I made this widget at MyFlashFetish.com.

Thursday, February 5, 2009

श्रीगुरूदेव दत्त



दत्तात्रेय ही भारतीय संस्कृतीच्या विकासातील एक अद्बूत निर्मिती आहे. शैव, वैष्णव व शाक्त या तीनही प्रमुख उपासना प्रवाहांना व्यापून उरणारा दत्तात्रेयाचा प्रभाव गेली हजार बाराशे वर्ष भारतात विशेषतः महाराष्ट्रात गाजत आहे. महाराष्ट्रात दत्तभक्तीचा प्रसार जातिभेदातीत, संप्रदायातीत, किंबहुना धर्मातीत आहे. महानुभावसंप्रदाय, नाथ संप्रदाय, वारकरी संप्रदाय आणि समर्थ संप्रदाय या चारही संप्रदायात दत्तात्रेयाविषयी उत्कट श्रद्धाभाव आहे. तसेच खास दत्तभक्तीची परंपरा चालविणारा दत्तसंप्रदायही गेली पाचशे वर्ष महाराष्ट्रात नांदत आहे. या संप्रदायात दत्तात्रेयाला श्रद्धेय मानणाऱ्या उपासकांत हिंदूंबरोबर मुसलमानही आहेत. भारतीय संस्कृतीत वेदांतील इंद्र ही वीरदेवता आहे, तर मध्ययुगातील दत्त ही सिद्धदेवता आहे. दत्तात्रेय ही देवता भारतीयांच्या प्रगल्भ चिंतनाची निर्मिती आहे. भारतीय संस्कृतीतीत अत्यंत परिणत विचार आणि निगूढ भावना व्यक्त करण्यासाठी इतिहासाच्या गर्भातून हे अद्भूत प्रतीक जन्म पावले आहे. त्यात समग्रता आणि सामंजस्य असल्याने ते सार्वत्रिक श्रद्धेचा विषय बनले आहे. दत्त चरित्र हे सगुण साकार ईश्वरावताराचे नसून चिरंतन मुल्यांच्या विकास प्रक्रियेचे आहे आणि म्हणूनच दत्तात्रयेची उपासना ही सर्वोच्च जीवन मुल्याची साधना आहे. या देवतेच्या उपासनेला सर्वाधिक प्रेरणा मिळाली ती श्रीनरसिंह सरस्वतींच्या अवतारामुळे. त्यांच्या अवतारानंतर महाराष्ट्रात खास दत्तोपासनेचा संप्रदाय निर्माण झाला आणि औदूंबर, वाडी व गाणगापूर ही त्या संप्रदायाची प्रधान तीर्थस्थाने बनली. श्रीनरसिंह सरस्वतींच्या अवतारातून जो दत्तोपासनेचा प्रवाह प्रवर्तित झाला. त्या प्रवाहाशिवाय दत्तोपासनेच्या क्षेत्रात अन्य प्रवाहही नांदत राहिले. परंतु, त्यांचे प्रवाह व्यापक नसल्याने ते वैयक्तिक उपासनेपुरतेच मर्यादित राहिले. त्यांना संप्रदायाचे स्वरूप आले नाही. आज ज्याला आपण दत्त संप्रदाय म्हणून ओळखतो, तो प्रवाह श्रीनरसिंह सरस्वतींच्या अवतार कार्यातून प्रकटला आहे. दत्त संप्रदायाचे उपास्य असलेला दत्तात्रेय हा गुरूदेव आहे. त्याची उपासना गुरूस्वरूपातच करायची असते. श्रीगुरू किंवा गुरूदेव दत्त हा त्याचा जयघोष आहे. त्याचमुळे गुरूसंस्थेला प्राधान्य असलेल्या सर्व साधनप्रणालीत दत्तात्रेयाची पुज्यता रूढ झाली. परमार्थात गुरूसंस्थेचे महत्त्व स्वयंसिद्ध आहे. विकल्पविकारांचे तिमिर दूर सारून यथार्थज्ञानाचा प्रकाश दाखविण्यासाठी सद्गुरूची नितांत आवश्यक्ता असते. दत्तात्रेय हा परमगुरू असल्याने पथदर्शक गुरू आणि गुरूच्या मार्गदर्शनामुळे होणारी परमप्राप्ती हे दोन्ही विशेष त्याच्या स्वरूपात सामावले आहेत. दत्त संप्रदायात सगुणध्यानासाठी जरी दत्तात्रेयांचे सालंकृत सगुणरूप वापरले जात असले तरी पूजोपचारासाठी मूर्तीऐवजी पादुकांचे स्वरूप विशेष मानले जाते. औदुंबर, वाडी व गाणगापूर या तीनही ठिकाणी दत्तात्रेयांच्या पादुकाच आहेत. गुरूचरित्र, दत्तप्रबोध, दत्तमहात्म्य आणि गुरूलीलामृत हे ग्रंथ दत्त संप्रदायात विशेष मान्यता पावलेले आहेत.


