I made this widget at MyFlashFetish.com.

Thursday, February 12, 2009

रामनामाचा मंत्र देणारे श्री ब्रह्मचैतन्य:-



श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचा १६४ वा जन्मोत्सव आज (ता. ६ फेब्रुवारी) सर्वत्र मोठ्या भक्तिभावाने होत आहे. त्यानिमित्ताने श्री गोंदवलेकर महाराज यांचे रामनाम आणि रामप्रेम यावर प्रकाश टाकणारा लेख...

मानवी जीवनाच्या इतिहासात तिच्या संस्कृतीचा विचार करताना तो दोन अंगांनी केला जातो. बहिरंग आणि अंतरंग ही ती दोन अंगे आहेत. यापैकी व्यक्‍तीच्या श्रेष्ठत्वामध्ये बहिरंगापेक्षा अंतरंग अधिक महत्त्वाचे ठरते. संत परंपरेनेच अवलोकन केले तर असे दिसेल, की बहिरंगाच्या वैभवापेक्षाही अंतरंगाची श्रीमंती त्यांची अधिक होती. श्री क्षेत्र गोंदवले (जि. सातारा) येथे जन्माला आलेले, तीच कर्मभूमी केलेले आणि अखेरीस तेथेच चिरविश्रांती घेतलेले श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज आज लाखो भक्‍तांचे श्रद्धास्थान आहेत. सदगुरू आहेत.

समर्थ रामदासांप्रमाणे प्रभू रामचंद्रांवर श्री ब्रह्मचैतन्यांची आत्यंतिक प्रीती होती. त्यांचे सदगुरू श्रीतुकामाई यांनी श्री ब्रह्मचैतन्यांना अनुग्रह दिल्यावर, तसेच तो प्राप्त होण्याच्या आधीपासूनच श्रीमहाराज रामनामात मग्न होत असत. अखंडपणे जणू काही रामनाम हा त्यांचा श्‍वासच झालेला होता. नामात एका आनंदाशिवाय दुसरे काही नाही, ही त्यांची ठाम भूमिका होती. आमच्या शास्त्रकारांनी वर्तमान कलियुगात अन्य कोणत्याही साधनेपेक्षा भगवंतांचे नामस्मरण करणे अधिक सोपे आणि सहज आहे, असे सांगितलेले आहे. श्री ब्रह्मचैतन्य महाराजांनी याच शास्त्र विचारांना अनुसरून अनेकांना नामस्मरणाचे महत्त्व पटवून दिले. त्यांना नामाला लावले. भगवंतांकडे वळवले.

पारमार्थिक मार्गदर्शन

श्री ब्रह्मचैतन्यांच्या कार्याचे आणखी वैशिष्ट्य म्हणजे, त्यांनी मध्यमवर्गीय सामान्य प्रापंचिक माणूस सतत आपल्यासमोर ठेवला. त्याच्या जीवनातील दैनंदिन आणि प्रासंगिक अडीअडचणी समजून घेतल्या. त्या लक्षात घेत त्यांनी पारमार्थिक मार्गदर्शन केले. विकार नाहीसे न करता त्यांना ताब्यात ठेवण्याची किंवा प्रसंगी भगवंताकडे वळविण्याची भूमिका श्री गोंदवलेकर महाराज सतत मांडत असत.

विकारांना किंवा वासनेला नियंत्रित करण्यासाठी नामासारखे दुधारी शस्त्र नाही, अशी त्यांची धारणा होती. श्री गोंदवलेकर महाराज यांनी लहानपणापासूनच त्यांच्या ठिकाणी श्रीरामरायाबद्दल अनुराग होता. श्रीराम चरणी ते इतके विनम्र झाले होते, की या विश्‍वातील कोणतीही गोष्ट श्रीरामचंद्रांच्या इच्छेने घडते, असे त्यांचे ठाम सांगणे होते. श्रीरामाला कर्तेपण द्या, असा त्यांचा आग्रह होता. आपल्या ६८ वर्षांच्या जीवन काळात श्रीमहाराजांनी जवळजवळ ३० राममंदिरे उभारली. मंदिरांच्या निर्मितीमध्ये त्यांची संकल्पना नेहमीपेक्षा काहीशी वेगळी होती. मंदिर हे अध्यात्म विद्येचे केंद्र असावे, प्रापंचिकाला त्याच्या दुःखाचा काही काळ विसर पडावा, भगवंताच्या अस्तित्वाची जाणीव व्हावी, अशा स्वरूपाचे त्यांचे मंदिराबद्दल विचार होते.

श्रीरामांवर त्यांचे विलक्षण प्रेम होते. श्रीरामांवर आत्यंतिक श्रद्धा होती. श्रीक्षेत्र गोंदवले येथील श्रीरामाच्या मूर्तीतून तीन वेळा अश्रुपात झाल्याचा उल्लेख श्रीमहाराजांच्या चरित्रात आहे. यावरून त्यांचे रामप्रेम लक्षात येते. श्रीरामांबरोबर रामनामाचे श्रेष्ठत्वही ते तितक्‍याच आग्रहाने मांडत. "श्रीराम जयराम जय जय राम', या तारक मंत्राचा अनुग्रह ते अनेकांना देत. या मंत्राचे, त्यातील अक्षरांचे सामर्थ्य ते पटवून देत. या मंत्रात १३ अक्षरे आहेत. या प्रत्येक अक्षरावर एक याप्रमाणे १३ अभंग श्री महाराजांनी रचलेले आहेत. ""श्रीराम म्हणा मुखी राम म्हणा मुखी। तेणे सर्व सुखी होशील तू।।'' या ध्रुवपदाने हे अभंग म्हटले जातात. या १३ अभंगांतून रामनामाला असलेला वेदांचा आधार, कलियुगातील सोपे साधन, मनाची एकाग्रता, प्रपंच, दुःख आणि त्या दुःखाची निवृत्ती, रामनामाचे तारकत्व आदी अनेक विचारांचे मनोज्ञ दर्शन घडते. श्री महाराजांच्या प्रज्ञेचे सामर्थ्य अनुभवाला येते.

""श्रीराम जयराम जय जय राम'' हा तारक मंत्र स्वतः श्रीरामाने सीतेला दिला आणि हनुमंताला दिला, असे श्रीमहाराज सांगत. अनेकांना या मंत्राच्या साधनेने परम अधिकारी बनवले. या मंत्राचा एक अर्थ सिद्धांच्या दृष्टीने "मी रामस्वरूप आहे', असा होतो, तर साधकांच्या दृष्टीने "राम माझा स्वामी आहे, रक्षणकर्ता आहे, माझ्या हृदयात आहे', असे श्रीमहाराज सांगत.

या मंत्रातील शब्दांवरही श्रीमहाराज बोलताना एकदा म्हणाले, ""श्रीराम म्हणजेच पुरुषोत्तम. म्हणजेच सगुण आणि निर्गुण परमात्मा. जयराम म्हणजे सर्वत्र त्या पुरुषोत्तमाचाच जय आहे. तोच कर्ता आहे. त्याचीच शक्‍ती विश्‍वात कार्य करते, तसेच जय जय राम म्हणजे परमात्मा आतबाहेर कल्याणमय आहे. त्या कल्याणापर्यंत पोचण्याचा प्रयत्न आपण करावा. त्याचा जयजयकार करावा. श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांनी अशारीतीने राममंत्राचा अर्थही उलगडलेला आहे. या रामनामात आपण सतत राहावे. प्रपंच करतानाही रामनामात प्रपंच करावा, ही त्यांची विचारसरणी होती. अन्य कोणत्याही सुखापेक्षा समाधान आणि आनंद याला ते अधिक महत्त्व देतात.

श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या उपदेशानुसार खरोखर जो कोणी रामनामात राहिल, तो जीवनात आनंदी आणि समाधानी राहील, हे निर्विवाद सत्य आहे. श्रीमहाराजांच्या जन्मोत्सवाचे निमित्ताने त्यांना श्रद्धेय वंदन.

- लक्ष्मीकांत जोशी, नाशिक

No comments: