शिवजयंतीसंदर्भात झालेल्या एका सभेला, टिळकांबरोबर गजानन महाराजही व्यासपीठावर बसले होते. लोकमान्य आणि अमरावतीचे दादासाहेब खापर्ड्यांसमवेत ते अकोल्यातील प्रभू रामचंद्राच्या मंदिरात दर्शनालाही गेले होते. श्री वासुदेवानंद सरस्वतीही महाराजांना भेटायला शेगावला आले होते. शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रातील अनेक मंडळी महाराजांना भेटायला येऊ लागली.

सिद्ध योगी असल्याने अनेक चमत्कारही ते करत. अत्यंत कनवाळू असल्याने कुणाचं दुःख त्यांना पाहवत नसे. खरे तर त्यांच्याकडे येणारी गांजलेली मंडळी त्यांना पाहताच आपलं दुःख विसरून जात असत. महाराज त्यांना त्यांच्या दुःखावर उपाय सांगत असत. लोकांच्या दुःखा ची नस त्यांना चांगलीच कळलेली असे. त्यामुळे त्यांच्या सल्ल्याने त्या व्यक्तीचं भलं झाल्याशिवाय राहत नसे. त्यामुळे लोक भक्तिभावाने त्यांच्याकडे येत.

महाराजांची कीर्ती पुढे वाढतच गेली. विदर्भात तर घरांघरांत ते माहीत होते. पण उर्वरित महाराष्ट्रात आणि शेजारच्या राज्यातही त्यांची कीर्ती वाढत गेली. विदर्भात तर महाराजांना नैवेद्य दाखविल्याशिवाय न जेवणारी मंडळी आजही आहेत. अनेकांनी त्यांना आपले गुरू मानले व त्यांची पूजा सुरू केली. महाराष्ट्रभर त्यांची मंदिरं स्थापली गेली.

महाराजांची कीर्ती वाढत गेल्यानंतर त्यांनी स्वतःच आपल्या शिष्यांना ट्रस्ट स्थापन करायला सांगितला. त्यानंतर मग गजानन महाराज संस्थान या नावाने १९०८ मध्ये ट्रस्ट स्थापन झाला. या ट्रस्टच्या माध्यमातून अनेक सामाजिक कामे केली जाऊ लागली. हे कार्य आजही चालू आहे. हिंदूच्या अनेक धर्मस्थळी या ट्रस्टच्या उत्तम सुविधा असलेल्या धर्मशाळा आहेत.

हे सगळं करत असताना महाराजांचे भौतिक जगातील लक्ष उडून गेले होते. एके दिवशी त्यांनी पंढरपूरला आषाढी एकादशीला समाधी घेण्याच निर्णय जाहीर केला. त्यांच्या या निर्णयाने भक्तांना मोठा धक्का बसला. दुःखाची एक लाटच पसरली. भक्तांनी त्यांना समजविण्याचा खूप प्रयत्न केला. पण महाराज निर्णयावर ठाम होते. त्यांनी समाधीपूर्वी दीड महिना आधी आपल्या मृत्यूचा दिवस आणि वेळ सांगितली होती. शिवाय आपली समाधी कुठे बांधावी हेही सांगितले होते.

त्यानुसार भाद्रपद शुद्ध पंचमीचा अर्थात ऋषी पंचमी, शके १८३२, गुरुवार दिनांक ८ सप्टेंबर १९१० रोजीचा तो दिवस उजाडला. या दिवसावरच एक काळे सावट होते. दुःखाची सावली जणू पडली होती. ठरवल्याप्रमाणे महाराजांनी या दिवशी समाधी घेतली आणि अवघ्या महाराष्ट्राच्या दुःखाला पारावर उरला नाही. भक्तांना सैरभैर झाल्यासारखं झालं. जीवनात जणू 'राम' राहिला नाही, असं वाटलं. कारण एक चैतन्य अनंतात विलीन झालं होतं. त्यांच्या समाधीच्या दर्शनासाठी भक्तांचा जणू सागर शेगावात उसळला. भक्तच काय पण महाराजांचं ज्या पशूपक्ष्यांवर प्रेम होतं, तेही रडत असल्याचे सांगितले जाते.

पण तिकडे महाराजांच्या मुखावर मात्र नेहमीचंच हास्य होतं. निर्वाणाला गेलेल्या अवलियाने जाताना मात्र सगळ्यांना सुखाचा समाधानाचा आणि मुक्तीचा मंत्र सांगितला होता. हा मंत्र होता,
अर्थातच 'गण गण गणात बोते. गण गण गणात बोते.'
जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती असे म्हटलेच जाते. शेगावचे श्री गजानन महाराजही त्यातलेच एक. शेगाव येथे त्यांचे समाधी मंदिर आहे.

श्री गजानन महाराज दिगंबर वृत्तीचे सिद्ध कोटीचे साधू होते. मिळेल ते खाणे, मिळेल त्या जागी राहणे, नेहमी भ्रमण करणे अशी त्यांची नित्याचीच दिनचर्या होती. त्यांच्या मुखात परमेश्वराचेच नामस्मरण, भजन असायचे.

भक्तांची संकटे दूर करून त्यांना परमेश्वराचे दर्शन घडवून देण्याचे शेकडो उदाहरणे त्यांच्या चरित्रात सामील आहेत. महाराष्ट्रातील प्रमुख तीर्थस्थानांमध्ये गणले जाणारे शेगाव स्थित गजानन महाराजांच्या मंदिरात दर्शनासाठी नेहमीच भाविक गर्दी करतात.

कसे पोहचाल?
महाराष्ट्राच्या बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव, सेंट्रल रेल्वेच्या मुंबई-नागपूर मार्गावर आहे. गीतांजली एक्सप्रेस सोडून इतर सर्व रेल्वेगाड्या येथे थांबतात. स्टेशनच्या बाहेरून मंदिरापर्यंत पायी गेल्यास फक्त 15 मिनिटाचा रस्ता आहे.

स्टेशनपासून मंदिरापर्यंत येण्या-जाण्यास मोफत बससेवा उपलब्ध आहे. महाराष्ट्रातून येथे 172 बस येतात. त्या व्यतिरिक्त देवास-उज्जैन, पैठण, पंढरपूर या स्थानकांहूनही बस चालतात.


श्री गजानन महाराजांचे मंदिर शहराच्या मधोमध स्थित आहे. मंदिराच्या महाद्वाराच्या खिडक्या रात्रभर उघड्याच असतात. श्रींची समाधी मंदिराच्या गुहेत आहे. मंदिर परिसरात वर्षभर भजन आणि प्रवचन असते. रोज सकाळी पाच वाजेपासून रात्री 9.30 पर्यंत पूजा-अर्चना विधिवत चालते. काकड आरती ते शयन आरतीपर्यंत नियमित रूपाने विविध कार्यक्रम चालतात.

प्रमुख उत्सव:-
श्री गजानन महाराजांचा प्रकट दिवस (फेब्रुवारी महिन्यात) तसेच त्यांची पुण्यतिथी (ऋषी पंचमीला) हे येथील प्रमुख उत्सव आहेत. त्यावेळी येथे रोषणाई केली जाते. श्रींची हत्ती, घोडा, रथ पालकी, दिंडी इत्यादींसोबत मिरवणूक निघते.

राहण्यासाठी व्यवस्था:-
भाविकांच्या सुविधेसाठी भव्य 'भक्त निवास' मंदिर परिसरातच बांधले आहे. त्याठिकाणी अगदी स्वस्तात खोल्या मिळतात. भाविक पाच दिवसांपेक्षा जास्त दिवस या खोल्यांमध्ये राहू शकत नाहीत. त्या ठिकाणी भोजन कक्षेचीही व्यवस्था आहे. सकाळी अकरा ते एक पर्यंत महाराजांचा प्रसाद दिला जातो. रोज येथे जवळपास पाच हजारांवर लोक जेवण करतात. या मंदिरात दररोज वीस हजार भाविक दर्शनासाठी येतात.

अन्य आकर्षण:-
शहराच्या झगमगाटापासून लांब असलेल्या शेगावात साधे आणि महाराष्ट्रातील ग्रामीण जीवनाच्या सहजतेची झलक पाहावयास मिळते. आध्यात्मिक शांतीच्या शोधात असणार्‍या भाविकांसाठी हे ठिकाण सर्वोत्तम आहे. मंदिराच्या परिसरातच धार्मिक वाचनालय असून भाविकांसाठी सतत खुले असते. जवळच 'गजानन वाटिका' नावाचे सुंदर उद्यान आणि एक प्राणी संग्रहालय देखील आहे.

Thursday, February 12, 2009

रामनामाचा मंत्र देणारे श्री ब्रह्मचैतन्य:-



श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचा १६४ वा जन्मोत्सव आज (ता. ६ फेब्रुवारी) सर्वत्र मोठ्या भक्तिभावाने होत आहे. त्यानिमित्ताने श्री गोंदवलेकर महाराज यांचे रामनाम आणि रामप्रेम यावर प्रकाश टाकणारा लेख...

मानवी जीवनाच्या इतिहासात तिच्या संस्कृतीचा विचार करताना तो दोन अंगांनी केला जातो. बहिरंग आणि अंतरंग ही ती दोन अंगे आहेत. यापैकी व्यक्‍तीच्या श्रेष्ठत्वामध्ये बहिरंगापेक्षा अंतरंग अधिक महत्त्वाचे ठरते. संत परंपरेनेच अवलोकन केले तर असे दिसेल, की बहिरंगाच्या वैभवापेक्षाही अंतरंगाची श्रीमंती त्यांची अधिक होती. श्री क्षेत्र गोंदवले (जि. सातारा) येथे जन्माला आलेले, तीच कर्मभूमी केलेले आणि अखेरीस तेथेच चिरविश्रांती घेतलेले श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज आज लाखो भक्‍तांचे श्रद्धास्थान आहेत. सदगुरू आहेत.

समर्थ रामदासांप्रमाणे प्रभू रामचंद्रांवर श्री ब्रह्मचैतन्यांची आत्यंतिक प्रीती होती. त्यांचे सदगुरू श्रीतुकामाई यांनी श्री ब्रह्मचैतन्यांना अनुग्रह दिल्यावर, तसेच तो प्राप्त होण्याच्या आधीपासूनच श्रीमहाराज रामनामात मग्न होत असत. अखंडपणे जणू काही रामनाम हा त्यांचा श्‍वासच झालेला होता. नामात एका आनंदाशिवाय दुसरे काही नाही, ही त्यांची ठाम भूमिका होती. आमच्या शास्त्रकारांनी वर्तमान कलियुगात अन्य कोणत्याही साधनेपेक्षा भगवंतांचे नामस्मरण करणे अधिक सोपे आणि सहज आहे, असे सांगितलेले आहे. श्री ब्रह्मचैतन्य महाराजांनी याच शास्त्र विचारांना अनुसरून अनेकांना नामस्मरणाचे महत्त्व पटवून दिले. त्यांना नामाला लावले. भगवंतांकडे वळवले.

पारमार्थिक मार्गदर्शन

श्री ब्रह्मचैतन्यांच्या कार्याचे आणखी वैशिष्ट्य म्हणजे, त्यांनी मध्यमवर्गीय सामान्य प्रापंचिक माणूस सतत आपल्यासमोर ठेवला. त्याच्या जीवनातील दैनंदिन आणि प्रासंगिक अडीअडचणी समजून घेतल्या. त्या लक्षात घेत त्यांनी पारमार्थिक मार्गदर्शन केले. विकार नाहीसे न करता त्यांना ताब्यात ठेवण्याची किंवा प्रसंगी भगवंताकडे वळविण्याची भूमिका श्री गोंदवलेकर महाराज सतत मांडत असत.

विकारांना किंवा वासनेला नियंत्रित करण्यासाठी नामासारखे दुधारी शस्त्र नाही, अशी त्यांची धारणा होती. श्री गोंदवलेकर महाराज यांनी लहानपणापासूनच त्यांच्या ठिकाणी श्रीरामरायाबद्दल अनुराग होता. श्रीराम चरणी ते इतके विनम्र झाले होते, की या विश्‍वातील कोणतीही गोष्ट श्रीरामचंद्रांच्या इच्छेने घडते, असे त्यांचे ठाम सांगणे होते. श्रीरामाला कर्तेपण द्या, असा त्यांचा आग्रह होता. आपल्या ६८ वर्षांच्या जीवन काळात श्रीमहाराजांनी जवळजवळ ३० राममंदिरे उभारली. मंदिरांच्या निर्मितीमध्ये त्यांची संकल्पना नेहमीपेक्षा काहीशी वेगळी होती. मंदिर हे अध्यात्म विद्येचे केंद्र असावे, प्रापंचिकाला त्याच्या दुःखाचा काही काळ विसर पडावा, भगवंताच्या अस्तित्वाची जाणीव व्हावी, अशा स्वरूपाचे त्यांचे मंदिराबद्दल विचार होते.

श्रीरामांवर त्यांचे विलक्षण प्रेम होते. श्रीरामांवर आत्यंतिक श्रद्धा होती. श्रीक्षेत्र गोंदवले येथील श्रीरामाच्या मूर्तीतून तीन वेळा अश्रुपात झाल्याचा उल्लेख श्रीमहाराजांच्या चरित्रात आहे. यावरून त्यांचे रामप्रेम लक्षात येते. श्रीरामांबरोबर रामनामाचे श्रेष्ठत्वही ते तितक्‍याच आग्रहाने मांडत. "श्रीराम जयराम जय जय राम', या तारक मंत्राचा अनुग्रह ते अनेकांना देत. या मंत्राचे, त्यातील अक्षरांचे सामर्थ्य ते पटवून देत. या मंत्रात १३ अक्षरे आहेत. या प्रत्येक अक्षरावर एक याप्रमाणे १३ अभंग श्री महाराजांनी रचलेले आहेत. ""श्रीराम म्हणा मुखी राम म्हणा मुखी। तेणे सर्व सुखी होशील तू।।'' या ध्रुवपदाने हे अभंग म्हटले जातात. या १३ अभंगांतून रामनामाला असलेला वेदांचा आधार, कलियुगातील सोपे साधन, मनाची एकाग्रता, प्रपंच, दुःख आणि त्या दुःखाची निवृत्ती, रामनामाचे तारकत्व आदी अनेक विचारांचे मनोज्ञ दर्शन घडते. श्री महाराजांच्या प्रज्ञेचे सामर्थ्य अनुभवाला येते.

""श्रीराम जयराम जय जय राम'' हा तारक मंत्र स्वतः श्रीरामाने सीतेला दिला आणि हनुमंताला दिला, असे श्रीमहाराज सांगत. अनेकांना या मंत्राच्या साधनेने परम अधिकारी बनवले. या मंत्राचा एक अर्थ सिद्धांच्या दृष्टीने "मी रामस्वरूप आहे', असा होतो, तर साधकांच्या दृष्टीने "राम माझा स्वामी आहे, रक्षणकर्ता आहे, माझ्या हृदयात आहे', असे श्रीमहाराज सांगत.

या मंत्रातील शब्दांवरही श्रीमहाराज बोलताना एकदा म्हणाले, ""श्रीराम म्हणजेच पुरुषोत्तम. म्हणजेच सगुण आणि निर्गुण परमात्मा. जयराम म्हणजे सर्वत्र त्या पुरुषोत्तमाचाच जय आहे. तोच कर्ता आहे. त्याचीच शक्‍ती विश्‍वात कार्य करते, तसेच जय जय राम म्हणजे परमात्मा आतबाहेर कल्याणमय आहे. त्या कल्याणापर्यंत पोचण्याचा प्रयत्न आपण करावा. त्याचा जयजयकार करावा. श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांनी अशारीतीने राममंत्राचा अर्थही उलगडलेला आहे. या रामनामात आपण सतत राहावे. प्रपंच करतानाही रामनामात प्रपंच करावा, ही त्यांची विचारसरणी होती. अन्य कोणत्याही सुखापेक्षा समाधान आणि आनंद याला ते अधिक महत्त्व देतात.

श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या उपदेशानुसार खरोखर जो कोणी रामनामात राहिल, तो जीवनात आनंदी आणि समाधानी राहील, हे निर्विवाद सत्य आहे. श्रीमहाराजांच्या जन्मोत्सवाचे निमित्ताने त्यांना श्रद्धेय वंदन.

- लक्ष्मीकांत जोशी, नाशिक

Monday, February 9, 2009

प्रार्थना:-

*गायत्री मंत्र:-
ऒम भूर्भुव:स्व:ऒम तत्सवितुर्वरेण्यंभर्गोदेवस्य धीमहि । धियोयोन:प्रचोदयात॥

*गणपती:-
वक्रतुंड महाकाय सूर्यकोटिसमप्रभ ।
निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा ॥

*सरस्वती प्रार्थना:-
याकुन्देतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रावृताया वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना।
या ब्रम्हाच्युतशंडकरप्रभृतिभिर्देवे सदा वन्दितासा मां पातु सरस्वती भगवती नि:शेषजाड्या पहा॥

*हात पाहून म्हणावयाचा श्लोक:-
कराग्रे वसते लक्ष्मी : करमुले सरस्वती ।करमध्ये तु गोविन्द : प्रभाते करदर्शनम॥

*सायंप्रार्थना:-
(संध्याकाळी देवासमोर दिवा लावून म्हणावयाची प्रार्थना)
शुभं करोति कल्याणं आरोग्यं धनसंपदा ।शत्रुबुध्दीविनाशाय दीपज्योति नमोऽस्तुते॥

*भोजनश्लोक:-
वदनि कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे सहज हवन होते नाम घेता फ़ुकाचे ।
जीवन करी जिवित्त्वा अन्न हे पूर्णब्रम्हउदरभरण नोहो जाणिजे यज्ञकर्म ।

*गुरुवंदना:-
गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु: गुरुर्देवो महेश्वरा :गुरु: साक्षात परब्रह्म तस्मै श्रीगुरुवे नम:॥

*मनाचा श्लोक:-
मना वासना दुष्ट कामा नये रे मना सर्वथा पापबुध्दी नको रे।
मना धर्मता नीती सोडू नको होमना अंतरी सार विचार राहो॥

*सुर्यनमस्काराचे मंत्र:-
ऒम मित्राय नम: ऒम खगाय नम:।
ऒम आदित्याय नम:।ऒम रवये नम:।
ऒम पूष्णे नम:।ऒम सविते नम:।
ऒम सूर्याय नमं:। ऒम हिरण्यगर्भाय नम:।
ऒम अर्काय नम:।ऒम भानवे नम:।
ऒम मरीयचे नम:। ऒम भास्कराय नम: ।
ऒम श्रीसवितृसूर्यनारायणाय नम:

Friday, February 6, 2009

राशींच्या संदर्भात माहिती :-

राशींचे तत्व:-
पृथ्वी तत्व :- वृषभ, कन्या, मकर
जल तत्व :- कर्क, वृश्चिक, मीन
अग्नी तत्व :- मेष, सिंह, धनू
वायू तत्व :- मिथून, तुळ, कुंभ

राशीचे रंग:-
मेष- लाल
वृषभ- हिरवा
मिथून- फिक्कट हिरवा
कर्क -लालभडक, पांढरा
सिंह -पिवळा
कन्या -हिरवा
तूळ -नीळा, काळा
वृश्चिक -सोनेरी
धनू -पिवळा
मकर -विटकरी, तांबूस
कुंभ -काळा
मीन फिकट पांढरा

राशीनुसार मुख्य दाराची दिशा:-
मीन, कर्क, वृश्चिक -उत्तर
मेष, सिंह, धनू -पूर्व
वृषभ, कन्या, मकर -दक्षिण
कुंभ, तुळ, मिथून -पश्चिम

राशी अंकात:-
पूर्व -1,5,0,9
दक्षिण- 2,6,10
पश्चिम -3,7,11
उत्तर -4,8,12

जन्मपत्रिकेचे महत्त्व:-

जन्मपत्रिकेच्या मदतीने चालू जीवनातील नियतीला आपण जाणून घेऊ शकतो. जे नशिबात आहे ते बदलता येत नाही पण माणूस आपल्या काय घडणार आहे, हे जाणून घेऊन त्यात सुधारणा करू शकतो. संचितापेक्षा चालू कर्म श्रेष्ठ असतील तर माणसाचे भाग्य बदलू शकते. म्हणून चालू वर्तमान जीवनात चांगले काम करण्यासाठी आणि जीवन कर्मांचे चांगले फळ मिळविण्यासाठी ज्योतिषशास्त्र आवश्यक आहे.

जन्म-नक्षत्र, राशी, जन्म-पत्रिका व त्यांचे योग याचे विश्लेषण करून व्यक्तीचा स्वभाव, प्रकृती, रंग व चांगल्या वाईट वेळेबरोबर भूत, भविष्य, वर्तमान यांना जाणून घेता येते. त्याच्या मदतीने आपण जमिनीवर दिशेची निवड, मुख्य चौकट बसवणे, रंगाची निवड, घराची बांधणी, गृहप्रवेश या गोष्टी ठरवू शकतो. वास्तुशास्त्राचे सिद्धांच आणि नियमानुसार बांधणी आणि त्याचे परिणाम यासाठी जन्मपत्रिकेचे विश्लेषण आवश्यक आहे.

जन्मपत्रिका बनवणे :-
जन्मपत्रिका तयार करणे गणिती काम आहे. ही माहिती ज्योतिष्याचा कोणत्याही पुस्तकात मिळते. म्हणून या गोष्टीचे विश्लेषण येथे केलेले नाही. हल्ली कॉम्प्युटरवर सोप्या पद्धतीने जन्मकुंडली तयार केली जाते. कॉम्प्युटर वर योग्य पंचांगांच्या मदतीने सॉफ्टवेअर बनवले असेल तर योग्य जन्मवेळ, जन्म तारीख, जन्म ठिकाण दिले गेले तर पत्रिकेत त्रुटींची शक्यता कमी होते.

जन्मपत्रिकेचा व ज्योतिषशास्त्र तसेच वास्तुशास्त्राचा परस्परसंबंध आहे. व्यक्तीचे नाव, जन्मवेळ, जन्मतारीख, जन्मठिकाण यांच्या मदतीने पत्रिका बनवली जाते. यात जातकाच्या नावापासून आशय जातकाचे कुटुंब, वर्ण, संस्कार आणि वर्णानुसार आई-वडिलांच्या व्यवसायाशीही संबंध देतात. जन्मवेळ आणि जन्मतारखेत संपूर्ण कालचक्र म्हणजेच ज्योतिषाचा समावेश होतो. जातकाच्या जन्म ठिकाणापासून आशय जातकाचा जन्म कुठल्या ठिकाणी झाला आहे तो किती अक्षांशावर राहतो ही सर्व माहिती वास्तुशास्त्रातील आहे.
- डॉ. सुधीर पिंपळे

Thursday, February 5, 2009

वास्तुशास्त्राचे नियम:-

प्राचीन ऋषी-मुनी व शिल्पकार यांनी वास्तुपुरुषाची स्थिती लक्षात ठेवून वास्तु रचना करण्याचे निर्देश दिले आहेत। वास्तू देवतेच्या कोपापासून वाचण्यासाठी आणि जीवनात सुखसमृद्धी आणण्यासाठी या निर्देशांचे पालन केले पाहिजे. या शास्‍त्रांच्या विपरित वास्तु बांधल्यास तीथ रहाणार्‍यांना त्रास होतो. अशावेळी घरात जे वास्तु संमत नाही त्यात बदल करून ती वास्तु रहाण्यास अनुकूल बनवू शकता. त्यासाठी खालील उपाय करा. (वास्तुशांति करून घेणे.)
*घरापुढे, मागे, आजूबाजूला खड्डा असेल तर तो लवकरात लवकर भरा।
* घरासमोर कचर्‍याचा ढिगारा असेल, न लागणारी सामग्री ठेवली असेल किंवा चिखल व घाण पाणी साठले असेल तर ते लगेचच साफ करायला हवे। घरासमोर स्वच्छ जागा असणे चांगले।
* किचन किंवा डायनिंग रूम घराच्या पश्चिमेकडे नसेल तर आणि ती जागा बदलणे शक्य नसले तर जेवण करताना तोंड उत्तर, पूर्व किंवा पश्चिमेकडे असावे।
* घरातील नैऋत्य कोपरा (दक्षिण-पश्चिम) कधीही रिकामा ठेवू नये। तेथे वजनदार सामान ठेवले पाहिजे.
* घरात पाणी साठवण्याचे स्थान उत्तर, पूर्व किंवा ईशान्य (उत्तर-पूर्व कोपरा) दिशेला असेल तर ईशान्य कोपर्‍यातच जमिनीच्या आत पाण्याची लहानशी टाकी बनवावी आणि पाणी पिताना तोंड पूर्व किंवा पश्चिम दिशेत असायला पाहिजे।
* ईशान्य कोपर्‍यात स्वयंपाकघर, बेडरूम किंवा स्टोअर रूम असेल तर ती जागा तातडीने रिकामी करावी। तिथे देवाचे चित्र लावून पूजाअर्चना करा.
* स्वयंपाकघर पश्चिम किंवा दक्षिण दिशेला असेल आणि ते बदलणे शक्य नसेल तर आग्नेय कोपर्‍यात (दक्षिण-पूर्व) गॅस ठेवून तेथेच स्वयंपाक बनवला पाहिजे।
* जड वस्तू उदा। धान्याच्या कोठ्या, मोठी भांडी, लोखंडाच्या जाड वस्तू, रिकामे किंवा भरलेले गॅसचे सिलेंडर, कपाटे, इत्यादी वस्तू पूर्व, उत्तर, ईशान्य कोपर्‍यात ठेवलेल्या असतील तर त्या उचलून नैऋत्य, दक्षिण किंवा पश्चिम दिशेत ठेवायला पाहिजे.
* तिजोरी, कपाट किंवा पुस्तकांच्या कपाटाखाली लोखंड किंवा दगडाचे टेकण लावले असेल तर ते काढून लाकडी टेकण लावायला हवे।
* तिजोरी नेहमी उत्तर दिशेकडे तोंड करून ठेवायला पाहिजे।
* घरात शयनकक्ष वास्तुच्या अनुरूप नसल्यास व त्याला बदलणेही शक्य नसल्यास अविवाहित मुलींनी उत्तर दिशेकडे झोपायला हवे आणि विवाहित जोडप्यांनी पूर्व दिशेच्या शयनकक्षात झोपणे टाळावे।
* ड्रेसिंग रूम नैऋत्य कोपर्‍यात नसेल तर वस्त्र बदलताना नेहमी तोंड उत्तरेकडे असायला हवे।
* घरात आग्नेय, वायव्य, नैऋत्य कोपर्‍यात आणि दक्षिण दिशेला नळ असतील आणि नळाची पाईपलाइनसुद्धा त्याच दिशेत असेल तर घराच्या पूर्व-उत्तर किंवा ईशान्य कोपर्‍यात पाण्याची टाकी बनवून घराच्या नळांमध्ये त्या टाकीतून पाण्याचा पुरवठा करावा।
* स्वयंपाकघर आग्नेय कोपर्‍यात अर्थात दक्षिण-पूर्वच्या कोपर्‍यात नसेल तर दिवसा आणि संध्याकाळी या दिशेला एक दिवा जरूर लावावा.

सुचना:-

देवाच्या दर्शनापूर्वी काय करावे:-
* पादत्राणे देवळाच्या बाहेर शक्यतो आपल्या डाव्या बाजूस काढावीत.* पाय धुण्याची सोय असल्यास पाय धुऊन 'अपवित्र: पवित्रो वा', असे म्हणत स्वत:वर तीनदा पाणी शिंपडावे.* देवळाच्या आवारातून कळसाला नमस्कार करावा.* देवळाकडे जाताना हात नमस्काराच्या मुद्रेत जोडावेत.* देवळाच्या पायऱ्या चढत असताना उजव्या हाताच्या बोटांनी पायरीला स्पर्श करून हात भ्रूमध्या वर लावावा: * देवळात प्रवेश करण्यापूर्वी प्रवेशद्वाराला नमस्कार करावा.* देवळात प्रवेश केल्यावर डाव्या बाजूने गाभाऱ्यापर्यंत चालत जावे (व परतताना उजव्या बाजूने बाहेर पडावे.)

देवतेचे दर्शन कसे घ्यावे?
* देवळातील घंटा अतिशय हळू आवाजात वाजवावी।* देवतेची मूर्ती व तिच्या समोर असलेली कासवाची (शिवाच्या देवळात नंदीची) प्रतिकृती यांच्यामध्ये उभे न राहता किंवा बसता, प्रतिकृतीच्या बाजूला उभे राहून हात जोडून विनम्रतेने दर्शन घ्यावे।* आधी देवतेच्या चरणांशी दृष्टी ठेवून लीन व्हावे। नंतर देवतेच्या छातीशी मन एकाग्र करावे व शेवटी देवतेच्या डोळ्यांकडे पाहून तिचे रूप डोळ्यात साठवावे।* देवतेला अर्पण करावयाची वस्तू (उदा। फुले) देवतेच्या अंगावर न फेकता तिच्या चरणांवर अर्पण करावी. मूर्ती दूर असेल, तर ती वस्तू देवतेसमोरील ताटात ठेवावी.

प्रदक्षिणा:-* प्रदक्षिणा घालण्यापूर्वी देवतेला प्रार्थना करावी।* दोन्ही हात जोडून भावपूर्ण नामजप करत मध्यम गतीने प्रदक्षिणा घालाव्यात।* प्रदक्षिणा घालत असताना गाभाऱ्याला स्पर्श करू नये।* प्रदक्षिणा घालत असताना देवतेच्या पाठीमागच्या बाजूस आल्यावर थांबून, देवतेला नमस्कार करावा।* शक्यतो देवांना सम संख्येने (उदा। 2,4) व देवींना विषम संख्येने (उदा. 1,3) प्रदक्षिणा घालाव्यात.*प्रत्येक प्रदक्षिणा पूर्ण झाल्यानंतर थांबून, देवतेला नमस्कार करून मगच पुढील प्रदक्षिणा घालावी.

प्रदक्षिणेनंतर काय करावे:-
* देवतेला शरणागतभावाने नमस्कार व प्रार्थना करावी.
* उजव्या हातात तीर्थ घेऊन ते प्राशन केल्यावर त्याच हाताचे मधले बोट व अनामिका यांची टोके हाताच्या तळव्याला लावून ती बोटे दोन्ही डोळ्यांना लावावीत व कपाळावरून डोक्यावर वरच्या दिशेने फिरवतीत.
* प्रसाद घेण्यासाठी नम्रतेने थोडे वाकावे.
* देवळात बसून प्रथम थोडा वेळ नामजप करावा व मग प्रसाद शक्यतो देवळात बसूनच ग्रहण करावा.
* निघताना देवतेला पुन्हा प्रार्थना करावी. देवळाबाहेर पडल्यावर आवारातून कळसाला नमस्कार करावा.

देवीची ओटी कशी भरावी:-
* देवीला अर्पण करावयाची साडी सुती किंवा रेशमी असावी. सहावारी साडीपेक्षा नऊवारी साडी अर्पण करणे अधिक योग्य आहे.
* ताटात साडी ठेवून साडीवर थोडे तांदूळ, खण व नारळ ठेवावा. नारळाची शेंडी देवीच्या दिशेने असावी. हे सर्व साहित्य हातांच्या ओंजळीत घ्यावे आणि ओंजळ छातीसमोर धरून शरणागतभावाने देवीसमोर उभे राहावे.
'देवीकडून चैतन्य मिळू दे, तसेच आपली आध्यात्मिक उन्नती होऊ दे',
अशी भावपूर्ण प्रार्थना करून ओटीचे साहित्य देवीच्या चरणी अर्पण करावे. नंतर या साहित्यावर थोडे तांदूळ वाहावेत.

यशस्वी जीवनाची सुत्रे ...

१) नेहमी सुर्योदयापूर्वी दीड ते दोन तास उठा।
२) उठल्यानंतर परमेश्वराचे स्मरण करुन, आपल्या तळाहाताचे दर्शन घेत कराग्रे वसते ॥ हा श्लोक म्हणा।
३) रोज सकाळी किमान अर्धा ते एक तास व्यायाम करा। (सूर्यनमस्कार व बैठका/ दोरीउड्या)
४) नियमितपणे योग्य आहारच घ्या।
५) आपले रोजचे काम, कर्तव्य नियमितपणे पूर्ण करा। आजचे काम कधीही उद्यावर ढकलू नका.
६) आपले शरीर, आपला पोशाख, आपल्या वस्तू नीटनेटक्या व स्वच्छ ठेवा।
७) एकावेळी एकच काम एकाग्रतेने व नीटनेटके करा।
८) चांगले ऎका, चांगले बघा, चांगले बोला व चांगलेच करा। यशस्वी जीवनाची ही चतु:सूत्री आहे.
९) धर्म, जात, गरीब -श्रीमंत असे कुठल्याही प्रकारचे भेद मानू नका। प्रत्येकाशी प्रेमाने नातं जोडा.
१०) दिलेली वेळ नेहमी पाळायला शिका तरच लोक तुमच्यावर विश्वास ठेवतील।
११) अडचणीत असणाऱ्या प्रत्येकाला शक्य ती मदत करा।
१२) रोज किमान कोणतेही एक वृत्तपत्र संपूर्ण वाचा।
१३) अतिथी वा कोणीही आल्यास त्याच्याशी प्रेमाने संवाद साधा, त्यांना पाणी वगैरे द्या, त्यांची विचारपूस करा।
१४) थोर महापुरुषांची चरित्रे वाचा। ती तुम्हाला प्रेरणा देतील.
१५) अंगणात, कुंडीत एखादे झाड लावा व त्याला नियमितपणे पाणी घालून त्याची काळजी घ्या।
१६) वर्षातून एकदा तरी सहलीला अवश्य जा।
१७) आपल्या मित्रांचे वाढदिवस एखाद्या अहीत अथवा डायरीत लिहून ठेवा व त्यांच्या वाढदिवशी त्यांना गुलाबाचे फ़ूल भेट द्या।
१८) चांगल्या सुविचारांचा, गाण्यांचा, चित्रांचा, फ़ोटोंचा, कवितांचा, कथांचा पुस्तकांचा संग्रह करा।
१९) शाळेतल्या अनेक स्पर्धांमध्ये भाग घ्या व यशासाठी प्रयत्न करा।
२०) आपल्या आवडत्या लेखकांचे, गायकांचे, माणसांचे पत्ते मिळवा व त्यांच्याशी पत्रमैत्री करा।
२१) एखाद्या कवितांचा, गाण्यांचा, नाटकाचा असा कोणताही कार्यक्रम पाहण्याची संधी लाभली तर ती दवडू नका।
२२) आपला पुस्तकसंग्रह वाढवा व स्वत:चं असं एक लघुग्रंथालय विकसित करा।
२३) दररोज किमान दोन पाने अवांतर लेखन करा। उद. रोजनिशी लिहिणे, निबंध लिहिणे इ.
२४) आपला एखादा मित्र, मैत्रीण, नातेवाईक आजारी असल्यास त्याला अवश्य भेटायला जा। तुमच्या भेटीने तो सुखावेल.
२५) कोणतीही कला तिच्या सर्व रंगसगांसहीत शिकण्याचा प्रयत्न करा। उदा. वादन, गायन, नृत्य, अभिनय, लेखन, वक्तृत्व इ.
२६) महिन्यातून किमान एकदा तरी आपल्या नजीकच्या पुस्तक प्रदर्शनाला आवश्य भेट द्या आणि शक्य आसल्यास आवडती पुस्तकं विकत घ्या।
२७) एखाद्या ग्रंथसंग्रालयाचे सभासद व्हा आणि आवडती पुस्तके वाचून काढा।
२८) नियमितपणे प्रात:प्रार्थना, भोजनश्लोक आणि सायंप्रार्थना म्हणण्यास चुकू नका।
२९) दिनचर्या आचरणात आणण्यास दिरंगाई करु नका।
३०) तुमच्याकडे काय नाही याचा विचार करण्यापेक्षा काय आहे याचा विचार करा।
३१) आयुष्यात कधीही निराश होऊ नका; परमेश्वरावर विश्वास ठेवा.

सूर्यास अर्घ्य देण्याचे महत्त्व:-

शास्त्रात पूजा करताना सूर्यास अर्घ्य देण्याचे महत्त्व विशद केले आहे. हाताच्या ओंजळीत पाणी (जल) घेऊन सूर्यासमोर तोंड करून सूर्यास जल समर्पित केले जाते. त्यालाच 'अर्घ्य' म्हटले जाते. वेदांमध्ये सूर्यास डोळ्याची उपमा दिली गेली आहे.सूर्यात सप्तरंगी किरणे असतात. या सप्तरंगी किरणांचे प्रतिबिंब ज्या रंगात पडते तेथून ती किरणे परत येतात. केवळ काळा रंगच असा रंग आहे की ज्यातून सूर्य किरणे परत येत नाहीत. आपल्या शरीरात विविध रंगांची विद्युत किरणे असतात. यामुळे ज्या रंगाची कमतरता आपल्या शरीरात असते त्या रंगाची ‍किरणे सूर्याला अर्घ्य दिल्यानंतर आपणास मिळतात. डोळ्यांचे बुबळे काळी असतात. तेथून सूर्यकिरण परत जात नाही. यामुळे आवश्यक असणार्‍या रंगांच्या किरणांची कमतरता दूर होते.सूर्यप्रकाशाचा संबंध केवळ ऊष्णतेशी नाही. त्याचा मानवाच्या आहाराशीसुध्दा आहे. वनस्पतींची पाने सूर्यकिरणांच्या माध्यमातून क्लोरोफिल नावाचा घटक निर्माण करतात. वैज्ञानिकांनी हे सिध्द केले आहे की सूर्य किरणांचा प्रभाव पाण्यावर लवकर पडतो. यामुळे सूर्यास पाण्याचे अर्घ्य दिले जाते. सूर्य म्हणजे आकाशात बसलेला डॉक्टर आहे. सूर्याच्या सप्तरंगी किरणांमध्ये अदभूत रोगनाशक शक्ती आहे. सकाळपासून संध्याकाळपर्यंतच्या सूर्य किरणांमध्ये औषधी गुणधर्म भरपूर आहेत. सूर्यकिरण अनेक रोग उत्पादक ‍विषाणूंचा नाश करतो. टिबीचे विषाणू उकळणार्‍या पाण्यात मरत नाहीत. पण सूर्यकिरणांनी त्वरीत नष्ट होतात. यावरूनच सूर्य किरणांमुळे कोणतेही विषाणू नष्ट होण्याबाबत शंकाच असू नये.मानवाला निरोगी राहण्यासाठी जितकी शुध्द हवा आवश्यक आहे, तितकाच सूर्यप्रकाशही आवश्यक आहे. या प्रकाशाने मानवाच्या शरीरातील कमजोर असलेले अंग पुन्हा सशक्त आणि सक्रीय होते. सूर्य किरणात प्रसन्नता-अप्रसन्नतेचे अणूही असतात. त्रिकाल संध्येचा संबंध सूर्याशी आहे. मुख्य संध्या म्हणजे सावित्री जप आहे. सावित्री सविताच्या अर्थात सूर्याच्या ऋचांचे नाव आहे. यामुळे संध्योपासना करताना सविताचे ध्यान केले जाते त्यावेळी अर्घ्य सूर्यास दिले जाते.सूर्य आत्मा जगतस्तस्थुषश्च (यजुर्वेद 7/42)। या मंत्राला सूर्याच्या स्थावर-जंगम पदार्थांचा आत्मा समजले जाते. जीवेत शरदः शतम्‌ (यजुर्वेद 36/24) पासून शंभर वर्ष जगण्याची, शंभर वर्ष बोलण्याची आणि ऐकण्याची प्रार्थना सुध्दा सूर्यालाच केली जाते. एका अमेरिकी शास्त्रज्ञाने म्हटले आहे, की जर सूर्यापासून मिळणारा उब आमच्यात सुरक्षित रहात असेल तर आम्ही चारशे वर्षापर्यंत जिवंत राहू शकतो. ही उब आपणास सूर्याकडून प्राप्त होते. सूर्य नसताना सर्व जीवसृष्टी नष्ट होते. सूर्यप्रकाशाचा संबंध केवळ ऊष्णतेशी नाही. त्याचा मानवाच्या आहाराशीसुध्दा आहे. वनस्पतींची पाने सूर्यकिरणांच्या माध्यमातून क्लोरोफिल नावाचा घटक निर्माण करतात. या घटकाविना पानात नैसर्गिक हिरवेपणा राहू शकत नाही. आपण दैनंदिन आहारात नेहमी हिरव्या भाज्यांचा समावेश करतो. या भाज्यांमध्येच मानवाच्या शरीरास आवश्यक पोषक घटक असतात. यामुळेच सूर्यप्रकाश मानवी जीवनासाठी प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष रुपाने आवश्यक आहे.

शनीच्या उपासना:-


शनिदेवाचा जन्म वैशाख अमावास्याच्या दिवशी दिवसा 12 वाजता झाला होता, म्हणूनच वैशाख अमावास्या शनैश्चर जयंती स्वरूपात साजरी केली जाते. शनि मकर आणि कुंभाचा स्वामी आहे व याची महादशा 19 वर्षाची असते। शनिचे अधिदेवता प्रजापिता ब्रह्मा आणि प्रत्यधिदेवता राम आहे। यांचा वर्ण कृष्ण, वाहन घुबड व रथ लोखंडाने बनलेले आहे. हा प्रत्येक राशीत तीस तीस महिने राहतो. शनि देव हे सूर्य आणि छाया (संवर्णा)चे पुत्र आहे. शनिदेवा विषयी अनेक गैरसमज प्रचलित असले तरी चांगले करणार्‍यांच्या सतत पाठीशी आणि वाईट करण्यार्‍यांवर शनिदेवाचा कोप होतो असे मानले जाते।
शनीच्या उपासनेसाठी मंत्र :-शनीची उपासनांसाठी खाली दिलेल्या एक मंत्र किंवा सर्वांचेच श्राद्धानुसार नियमित जप केले पाहिजे. जपाची वेळ संध्याकाळ तथा ऐकून जप संख्या २३००० असायला पाहिजे.शनी देवतेचे किंवा मारुती उपासना, दर्शन करावे.तीळ तेल व सेँदूर,रुईची माळ घालावी।
पौराणिक मंत्र:-
नीलांजनसमाभासं रविपुत्रं यमाग्रजम्‌।
छायामार्तण्डसम्भूतं तं नमामी शनैश्चरम्‌॥
सामान्य मंत्र:-
शं शनैश्चराय नमः।

कालसर्प


कालसर्प :- काळ या शब्दाचा अर्थ मृत्यू नव्हे. तसेच कालसर्प हा योग आहे, दोष नाही, हे प्रथम लक्षात घ्यावे. एकूण 12 प्रकारचे विशेष योग असतात. या योगाच्या अनेक सकारात्मक बाजूही आहे. जेव्हा कुंडलीतील सर्व ग्रह राहू आणि केतू यांच्या मध्ये येतात तेव्हा त्याला कालासर्प योग म्हटले जाते.

आदी शंकराचार्य


सात वर्षाचा एक संन्यासी मुलगा गुरुआज्ञेनुसार भिक्षा मागण्यासाठी एका ब्राह्मणाच्या घरी गेला. त्या ब्राह्मणाच्या घरात धान्याचा दाणासुद्धा नव्हता. ब्राह्मणाच्या पत्नीने मुलाच्या हातावर आवळा ठेवला आणि आपण काहीच भिक्षा देऊ शकत नसल्याबद्दल खेद व्यक्त केला. ब्राह्मणाची हलाखीची स्थिती पाहून कळवळलेल्या त्या मुलाने तिथल्या तिथे लक्ष्मीचे स्तोत्र रचून तिला त्या ब्राह्मणाची गरिबी दूर करण्याची विनंती केली. लक्ष्मी प्रसन्न झाली आणि तिने त्या निर्धन ब्राह्मणाच्या घरी सोन्याच्या आवळ्यांचा वर्षाव केला. जगतजननी लक्ष्मीला प्रसन्न करून त्या ब्राह्मणाची गरिबी दूर करणारा तो संन्यासी मुलगा पुढे जाऊन आदि शंकराचार्य या नावाने विख्यात झाला. शंकराचार्यांच्या रूपाने खुद्द भगवान शंकर जन्माला आले आहेत, असे मानले जाते. केरळमधील कालाडी गावात रहाणार्‍या शंकराचार्याच्या वडिलांना-शिवगुरू नामपुद्री - यांना लग्नानंतर बरीच वर्षे झाली तरी मूल होत नव्हते. त्यावेळी नाममुद्री यांची पत्नी विशिष्टादेवी यांनी पुत्रप्राप्तीची इच्छा धरून शंकराची आराधना करायला सुरवात केली. शंकर प्रसन्न झाले आणि त्यांनी विशिष्टादेवींनी स्वप्नात दर्शन दिले. विशिष्टादेवींनी त्यांना पुत्रप्राप्ती व्हावी असा वर मागितला. त्यावर शंकर म्हणाले, ''हे बघ मी तुला पुत्र देतो. पण विद्वान पुत्र मागितलास तर तो जास्त काळ जगणार नाही आणि विद्वान नसलेला पुत्र दीर्घकाळ जगेल. बोल तुला कोणता पुत्र हवा?'' त्यावर विशिष्टादेवींनी विद्वान पुत्राची मागणी केली. शंकर तथास्तु म्हणाले आणि या पुत्राच्या रूपाने आपणच तुझ्या पोटी जन्म घेणार असल्याचेही सांगितले. त्यानंतर काही काळाने इसवी सन ६८६ मध्ये वैशाख शुक्ल पंचमीला (काहींच्या मते अक्षय्यतृतीयेला) मध्यानकाली विशिष्टादेवींनी तेजस्वी पुत्राला जन्म दिला. त्याच्या शरीरावर जन्मतः असलेल्या खुणा पाहून हा शंकराचा अवतार असल्याची सगळ्यांचीच खात्री पटली. म्हणून त्याचे नाव शंकर ठेवण्यात आले.''हे बघ मी तुला पुत्र देतो. पण विद्वान पुत्र मागितलास तर तो जास्त काळ जगणार नाही आणि विद्वान नसलेला पुत्र दीर्घकाळ जगेल. बोल तुला कोणता पुत्र हवा?''शंकराचार्यांचा जन्म झाला तो काळ मोठा कठीण होता. भारतात वैदिक धर्माला ग्लानी आली होती. शंकराचार्यांच्या रूपाने एक तेजस्वी शलाका या अंधकारमय जगाला भेदत आली आणि तिने आपल्या ज्ञानाने आणि कर्तृत्वाने जगाला उजळून टाकले. वयाच्या तिसर्‍या वर्षापर्यंत छोटा शंकर मल्ल्याळम शिकला होता. त्याने संस्कृत शिकावे अशी पित्याची इच्छा होती. पण पित्याचा अकाली मृत्यू झाल्याने संसाराची सारी जबाबदारी त्यांच्या आईवर येऊन पडली. या माउलीने छोट्या शंकराला काहीही कमी पडू दिले नाही. पाच वर्षापर्यंत त्याची मुंज करून त्याला गुरूगृही धाडले. तिथे गेल्यावर छोट्या शंकराच्या अफाट प्रतिभेने गुरूही चकित झाले. अवघ्या दोन वर्षात या मुलाने वेद, पुराण, उपनिषदे, रामायण, महाभारत आदी ग्रंथ कंठस्थ करून सगळ्यांना विस्मयचकित करून टाकले. गुरुंची सेवा करून घरी परतल्यानंतर ते मातेची सेवा करू लागले. त्याची मातृभक्ती मोठी विलक्षण होती. या माउलीला कालाडीपासून दूर असलेल्या आलवाई (पूर्णा) नदीत स्नान करण्याची इच्छा होती. शंकरने या नदीची प्रार्थना करून तिचा प्रवाह आपल्या गावाजवळ आणला आणि मातेची इच्छा पूर्ण केली. काही दिवसांनंतर शंकरचा विवाह करण्याचे त्याच्या आईच्या मनात घाटू लागले. पण त्यांना हे सगळे नको होते. त्याचवेळी एका ज्योतिषाने शंकरची पत्रिका पाहून हा मुलगा अल्पायुषी असेल असे सांगितले. त्यावर मग संन्यास घेण्याची शंकराची इच्छा आणखी प्रबळ झाली. संन्यास घेण्यासाठी त्याने आईजवळ हट्ट धरला अखेर मातेलाही त्याच्या या हट्टापुढे मान तुकवावी लागली. वयाच्या सातव्या वर्षी संन्यास घेऊन हे बालक देशभ्रमणासाठी निघाले. भ्रमण करताना ते नर्मदेच्या किनारी ओंकारनाथला आले. तेथे एक गुरू गोविंदपाद हे महायोगी अनेक वर्षांपासून तपश्चर्या करत असल्याचे शंकरार्यांच्या कानावर आले. त्यांच्याकडून शंकराचार्यांनी अद्वैत ब्रह्मज्ञान प्राप्त केले. त्यानंतर गुरू आज्ञेने ते काशी विश्वनाथाचे दर्शन घेण्यासाठी निघाले. वाटेत एका चांडाळाने त्यांची वाट रोखून धरली. त्या चांडाळाने त्यांना सांगितले, की तुमच्या शरीरात असलेल्या परमात्म्याची तुम्ही उपेक्षा करत आहात. त्यामुळे तुम्ही अब्राह्मण ठरता. त्यामुळे तुम्ही माझ्या मार्गातून दूर व्हा.'' चांडाळाच्या मुखातून देववाणी ऐकल्यानंतर, तुम्ही मला ज्ञान दिले म्हणजे आता तुम्ही माझे गुरू झाले आहात, असे सांगून शंकराचार्यांनी त्याला नमस्कार केला. त्यावेळी त्यांना चांडाळाच्या जागी त्यांना शिवाचे व चार देवांचे दर्शन झाले. काशीत राहिल्यानंतर शंकराचार्य महिष्मती नगरातील आचार्य मंडनमिश्र यांना भेटायला गेले. आचार्यांच्या घरात असलेली मैनासु्द्धा वेदमंत्र म्हणायची अशी ख्याती होती. शंकराचार्यांनी मंडनमिश्रांशी झालेल्या वादात त्यांचा पराभव केला. मंडनमिश्राचा पराभव होत असल्याचे पाहून त्यांची पत्नी शारदादेवी शंकराचार्यांना म्हणाली, की आपण माझ्या अर्ध्या अंगाचा पराभव केला आहे. माझा पराभव करून दाखवा तर तुम्ही खरे विजेते ठराल.शंकराचार्य संन्यासी होते, हे हेरून शारदादेवींनी त्यांना कामशास्त्रावर आधारीत प्रश्न विचारले. त्यामुळे या प्रश्नांची उत्तरे देताना त्यांची अडचण झाली. या प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी त्यांनी काही अवधी मागितला. त्यानंतर मग परकाया प्रवेश करून त्यांनी यासंदर्भातील सगळी माहिती जाणून घेतली. त्यानंतर मग त्यांनी शारदादेवींनाही वादात हरवले. काशीत असताना त्यांना बड्या विद्वानांना वादात हरविले. गुरूगृही आल्यानंतर अनेकांनी मग त्यांच्या हातून दीक्षा घेतली. यानंतर शंकराचार्यांनी धर्माचा प्रचार आणि प्रसार हेच व्रत हाती घेतले. अनेक ग्रंथ रचले. अद्वैत ब्रह्मवादी शंकराचार्य निर्विशेष ब्रह्मालाच सत्य मानत होते. ब्रह्मज्ञानात ते कायम निमग्न असत. एकदा ब्राह्ममुहूर्तावर ते स्नानासाठी मणिकर्णिका घाटावर जात होते. पण ते जात असलेली गल्ली अतिशय छोटी होती. त्या गल्लीतच एक स्त्री पतीच्या शवाचे डोके मांडीवर घेऊन विलाप करत होती. त्यावेळी आचार्यांच्या शिष्यांनी तिला बाजूला होण्याची विनंती केली. पण ती बाजूला झाली नाही. मग शंकराचार्यांनी स्वतःच तिला विनंती केली. त्यावेळी ती स्त्री म्हणाली, की 'आपण मला वारंवार हे शव बाजूला घेण्याची विनंती करत आहात. मग तुम्हीच या प्रेताला बाजूला व्हायला का सांगत नाही.' त्यावेळी हे प्रेत आहे. जिवंत माणूस नाही. हे शंकराचार्यांनी तिच्या लक्षात आणून दिले. पण मग त्या स्त्रीने त्यांना अडचणीत टाकणारा सवाल केला. 'हे महात्मा, शक्तीनिरपेक्ष सत्य हेच जगाचे कर्ता धर्ता आहे. मग शक्ती न लावताही हे शव का हटवले जाऊ शकत नाही'. या सवालावर आचार्यांना ही बाई साधीसुधी नाही हे लक्षात आले. समाधी लावल्यानंतर त्यांच्या लक्षात आले, की ही बाई म्हणजे दुसरी तिसरी कोणी नसून आदिमाया आहे. मग त्यांच्या तोंडातून आपोआप मातृवंदनेचे स्तोत्र बाहेर पडू लागले. आता शंकराचार्यांचे स्थान खूपच मोठे झाले होते. त्यांच्या ज्ञानाचा सागर रूंदावत गेला. त्यात अद्वैतवाद, शुद्धाद्वैतवाद, विशिष्टाद्वैतवाद, निर्गुण ब्रह्मज्ञानाबरोबरच सगुण साकार रूपाची आराधनाही एकाचवेळी होती. ज्ञानाच्या अद्वैत भूमीवर निर्गुण निराकार ब्रह्म आहे. तेच ब्रह्म द्वैताच्या भूमीवर मात्र सगुण साकार रूपात आहे हे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी निर्गुण व सगुण दोन्हीचे समर्थन करून निर्गुणापर्यंत पोहोचण्यासाठी सगुणाच्या शिडीचा वापर करणे अपरिहार्य असल्याचे मत मांडले. ज्ञान व भक्तीच्या मीलनाच्या भूमीवर अद्वैत ज्ञान हेच शेवटी लक्ष्य असल्याचे त्यांच्या लक्षात आले.त्यांनी 'ब्रह्मं सत्यं जगन्मिथ्या' असे सांगितले. शिव, पार्वती, गणेश, विष्णू यांची भक्तिरसात ओथंबलेली स्तोत्रे रचली. सौंदर्य लहरी, विवेक चूडामणी असे महान ग्रंथ रचले. शिवाय प्रस्तान त्रयीवर भाष्यही लिहिले. शैव-वैष्णवांमधील भांडणाची समाप्ती त्यांनी घडवून आणली. पंचदेवोपासनेची प्रथा पाडली. संपूर्ण भारताचा प्रवास करून देशाच्या चार दिशांना चार आश्रमांची स्थापना केली. संपूर्ण देशाला एका सांस्कृतिक, धार्मिक, दार्शनिक, आध्यात्मिक व भौगोलिक एकतेच्या सूत्रात बांधले. आयुष्याचे प्रयोजन पूर्ण झाल्यानंतर वयाच्या अवघ्या तेविसाव्या वर्षी नश्वर देह सोडून ते परमात्म्यात लीन झाले.

श्रीराम



भारतीय संस्कृतीत आदर्श व्यक्तिमत्व म्हणून श्रीरामाकडे पाहिले जाते. 'मर्यादा पुरूषोत्तम' हे विशेषण त्यामुळेच श्रीरामाला दिले जाते. श्रीरामाला भगवान विष्णूचा सातवा अवतार मानतात. आयोध्याचा राजा दशरथ व कौसल्या यांचा राम थोरला मुलगा. त्याला लक्ष्मण, भरत व शत्रूघ्न हे तीन सावत्र भाऊ होते. जनक राजाची कन्या सीता त्याची पत्नी. दशरथ राजाची पट्टराणी कैकयीने आपला मुलगा भरत याला आयोध्येचे राज्य मिळावे यासाठी रामाला १४ वर्षे वनवासात पाठवले. ही १४ वर्षे रामाने पत्नी सीता व धाकटा भाऊ लक्ष्मण यांच्याबरोबर घालवली. या काळात त्याने जंगलातील ऋषींना त्रास देणारया अनेक असूरांचा वध केला. रावणाने सीतेचे अपहरण करून तिला लंकेत बंदिवासात ठेवले. तेव्हा तिला सोडवण्यासाठी व रावणाचा वध करण्यासाठी राम लंकेत गेला. या काळात रामाला हनुमान भेटला. हनुमानाच्या वानरसेनेची मदत घेऊन त्यांनी लंकेवर आक्रमण केले व रावणाचा वध केला. सीतेची सुटका केली. वनवास भोगल्यावर श्रीरामाचे पुन्हा अयोध्येत आगमन झाले. गुढ्या उभारून लोकांनी त्याचे स्वागत केले. त्यामुळे तो दिवस गुडीपाडवा म्हणून साजरा केला जातो. या काळत सर्वत्र आनंद, शांती, भरभराट होती. श्रीरामाच्या जीवनावर वा‍ल्मिकी ऋषिंनी रामायण हे महाकाव्य लिहिले.

श्रीगुरूदेव दत्त



दत्तात्रेय ही भारतीय संस्कृतीच्या विकासातील एक अद्बूत निर्मिती आहे. शैव, वैष्णव व शाक्त या तीनही प्रमुख उपासना प्रवाहांना व्यापून उरणारा दत्तात्रेयाचा प्रभाव गेली हजार बाराशे वर्ष भारतात विशेषतः महाराष्ट्रात गाजत आहे. महाराष्ट्रात दत्तभक्तीचा प्रसार जातिभेदातीत, संप्रदायातीत, किंबहुना धर्मातीत आहे. महानुभावसंप्रदाय, नाथ संप्रदाय, वारकरी संप्रदाय आणि समर्थ संप्रदाय या चारही संप्रदायात दत्तात्रेयाविषयी उत्कट श्रद्धाभाव आहे. तसेच खास दत्तभक्तीची परंपरा चालविणारा दत्तसंप्रदायही गेली पाचशे वर्ष महाराष्ट्रात नांदत आहे. या संप्रदायात दत्तात्रेयाला श्रद्धेय मानणाऱ्या उपासकांत हिंदूंबरोबर मुसलमानही आहेत. भारतीय संस्कृतीत वेदांतील इंद्र ही वीरदेवता आहे, तर मध्ययुगातील दत्त ही सिद्धदेवता आहे. दत्तात्रेय ही देवता भारतीयांच्या प्रगल्भ चिंतनाची निर्मिती आहे. भारतीय संस्कृतीतीत अत्यंत परिणत विचार आणि निगूढ भावना व्यक्त करण्यासाठी इतिहासाच्या गर्भातून हे अद्भूत प्रतीक जन्म पावले आहे. त्यात समग्रता आणि सामंजस्य असल्याने ते सार्वत्रिक श्रद्धेचा विषय बनले आहे. दत्त चरित्र हे सगुण साकार ईश्वरावताराचे नसून चिरंतन मुल्यांच्या विकास प्रक्रियेचे आहे आणि म्हणूनच दत्तात्रयेची उपासना ही सर्वोच्च जीवन मुल्याची साधना आहे. या देवतेच्या उपासनेला सर्वाधिक प्रेरणा मिळाली ती श्रीनरसिंह सरस्वतींच्या अवतारामुळे. त्यांच्या अवतारानंतर महाराष्ट्रात खास दत्तोपासनेचा संप्रदाय निर्माण झाला आणि औदूंबर, वाडी व गाणगापूर ही त्या संप्रदायाची प्रधान तीर्थस्थाने बनली. श्रीनरसिंह सरस्वतींच्या अवतारातून जो दत्तोपासनेचा प्रवाह प्रवर्तित झाला. त्या प्रवाहाशिवाय दत्तोपासनेच्या क्षेत्रात अन्य प्रवाहही नांदत राहिले. परंतु, त्यांचे प्रवाह व्यापक नसल्याने ते वैयक्तिक उपासनेपुरतेच मर्यादित राहिले. त्यांना संप्रदायाचे स्वरूप आले नाही. आज ज्याला आपण दत्त संप्रदाय म्हणून ओळखतो, तो प्रवाह श्रीनरसिंह सरस्वतींच्या अवतार कार्यातून प्रकटला आहे. दत्त संप्रदायाचे उपास्य असलेला दत्तात्रेय हा गुरूदेव आहे. त्याची उपासना गुरूस्वरूपातच करायची असते. श्रीगुरू किंवा गुरूदेव दत्त हा त्याचा जयघोष आहे. त्याचमुळे गुरूसंस्थेला प्राधान्य असलेल्या सर्व साधनप्रणालीत दत्तात्रेयाची पुज्यता रूढ झाली. परमार्थात गुरूसंस्थेचे महत्त्व स्वयंसिद्ध आहे. विकल्पविकारांचे तिमिर दूर सारून यथार्थज्ञानाचा प्रकाश दाखविण्यासाठी सद्गुरूची नितांत आवश्यक्ता असते. दत्तात्रेय हा परमगुरू असल्याने पथदर्शक गुरू आणि गुरूच्या मार्गदर्शनामुळे होणारी परमप्राप्ती हे दोन्ही विशेष त्याच्या स्वरूपात सामावले आहेत. दत्त संप्रदायात सगुणध्यानासाठी जरी दत्तात्रेयांचे सालंकृत सगुणरूप वापरले जात असले तरी पूजोपचारासाठी मूर्तीऐवजी पादुकांचे स्वरूप विशेष मानले जाते. औदुंबर, वाडी व गाणगापूर या तीनही ठिकाणी दत्तात्रेयांच्या पादुकाच आहेत. गुरूचरित्र, दत्तप्रबोध, दत्तमहात्म्य आणि गुरूलीलामृत हे ग्रंथ दत्त संप्रदायात विशेष मान्यता पावलेले आहेत.


विष्णूचा अवतार- श्री दत्तात्रय :-
दत्तात्रय हा शब्द 'दत्त' व 'अत्रेय' अशा दोन शब्दांनी बनला आहे. 'दत्त' या शब्दाचा अर्थ आपण ब्रह्मच आहोत, मुक्‍तच आहोत, आत्माच आहोत, अशी निर्गुणाची अनुभूती ज्याला आहे असा. आणि 'अत्रेय' म्हणजे अत्री ऋषींचा मुलगा.
श्री दत्तात्रयाच्या जन्माविषयी विविध कथा प्रचलित आहेत. मा‍त्र या सगळ्या कथांमधून श्रीदत्त हे अत्रीऋषी व माता अनुसूया यांचा पुत्र व विष्णूचा अवतार आहे, असाच बोध होतो.

अत्रीऋषींनी पुत्रप्राप्‍तीसाठी ऋक्ष कुलपर्वतावर घोर तपश्चर्या केली. त्यांच्या तपाने सारे त्रिभुवन पोळून निघाले. अत्रीऋषींच्या या प्रखर तपाने संतुष्ट होऊन ब्रह्मा-विष्णु-महेश हे तिन्ही देव प्रकट झाले. आणि त्यांनी अत्रीऋषींना तपाचे कारण विचारले. अत्रीऋषींनी त्यांना विनवले की, आपण माझ्या उदरी पुत्ररूपाने जन्म घ्यावा. तिन्ही देवांनी त्यांची विनंती मान्य केली. देवत्रयीच्या आशीर्वादाने अनुक्रमे ब्रह्मापासून सोम म्हणजे चंद्र, विष्णूपासून दत्त आणि शिवापासून दुर्वास हे तीन पुत्र अनुसयेच्या उदरी जन्मला आली.

श्रीदत्तजन्माची एक कथा ब्राह्मणपुराणात आहे. अत्रीऋषींनी ब्रह्मा-विष्णु-महेश यांची पुत्रप्राप्‍तीसाठी आराधना केली. ते संतुष्ट झाल्यावर त्यांनी देवांना विनवले की, आपण माझ्या घरी पुत्ररूपाने जन्म घ्यावा आणि मला एक रूपवती कन्याही प्राप्‍त व्हावी. देवांच्या आशीर्वादाने दत्रात्रेय, सोम, दुर्वास हे तीन पुत्र आणि शुभात्रेयी नावाची कन्या अत्रीऋषींना प्राप्‍त झाली.

याचबरोबर दत्तात्रेयांच्या जन्माची आणखी एक कथा प्रसिद्ध आहे. ती अशी की, राहूने सूर्याला ग्रस्त केले असता सर्व पृथ्वी अंध:कारमय झाली. अत्रीने सूर्याला राहूच्या मगरमिठीतून सोडवले आणि पुन्हा पृथ्वी प्रकाशमान केली. अत्रीच्या या महत्कार्यामुळे संतुष्ट झालेल्या शिव व विष्णु यांनी अनुक्रमे दुर्वास आणि दत्त यांच्या रूपाने अत्रीच्या घरी जन्म घेतला.

भारतात शैव, वैष्णव आणि शाक्‍त हे तीन प्रमुख पंथ आहेत. ती सुमारे हजार ते बाराशे वर्षांपासून श्री दत्तात्रयाची उपासना करत आहेत. संपूर्ण भारतात विशेषत: महाराष्ट्रात श्रीदत्त आराधणेची उज्ज्वल परंपरा आहे. महानुभाव संप्रदाय, नाथ संप्रदाय, वारकरी संप्रदाय, समर्थ संप्रदाय व दत्त संप्रदाय ही पाच संप्रदाय श्री दत्तप्रभुची उपासना करताना दिसतात.

दत्तोपासनेतील सर्वोच्च स्थान-गाणगापूर:-
हे स्थान पुणे-रायचूर लोहमार्गावर गाणगापूर स्टेशनपासून चौदा मैलांवर भीमा-अमरजेच्या संगमस्थानी आहे. श्रीनरसिंह सरस्वती येथे वाडीहून आले आणि सुमारें तेवीस वर्षे येथें राहून येथूनच श्रीशैलाकडे त्यांनी गमन केले. त्यांच्या दोन तपाएवढ्या प्रदीर्घ सन्निध्यामुळे हे स्थान दत्तोपासनेच्या क्षेत्रात सर्वोपरी महिमान पावलें आहे. श्रीगुरु जेव्हां येथे आले, तेव्हा प्रथम ते संगमरावरच राहत. नंतर ते गांवांत बांधलेल्या मठात राहू लागले. या मठाच्या स्थानीच त्यांच्या पादुका आहेत.

वाडीच्या पादुकांना 'मनोहर पादुका' म्हणतात, तर तेथील पादुकांना 'निर्गुण पादुका' अशी संज्ञा आहे. जणू वाडी येथे असताना त्यांच्या सगुण रूपाची दीप्ति कळसास पोचली होती - 'मनोहर बनली होती, तर येथें ते देहातीत- गुणरुपातीत होऊन 'निर्गुण' स्वरूप पावले होते. गुरूवार हा इथला पालखीचा वार. नित्योपासना दररोज पहाटेपासूनच सुरू होते. येथील पादुकांना जलस्पर्श करीत नाहीत, केवळ अष्टगंध आणि केशर यांचे लेपन करतात. येथील 'निर्गुण पादुका' चल आहेत. त्या त्यांच्या आकाराच्या संपुटांत ठेवलेल्या असतात. संपुटांतून मात्र त्या बाहेर काढल्या जात नाहींत. संपुटांना झाकणे आहेत. पूजेच्या वेळी झांकणें काढून आंतच लेपनविधी होतो आणि अन्य पूजोपचरांसाठी ताम्हणांत 'उदक' सोडतात.

पादुका असलेला मठ गांवाच्या मध्यभागी आहे. मठाच्या पूर्वेस महादेवाचें स्थान आहे. दक्षिणेस औदुंबर व त्याखाली महादेव-पार्वती यांच्या मूर्ती ‍आहेत, पश्चिमेस अश्वत्थानचें झाड आहे. अश्वत्थाच्या पराभोंवती नागनाथ, मारुती यांची स्थाने व तुळशीवृंदावन आहे. मठांतील पादुकांच्या गाभार्‍याला द्वार नाही. दर्शनार्थ एक चांदीनें मढविलेला लहानसा झरोका आहे. या झरोक्यांतून दर्शनार्थींनी श्रीगुरूंच्या त्या चिरस्मरणीय 'निर्गुण पादुकां'चे दर्शन घ्यावयाचें असतें. अनेक साधकांना या पादुकांच्या ठायींच श्रीगुरूंचें दिव्य दर्शन झालें, असें सांगतात.

गावापासून एक मैल अंतरावर भीमा-अरमजा-संगम आहे. संगमाजवळच भस्माचा डोंगर आहे. संगमावरील संगमेश्वराच्या देवालयापुढें श्रीगुरूंची तपोभूती आहे. गाणगापूरच्या परिसरांत षट्‍कुलतीर्थ, नरसिंहतीर्थ, भागीरथीतीर्थ, पापविनाशीतीर्थ, कोटितीर्थ, रुद्रपादतीर्थ, चक्रतीर्थ आणि मन्मथतीर्थ अशीं अष्टतीर्थे आहेत.

गाणगापूरच्या उत्सव-संभारांत दत्तजयंती आरि श्रीगुरूंची पुण्यतिथी या दोन उत्सवांचे विशेष महत्व आहे. श्रीगुरूंचें सर्व जीवनकार्य गाणगापूर येथेंच घडलें आणि आपल्या दिव्योदात्त विभूतिमत्त्वाचें सर्व तेज त्यांनी याच भूमीच्या अणुरेणूंत संक्रमित केलें. त्याचमुळें गेली पांच शतकें हे स्थान दत्तोपासकांच्या हृदयांत असीम श्रद्धेचा विषय बनले आहे.

(संत साहित्याचे गाढे अभ्यासक रा. चिं. ढेरे यांच्या दत्त संप्रदायाचा इतिहासमधून साभार)