विष्णूचा अवतार- श्री दत्तात्रय :-
दत्तात्रय हा शब्द 'दत्त' व 'अत्रेय' अशा दोन शब्दांनी बनला आहे. 'दत्त' या शब्दाचा अर्थ आपण ब्रह्मच आहोत, मुक्‍तच आहोत, आत्माच आहोत, अशी निर्गुणाची अनुभूती ज्याला आहे असा. आणि 'अत्रेय' म्हणजे अत्री ऋषींचा मुलगा.
श्री दत्तात्रयाच्या जन्माविषयी विविध कथा प्रचलित आहेत. मा‍त्र या सगळ्या कथांमधून श्रीदत्त हे अत्रीऋषी व माता अनुसूया यांचा पुत्र व विष्णूचा अवतार आहे, असाच बोध होतो.

अत्रीऋषींनी पुत्रप्राप्‍तीसाठी ऋक्ष कुलपर्वतावर घोर तपश्चर्या केली. त्यांच्या तपाने सारे त्रिभुवन पोळून निघाले. अत्रीऋषींच्या या प्रखर तपाने संतुष्ट होऊन ब्रह्मा-विष्णु-महेश हे तिन्ही देव प्रकट झाले. आणि त्यांनी अत्रीऋषींना तपाचे कारण विचारले. अत्रीऋषींनी त्यांना विनवले की, आपण माझ्या उदरी पुत्ररूपाने जन्म घ्यावा. तिन्ही देवांनी त्यांची विनंती मान्य केली. देवत्रयीच्या आशीर्वादाने अनुक्रमे ब्रह्मापासून सोम म्हणजे चंद्र, विष्णूपासून दत्त आणि शिवापासून दुर्वास हे तीन पुत्र अनुसयेच्या उदरी जन्मला आली.

श्रीदत्तजन्माची एक कथा ब्राह्मणपुराणात आहे. अत्रीऋषींनी ब्रह्मा-विष्णु-महेश यांची पुत्रप्राप्‍तीसाठी आराधना केली. ते संतुष्ट झाल्यावर त्यांनी देवांना विनवले की, आपण माझ्या घरी पुत्ररूपाने जन्म घ्यावा आणि मला एक रूपवती कन्याही प्राप्‍त व्हावी. देवांच्या आशीर्वादाने दत्रात्रेय, सोम, दुर्वास हे तीन पुत्र आणि शुभात्रेयी नावाची कन्या अत्रीऋषींना प्राप्‍त झाली.

याचबरोबर दत्तात्रेयांच्या जन्माची आणखी एक कथा प्रसिद्ध आहे. ती अशी की, राहूने सूर्याला ग्रस्त केले असता सर्व पृथ्वी अंध:कारमय झाली. अत्रीने सूर्याला राहूच्या मगरमिठीतून सोडवले आणि पुन्हा पृथ्वी प्रकाशमान केली. अत्रीच्या या महत्कार्यामुळे संतुष्ट झालेल्या शिव व विष्णु यांनी अनुक्रमे दुर्वास आणि दत्त यांच्या रूपाने अत्रीच्या घरी जन्म घेतला.

भारतात शैव, वैष्णव आणि शाक्‍त हे तीन प्रमुख पंथ आहेत. ती सुमारे हजार ते बाराशे वर्षांपासून श्री दत्तात्रयाची उपासना करत आहेत. संपूर्ण भारतात विशेषत: महाराष्ट्रात श्रीदत्त आराधणेची उज्ज्वल परंपरा आहे. महानुभाव संप्रदाय, नाथ संप्रदाय, वारकरी संप्रदाय, समर्थ संप्रदाय व दत्त संप्रदाय ही पाच संप्रदाय श्री दत्तप्रभुची उपासना करताना दिसतात.

