I made this widget at MyFlashFetish.com.

Saturday, October 16, 2010

सोने लुटण्याच्या प्रथेमागची कथा:-

विजयादशमीच्या दिवशी आपट्याची पाने सोने म्हणून लुटण्याविषयी काही कथा आहेत. त्यावरून ही प्रथा कशी अस्तित्वात आली असावी यावर उजेड पडतो..... रामायणाच्या पंचम सर्गांत रघुवंशामध्ये दिलेली कथा अशी- पूर्वी पैठणमध्ये देवदत्त नावाच्या एका ब्राह्मणास कौत्स नावाचा मुलगा होता. तो सुशील होता. मौजीबंधनानंतर तो भडोच नावाच्या शहरी वरतंतू ऋ‍षीच्या घरी विद्यार्जनासाठी गेला. काही काळ लोटल्यावर कौत्स सर्व शास्त्रांत पारंगत झाला, गुरूला गुरुदक्षिणा देऊन त्यांच्या ऋणातून कसे मुक्त व्हावे असा विचार तो करू लागला.गुरूंचा निरोप घेताना त्याने अत्यंत कृतज्ञतापूर्वक त्याचे आभार मानून आपल्या आवडीचा काही पदार्थ असल्यास तो सांगावा, म्हणजे गुरुदक्षिणेदाखल तो आणून देईन असे त्याला सांगिलते. गुरूने उत्तर दिले:- ''कौत्सा, दक्षिणार्थ विद्या शिकविणे हे अनुचित कर्म आहे. शिष्य विद्वान् झालेला पाहून गुरुस जो आनंद प्राप्त होतो तीच गुरुदक्षिणा होय.'' परंतु कौत्सास गुरूच्या ऋणात राहणे न आवडून त्याने आग्रह धरला व पुन: पुन: मी तुम्हाला काय दक्षिणा देऊ? असे विचारू लागला. तेव्हा वरतंतू ऋषी म्हणाले, ''मी दक्षिणा घ्यावी असा तुझा आग्रहच असेल तर तुला शिकविलेल्या प्रत्येक विद्येबद्दल एक कोटी याप्रमाणे चौदा कोटी मुद्रा व त्याही एकाडूनच आणून दे.'' ही अट कौत्साने मान्य करून आपल्या विद्येच्या धीरावर तो तेथून बाहेर पडला, परंतु चौदा कोटी मुद्रा व त्याही एकाच इसमाकडून मिळविणे काही सोपे काम नव्हे हे त्याला लवकरच समजले. रघुराजा मोठा उदार व विद्वानांस आश्रय देणारा आहे असे त्याच्या कानावर येताच तो त्याच्याकडे गेला, परंतु त्या वेळी रघुराजाने विश्वजित् यज्ञ करून ब्राह्मणांकडून सर्व द्रव्यभंडार लुटविले होते, यामुळे त्यालाही अत्यंत गरीबी आलेली होती. कौत्साने त्याच्या एकंदर स्थितीचे सूक्ष्म निरीक्षण केल्यावर आपली इच्छा येथे सफल होणार नाही असे वाटून त्याला दु:ख झाले. रघुराजाने आपल्या द्वारी आलेल्या विद्वान् ब्राह्मणाचा योग्य सत्कार केला व त्याच्या आगमनाचे कारण विचारले. कौत्साने कारण सांगितले व तो पुढे म्हणाला, 'राजा, तुला प्राप्त झालेल्या स्थितीत माझी मनीषा सफल होण्याचा रंग दिसत नाही. तथापि त्याजबद्दल खंत वाटू न देता मला दुसरा दाता शोधून काढण्यासाठी जाऊ दे. हे कौत्साचे भाषण ऐकून राजा हसला. त्याने चौदा कोटी सुवर्ण मुद्रा तीन दिवसात देतो असे कौत्सास आश्वासन देऊन त्याला आपल्या घरी ठेवून घेतले. थकलेली बाकी वसूल करण्यासाठी इंद्राबरोबर लढण्याची तयारी चालविली. ही गोष्ट इंद्रास समजताच त्याने अयोध्या नगराबाहेर आपट्याच्या व शमीच्या झाडांवर कुबेराकडून सुवर्णमुद्रांचा वर्षांव करविला. रघुराजाने त्या सर्व कौत्सास दिल्या. त्याने त्या वरतंतू ऋषिपुढे ठेवून त्यांचा स्वीकार करण्याविषयी विनंती केली.परंतु त्याने फक्त 14 कोटी मुद्रा ठेवून घेऊन बाकीच्या कौत्यसास परत दिल्या. त्या त्याने रघुरराजास आणून दिल्या, पण तोही त्या घेईना. शेवटी त्याच आपट्याच्या व शमीच्या झाडाखाली त्या मुद्रांचा ढिग करून त्याने लोकांस त्या नेण्यास सांगितले. लोकांनी अनायासे श्रीमंत होण्याची ही संधी साधून त्या नगरीच्या सीमेबाहेर असलेल्या त्या झाडांची पूजा केली, सोने यथेच्छ लुटले व एकमेकांस देऊन आनंद व्यक्त केला. हा दिवस विजयादशमीचा होता. त्या वेळेपासून या झाडांची पूजा करून सुवर्णमुद्रांच्या ऐवजी या झाडांची पाने लुटण्याचा प्रघात प्रचारात आला.

शमीची पाने:- दसर्‍याच्या दिवशी शमीची पाने एकमेकांना प्रदान करू नयेत, तर ती पाने आपल्या वास्तूत ठेवावीत. यामुळे वास्तूतील वायूमंडल शुद्ध होण्यास मदत होते. शमी ही तेजतत्त्वरूपी आहे. ही तम-रजात्मक असल्याने तिच्यातून प्रक्षेपित होणारे तेजकण हे वातावरणात आगीची निर्मिती करतात. या सूक्ष्म ज्वाळांनी जिवाचा क्षात्रभाव जागृत होण्यास मदत होते. क्षात्रभाव हा आत्मशक्‍तीच्या बळावर जिवाला संस्कारात्मक अशा क्षात्रवृत्तीकडे नेतो. वनवासाला जातांना प्रभू श्रीरामचंद्रांनी शमीच्या झाडाच्या ढोलीत शस्त्रे ठेवली होती. शमीच्या खोडातून व पानांतून उत्पन्न होणार्‍या तेजतत्त्वरूपी धगीमुळे शस्त्रांतील सुप्‍त मारक शक्‍ती अखंड कार्यरत अवस्थेला राहू शकते. या वेळी प्रभू श्रीरामचंद्रांनी जरी शस्त्रे उतरवली, तरी त्यांनी या शस्त्रांच्या माध्यमातून मारक शक्‍ती दुर्जनांवर सोडून शमीपत्रांच्या साहाय्याने संपूर्ण ब्रह्मांडात मारक तत्त्वाचे कार्य केले. दसर्‍याच्या दिवशी श्रीरामाचे तारक, तर हनुमानाचे मारक तत्त्व कार्यरत असल्याने शमीपत्र हे ते ते तत्त्व आकृष्ट करून घेऊन ते वायूमंडलात प्रक्षेपित करण्याचे महत्त्वाचे कार्य करते.

आपट्याची पाने:- ही आप व तेज या कणांशी निगडित असल्याने शमीकडून प्रक्षेपित झालेल्या लहरी या आपट्याच्या पानांकडून ग्रहण केल्या जाऊन त्या आपतत्त्वाच्या बळावर प्रवाही बनवल्या जातात व जेव्हा या आपट्यांच्या पानांचे आदान-प्रदान होते, त्या वेळी हे तेजतत्त्वरूपी कण आपट्याच्या पानातून जिवाच्या तळहाताकडे संक्रमित होतात. यामुळे जिवाच्या हातावरील देवतांच्या स्थानांचे बिंदू कार्यरत होऊन त्या बिंदूतून ते ते आवश्यक तत्त्व जिवाच्या सूक्ष्मदेहापर्यंत आपकणांच्या साहाय्याने झिरपले जाते. या कारणास्तव शमीची पाने घरात ठेवून दसर्‍याच्या दिवशी वायूमंडलाची शुद्धी करावी व त्यानंतर आपट्याच्या पानांतून तेजतत्त्व एकमेकांना प्रदान करून ईश्‍वरी राज्य स्थापनेला लागणारा क्षात्रभाव जागृत अवस्थेत ठेवावा.

Wednesday, September 22, 2010

॥श्रीगणपत्यथर्वशीर्षम्॥

हरिः ॐ नमस्ते गणपतये॥ त्वमेव प्रत्यक्षं तत्त्वमासि॥ त्वमेव केवलं कर्तासि॥
त्वमेव केवलं धर्तासि॥ त्वमेव केवलं हर्तासि॥ त्वमेव सर्वं खल्विदं ब्रह्मासि॥
त्वं साक्षादात्मासि नित्यं ॥ १॥ऋतं वच्मि॥ सत्यं वच्मि॥ २॥अव त्वं माम्॥
अव वक्तारम्॥ अव श्रोतारम्॥ अव दातारम्॥ अव धातारम्॥ अवानूचानमव शिष्यम्॥
अव पश्चात्तात्॥ अव पुरस्तात्॥ अवोत्तरात्तात्॥ अव दक्षिणात्तात्॥ अव चोर्ध्वात्तात्॥
अवाधरात्तात्॥ सर्वतो मां पाहि पाहि समंतात्॥ ३॥त्वं वाङ्मयस्त्वं चिन्मयः॥
त्वमानंदमयस्त्वं ब्रह्ममयः॥ त्वं सच्चिदानंदाद्वितीयोऽसि॥ त्वं प्रत्यक्षं ब्रह्मासि॥
त्वं ज्ञानमयो विज्ञानमयोऽसि॥ ४॥सर्वं जगदिदं त्वत्तो जायते॥ सर्वं जगदिदं त्वत्तस्तिष्ठति॥
सर्वं जगदिदं त्वयि लयमेष्यति॥ सर्वं जगदिदं त्वयि प्रत्येति॥ त्वं भूमिरापोऽनलोऽनिलो नभः॥
त्वं चत्वारि वाक्पदानि।।५॥त्वं गुणत्रयातीतः त्वं देहत्रयातीतः॥
त्वं कालत्रयातीतः त्वं मूलाधारास्थितोऽसि नित्यम्॥ त्वं शक्तित्रयात्मकः॥
त्वां योगिनोध्यायंति नित्यम्॥त्वं ब्रह्मा त्वं विष्णुस्त्वं रुद्रस्त्वंमिंद्रस्त्वमग्निस्त्वं वायुस्त्वं सूर्यस्त्वं चंद्रमास्त्वं ब्रह्मभूर्भुवःस्वरोम्॥ ६॥गणादिं पूर्वमुच्चार्य वर्णादिं तदनंतरम्॥
अनुस्वारः परतरः॥ अर्धेन्दुलसितं॥ तारेण ऋद्धं॥ एतत्तव मनुस्वरूपम्॥ गकारः पूर्वरूपम्॥
अकारो मध्यमरूपम्॥ अनुस्वारश्चांत्यरूपम्॥ बिन्दुरुत्तररूपम्॥ नादः संधानम्॥संहिता संधिः॥
सैषा गणेशविद्या॥ गणक ऋषिः॥ निचृद्गागायत्रीच्छंदः॥गणपतिर्देवता॥ ॐ गं गणपतये नमः॥ ७॥
एकदंताय विघ्नहे वक्रतुण्डाय धीमहि॥ तन्नो दंतिः प्रचोदयात्॥ ८॥एकदंतं चतुर्हस्तं पाशमंकुशधारिणाम॥ रदं च वरदं हस्तैर्बिभ्राणं मूषकध्वजम्॥रक्तं लंबोदरं शूर्पकर्णकं रक्तवाससम्॥ रक्तगंधानुलिप्तांगं रक्तपुष्पैः सुपूजितम्॥ भक्तानुकंपिनं देवं जगत्कारणमच्युतम्॥आविर्भूतं च सृष्ट्यादौ प्रकृतेः पुरुषात्परम्॥ एवं ध्यायति यो नित्यं स योगी योगिनां वरः॥ ९॥नमोत्रातपतये। नमो गणपतये। नमः प्रमथपतये। नमस्ते अस्तु लंबोदरायैकदंताय विघ्नानाशिने शिवसुताय श्रीवरदमूर्तये नमो नमः॥१०॥
एतदथर्वशीर्षं योऽधीते॥ स ब्रह्मभूयाय कल्पते॥ स सर्वविघ्नैर्नबाध्यते॥ स सर्वत: सुखमेधते ।
स पंचमहापापात्प्रमुच्यते॥ सायमधीयानो दिवसकृतं पापं नाशयति॥ प्रातरधीयानो रात्रिकृतं पापं नाशयति॥ सायं प्रातः प्रयुंजानो अपापो या भवति॥सर्वत्राधीनोऽपविघ्नो भवति॥ धर्मार्थकाममोक्षं च विंदति॥ इदमथर्वशीर्षमशिष्याय न देयं ॥ यो यदि मोहाद्दास्यति स पापीयान् भवति। सहस्रावर्तनात् यं यं काममधीते तं तमनेन साधयेत्॥ । अनेन गणपतिमभिषिंचति स वाग्मी भवति॥ चतुर्थ्यामनश्नन् जपति स विद्यावान् भवति। इत्यथर्वणवाक्यम्॥ ब्रह्मद्यावरणं विद्यात् । न बिभेति कदाचनेति॥
यो दूर्वांकुरैर्यजति स वैश्रवणोपमो भवति॥ यो लाजैर्यजति स यशोवान् भवति स मेधावान् भवति॥
यो मोदकसहस्रेण यजति स वाञ्छितफलमवाप्नोति॥यः साज्यसमिद्भिर्यजति स सर्वं लभते स सर्वं लभते॥ अष्टौ ब्राह्मणान् सम्यग्ग्राहयित्वा सूर्यवर्चस्वी भवति॥ सूर्यग्रहे महानद्यां प्रतिमासंनिधौ वा जप्त्वा सिद्धमंत्रो भवति॥ महाविघ्नात्प्रमुच्यते॥ महादोषात्प्रमुच्यते॥ महापापात् प्रमुच्यते॥ स सर्वविद्भवति स सर्वविद्भवति॥
य एवं वेद इत्युपनिषत्॥ १४॥ॐ सहनाववतु॥ सहनौभुनक्तु॥ सह वीर्यं करवावहै॥
तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै॥ॐ शांति॒: । शांति॒:॥ शांति॑:॥ ॥
इति श्रीगणपत्यथर्वशीर्षं समाप्तम्॥

Tuesday, March 16, 2010

गुढी पाडवा:-

आपल्या देशात वेगवेगळ्या दिवशी नव्या वर्षाचा प्रारंभ करण्याच्या विविध रूढी असल्या तरी महाराष्ट्रात चैत्र शुद्ध प्रतिपदेला नव्या वर्षाचा प्रारंभ होतो। या शालिवाहन शकाबद्दल आपल्याला विशेष ममत्व वाटण्याचे कारण असे की, हा शक सुरू करणारा राजा शालिवाहन हा एक महाराष्ट्रीय होता. आपला पंचांग तयार करण्याची अनेक कोष्टके या शालिवाहन शकावर आधारित असल्यामुळे इतर काही प्रांतात कुठे कार्तिक प्रतिपदेला, तर कुठे मेष राशीतील सूर्यप्रवेशाला वर्षारंभ मानीत असले तरी शालिवाहन शक मात्र सर्वदूर रूढ आहे. या विषयातील जाणकारांना शालिवाहन शकाचा आधार आणि संदर्भ घ्यावा लागतो.
चैत्र शुद्ध प्रतिपदेला प्रात:काळी ओवा, मीठ, हिंग, मिरी आणि साखर कडुनिंबाच्या पानांबरोबर वाटून खावी। नंतर पूजा-अर्चा करून गुढी उभारावी, असे सांगितले आहे. तसेच वर्षप्रतिपदेच्या दिवशी विघ्नहर्त्या गणपतीचे, देवादिकांचे स्मरण, पूजन करावे. गुरूं, वडीलधार्‍यांना वंदन करावे, असेही सांगितले आहे. त्यानंतर संवत्सर फल श्रवण करावे, अशी धर्माज्ञा आहे. संवत्सर फल म्हणजे काय ? तर त्या पाडव्यापासून जे संवत्सर म्हणजे वर्ष सुरू होत असले त्या वर्षाच्या पहिल्या दिवशी आणि नंतरच्या काही विशिष्ट दिवशी असणारी स्थिती - जसे वार, चंद्र, नक्षत्र, सूर्याचे विविध नक्षत्रप्रवेश इत्यादी संदर्भांवरून हे संवत्सर फल दिलेले असते. संवत्सर फलात देशकालाचाही निर्देश असतो, म्हणजे देशाच्या कोणत्या भागात सुखसमृद्धी संवत्सर फलात त्रोटकपणे सांगितलेले असते. वर्षप्रतिपदेच्या म्हणजे गुढीपाडव्याच्या दिवशी जो वार असेल त्या वाराचा जो ग्रह असेल तो त्या संवत्सराचा अधिपती असे मानले जाते. म्हणजे आजपासून सुरू होणारे वर्ष हे मंगळवारी सुरु होत असल्यामुळे मंगळ हा या वर्षाचा अधिपती असे समजले पाहिजे. साठ संवत्सरांची वेगवेगळ्या पद्धतीने काही विभागणी केली आहे. एका विभागणीत पाच संवत्सरांचे एक युग अशा पद्धतीने साठ संवत्सरांची बारा युगे मानली जातात. तसेच संवत्सर चक्रातील ८व्या भाव नावाच्या संवत्सरापासून विजय या २७व्या संवत्सरापर्यंत २० संवत्सरांचा स्वामी पालनकर्ता विष्णू आहे असे मानले जाते.
जय नावाच्या २८व्या संवत्सरापासून प्रमादी नावाच्या ४७व्या संवत्सरापर्यंत २० संवत्सरे संहारकर्त्या महादेव शंकराच्या स्वामित्वाखाली येतात आणि ४८व्या आनंद नावाच्या संवत्सरापासून श्रीमुख नावाच्या ७च्या संवत्सरापर्यंत सृष्टिकर्त्या ब्रह्मदेवाच्या स्वामित्वाखाली येतात। अशी विविध प्रकारांनी संवत्सरांची विभागणी आणि मांडणी केलेली असते. संवत्सर फलात पाऊस-पाणी, नैसर्गिक अनुकूल-प्रतिकूलता, याबद्दलचे जे अंदाज वर्तविले जातात ते बरेच स्थूल असे असतात. पूर्वी एकूणच आयुष्य सुखशांतिमय असे होते. शिवाय प्रमुख व्यवसाय शेती. पाऊस कसा पडेल, नैसर्गिक प्रकोप होईल किंवा नाही ते जाणून घेण्याची इच्छा सर्वसामान्य माणसांनाही होती. पण नव्या वर्षाच्या प्रारंभीचा दिवस आनंदात घालविला की पुढील वर्ष चांगले जाते, अशी आपल्या लोकांची पूर्वापार श्रद्धा आहे. हे संवत्सर फल ज्योतिषाकडून जाणून घ्यावे, असेही सांगितले आहे. 'सस्यं सर्वसुखं च वत्सरफलं संशृण्वतां सिद्धिम्।' अशी धर्मशास्त्राची ग्वाही आहे.
-------ज्योतिर्भास्कर जयंत साळगावकर

Friday, February 19, 2010

जाणता राजा:-

शिवकालीन प्रशासकीय व्यवस्थेत शिवाजी महाराजांची शिस्त खूपच करडी होती। सरकारी नोकरी वंशपरंपरेने न देता लायक व्यक्तिस द्यावी आणि सरकारी कामकाजात लष्कराचा हस्तक्षेप होणार नाही, याची दक्षता घ्यावी, असे त्यांनी फर्मान काढले होते. निरनिराळ्या खात्यांवर स्वतंत्र प्रधान नेमून त्यांच्याकडून त्या त्या खात्याची कामे करुन घेतली जात असत. रयतेकडून जमीनदारांमार्फत करवसुली न करता सरकारी नोकरांकडून करावी. राज्याचा खर्च भागवून नियमितपणे शिल्लक ठेवावी, असे स्थायी निर्देश त्यांनी दिलेले असायचे. सैन्य भरतीत महाराज स्वत:च लक्ष घालीत असत. प्रत्येक सैनिकाला सर्वप्रकारची हत्यारे हाताळण्याचे व चढाईचे प्रशिक्षण देण्याबाबत ते दक्षता घेत असत. महाराजांच्या फौजेत पराक्रमी सैनिक व सेनानींना खास बक्षिसे व उच्च पदे, पदव्या बहाल करुन त्यांचा गौरव केला जात असे. छत्रपती हे केवळ उत्तम राज्यकर्तेच नव्हे तर कुशल प्रशासक होते.
वीरपुरुषांची मोर्चेबांधणी:-
महाराजांच्या लष्करात अतिशूर लढवय्ये, एकनिष्ठ आणि कुशल सैनिकांचा समावेश असे. घोडदळ व पायदळ हे त्यांच्या लष्कराचे मुख्य विभाग होते. घोडदळात सुमारे दीड लाख, तर पायदळात सुमारे दोन लाख सैनिक होते. सैनिकांमध्ये सेनापती, हजारी, जुमेलदार, हवालदार, नाईक अशी पदे असत. साधेपणा व शिस्त ही महाराजांच्या लष्कराची महत्त्वाची वैशिष्टये होती. राज्याची मदार किल्ल्यांवर होती, हे जाणून महाराजांनी रायगड, पुरंदर, पन्हाळा, सिंहगड, विशालगड, प्रतापगड आदी किल्ले, कोट व जंजिरे उभारुन आपल्या मुलूखांची तटबंदी मजबूत केली. खुद्द महाराज हे किल्ले बांधण्याच्या तंत्रात निष्णात स्थापत्यतज्ज्ञ म्हणून ओळखले जात असत. मोगल व आदिलशहा यांच्या सैन्य संख्येचा तुलनेत छत्रपतींकडे सैन्यबळ कमी होते. तथापि, तरुण पिढीतली कर्तबगार पराक्रमी माणसे हेरुन त्यांना महाराजांनी युद्धतंत्रात पारंगत केले. तानाजी मालुसरे, येसाजी कंक, दाजी जेधे, रामचंद पंत, शंकराजी नारायण, परशराम पंत, गिरजोजी यादव, बंडो बल्लाळ, संताजी घोरपडे, धनाजी जाधव, नेताजी शिंदे आदींच्या समावेश होता. महाराजांचे युद्धनैपुण्य अद्वितीय होते. त्यांनी आदिलशहा, कुतूबशहा, जंजिर्‍याचा सिद्दी, फिरंगी-वखारवाले, अफझलखान, शयस्तेखान, मिर्झा राजा जयसिंग, औरंगजेब या एकापेक्षा एक बलाढ्य शत्रुंशी समर्थपणे मुकाबला करुन त्यांना नामोहरम केले. मराठा तितुका मिळवावा ही मेघगर्जना करुन महाराष्ट्र धर्म वाढविण्यासाठी महाराजांनी आपले सारे आयुष्य वेचले।
युद्धतंत्र-गनिमी कावा:- शिवाजी महाराजांना आपल्या मुलूखांचे तंतोतंत भौगो‍‍‍लिक ज्ञान होते। मोगल, आदिलशहा यांच्या तुलनेत सैन्यबळ व शस्त्रसाठा कमी असल्याने ते गनिमी कावा या युद्धतंत्राचा वापर करीत असत आणि त्यात त्यांना जबरदस्त यशही आले।शत्रुच्या नवनव्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी महाराज वेगवेगळ्या डावपेचांचा वापर करीत असत. शत्रुच्या आव्हानाला तोंड देण्यासाठी आपल्या कोणत्या सेनाधिकार्‍याला केव्हा व कोठे पाचारण करायचे याबाबतच त्यांचे निर्णय अचूक ठरत असत. गडावर वेळ पडली तर गडावरील सैनिकांनी काय करायचे आणि गडाबाहेर असलेल्यांनी काय करायचे, याचे अचूक प्रशिक्षण सैन्याला तसेच गावकर्‍यांना दिले जात असे. अफझलखानाचा वध, आग्रा भेट, शाहिस्तेखानावर केलेला वार, औरंगजेबच्या कैदेतून शिताफीने केलेली सुटका या ऐतिहासिक घटनांमध्ये शिवबांनी जे यश संपादन केले, त्यात गनिमी काव्याची अहम भूमिका होती. शिवबा हे चतुर व बुद्धिमान योद्धा होते.
नाविकदलाचे निर्माते:- परकीयांच्या आक्रमणाला आळा घालण्यासाठी सागरी तटालगत किल्यांची गरज ओळखून छत्रपतींनी मालवण बंदरावरील कुरटे बेटावर सिंधुदूर्ग किल्ल्याची उभारणी केली। सिंधुदुर्गसारखा अभेद्य जलदुर्गाची निर्मिती खर्‍या अर्थाने छत्रपतींच्या अगाध स्थापत्य ज्ञानाची प्रचिती देते. भारत देशाला मोठ्या प्रमाणात सागरी किनारा लाभल्याने सागरीमार्गे शत्रुंची आक्रमणे होण्याची शक्यता ओळखून महाराजांनी नाविकदलाची निर्मिती केली आणि इब्राहिम दौलतखानची त्या दलाचे प्रमुख पदी नियुक्ती केली. आधुनिक शस्त्रसाठा, युद्धनौका, जहाजे, आगबोटींचे बांधकाम सागरी किनार्‍यावर करुन छत्रपतींनी राज्याच्या संरक्षणासाठी अभेद्य तटबंदी केली. शिवाजीराजे हे नाविकदलाची मुहूर्तमेढ रोवणारे देशातील ‍पहिले राजे होते.