दत्तोपासनेतील सर्वोच्च स्थान-गाणगापूर:-
हे स्थान पुणे-रायचूर लोहमार्गावर गाणगापूर स्टेशनपासून चौदा मैलांवर भीमा-अमरजेच्या संगमस्थानी आहे. श्रीनरसिंह सरस्वती येथे वाडीहून आले आणि सुमारें तेवीस वर्षे येथें राहून येथूनच श्रीशैलाकडे त्यांनी गमन केले. त्यांच्या दोन तपाएवढ्या प्रदीर्घ सन्निध्यामुळे हे स्थान दत्तोपासनेच्या क्षेत्रात सर्वोपरी महिमान पावलें आहे. श्रीगुरु जेव्हां येथे आले, तेव्हा प्रथम ते संगमरावरच राहत. नंतर ते गांवांत बांधलेल्या मठात राहू लागले. या मठाच्या स्थानीच त्यांच्या पादुका आहेत.

वाडीच्या पादुकांना 'मनोहर पादुका' म्हणतात, तर तेथील पादुकांना 'निर्गुण पादुका' अशी संज्ञा आहे. जणू वाडी येथे असताना त्यांच्या सगुण रूपाची दीप्ति कळसास पोचली होती - 'मनोहर बनली होती, तर येथें ते देहातीत- गुणरुपातीत होऊन 'निर्गुण' स्वरूप पावले होते. गुरूवार हा इथला पालखीचा वार. नित्योपासना दररोज पहाटेपासूनच सुरू होते. येथील पादुकांना जलस्पर्श करीत नाहीत, केवळ अष्टगंध आणि केशर यांचे लेपन करतात. येथील 'निर्गुण पादुका' चल आहेत. त्या त्यांच्या आकाराच्या संपुटांत ठेवलेल्या असतात. संपुटांतून मात्र त्या बाहेर काढल्या जात नाहींत. संपुटांना झाकणे आहेत. पूजेच्या वेळी झांकणें काढून आंतच लेपनविधी होतो आणि अन्य पूजोपचरांसाठी ताम्हणांत 'उदक' सोडतात.

पादुका असलेला मठ गांवाच्या मध्यभागी आहे. मठाच्या पूर्वेस महादेवाचें स्थान आहे. दक्षिणेस औदुंबर व त्याखाली महादेव-पार्वती यांच्या मूर्ती ‍आहेत, पश्चिमेस अश्वत्थानचें झाड आहे. अश्वत्थाच्या पराभोंवती नागनाथ, मारुती यांची स्थाने व तुळशीवृंदावन आहे. मठांतील पादुकांच्या गाभार्‍याला द्वार नाही. दर्शनार्थ एक चांदीनें मढविलेला लहानसा झरोका आहे. या झरोक्यांतून दर्शनार्थींनी श्रीगुरूंच्या त्या चिरस्मरणीय 'निर्गुण पादुकां'चे दर्शन घ्यावयाचें असतें. अनेक साधकांना या पादुकांच्या ठायींच श्रीगुरूंचें दिव्य दर्शन झालें, असें सांगतात.

गावापासून एक मैल अंतरावर भीमा-अरमजा-संगम आहे. संगमाजवळच भस्माचा डोंगर आहे. संगमावरील संगमेश्वराच्या देवालयापुढें श्रीगुरूंची तपोभूती आहे. गाणगापूरच्या परिसरांत षट्‍कुलतीर्थ, नरसिंहतीर्थ, भागीरथीतीर्थ, पापविनाशीतीर्थ, कोटितीर्थ, रुद्रपादतीर्थ, चक्रतीर्थ आणि मन्मथतीर्थ अशीं अष्टतीर्थे आहेत.

गाणगापूरच्या उत्सव-संभारांत दत्तजयंती आरि श्रीगुरूंची पुण्यतिथी या दोन उत्सवांचे विशेष महत्व आहे. श्रीगुरूंचें सर्व जीवनकार्य गाणगापूर येथेंच घडलें आणि आपल्या दिव्योदात्त विभूतिमत्त्वाचें सर्व तेज त्यांनी याच भूमीच्या अणुरेणूंत संक्रमित केलें. त्याचमुळें गेली पांच शतकें हे स्थान दत्तोपासकांच्या हृदयांत असीम श्रद्धेचा विषय बनले आहे.

(संत साहित्याचे गाढे अभ्यासक रा. चिं. ढेरे यांच्या दत्त संप्रदायाचा इतिहासमधून साभार)

No comments: