I made this widget at MyFlashFetish.com.

Sunday, February 15, 2009

शिवकल्याण राजा:-



निश्चयाचा महामेरु....
निश्चयाचा महामेरु, बहुत जनांसी आधारु
अखंडस्थितीचा निर्धारु, श्रीमंत योगी

नरपती, हयपती, गजपती, गडपती, भूपती, जळपती
पुरंदर आणि शक्ती, पृष्ठभागी

यशवंत, किर्तीवंत, सामर्थ्यवंत, वरदवंत
पुण्यवंत, नीतीवंत, जाणता राजा

आचार शील, विचारशील, दानशील, धर्मशील
सर्वज्ञपणे सुशील, सकळांठायी

धीर उदार गंभीर, शूर क्रियेसी तत्पर
सावधपणे नृपवर, तुच्छ केले

देव धर्म गोब्राम्हण, करावया संरक्षण
हृदयस्थ झाला नारायण, प्रेरणा केली

या भूमंडळाचे ठायी, धर्मरक्षी ऐसा नाही
महाराष्ट्र धर्म राहिला काही, तुम्हा कारणे

कित्येक दुष्ट संहारिला, कित्येकांसी धाक सुटला
कित्येकांस आश्रय जाहला, शिवकल्याण राजा.

जय जय शिवराया:-
प्राणी मात्र झाले दुःखी, पाहता कोणी नाही सुखी
कठीण काळे, ओळखी धरीनात कोणी
माणसा खावया अन्न नाही, अंथरुण पांघरुण ते ही नाही
घर कराया सामुग्री नाही, विचार सुचेना काही
अखंड चिंतेच्या प्रवाही, पडले लोक

जय देव, जय देव, जय जय शिवराया
या, या अनन्य शरणां, आर्या ताराया

आर्यांच्या देशावरी म्लेच्छांचा घाला
आला आला सावध हो शिवभूपाला
सदगदीता भूमाता दे तुज हाकेला
करुणारव भेदूनी तव हृदय न का गेला
जय देव, जय देव, जय जय शिवराया

श्रीजगदंबा जी तव शुंभादीक भक्षी
दशमुख मर्दूनी ती श्रीरघुवर संरक्षी
ती पूता भूमाता, म्लेंच्छा ही छळता
तुजविण शिवराया तिज कोण दुजा त्राता
जय देव, जय देव, जय जय शिवराया

त्रस्त आम्ही दीन आम्ही, शरण तुला आलो
परवशतेच्या पाशी मरणोन्मुख झालो
साधुपरित्राणाया, दुष्कृती नाशाया
भगवन भगवदगीता सार्थ कराया या
जय देव, जय देव, जय जय शिवराया.

शिवरायांचा पाळणा:-
गुणी बाळ असा जागसि का रे वांया | नीज रे नीज शिवराया
अपरात्री प्रहर लोटला बाई | तरि डोळा लागत नाही ||

हा चालतसे चाळा एकच असला | तिळ उसंत नाही जिवाला ||
निजयावयाचा हरला सर्व उपाय | जागाच तरी शिवराय ||

चालेल जागता चटका
हा असाच घटका घटका
कुरवाळा किंवा हटका

का कष्टविसी तुझी सांवळी काया | नीज रे नीज शिवराया ||१ ||
ही शांत निजे बारा मावळ थेट | शिवनेरी जुन्नर पेठ ||
त्या निजल्या ना तशाच घाटाखाली | कोकणच्या चवदा ताली ||
ये भिववाया बागुल तो बघ बाळा | किति बाई काळा काळा ||

इकडे हे सिद्दीजवान
तो तिकडे अफझुलखान
पलिकडे मुलूख मैदान

हे आले रे तुला बाळ धराया | नीज रे नीज शिवराया || २ ||

आरती संग्रह:-

श्री गणप‍‍तीची आर‍‍ती:-
सुखकर्ता दुःखकर्ता वार्ता विघ्नाची।
नुरवी पुरवी प्रेम कृपा जयाची ।
सर्वांगी सुंदर उटी शेंदुराची ।
कंठी झळके माळ मुक्ताफळाची ।।1।।
जय देव जय देव जय मंगलमूर्ती ।
दर्शनमात्रे मनकामना पुरती ।।धृ।।
रत्नखचित फरा तूज गौरीकुमरा ।
चंदनाची उटी कुंकुमकेशरा
हिरे जडित मुकुट शोभतो बरा
रूणझुणती नुपुरे चरणी घागरिया ।।२ ।।
लंबोदर पीतांबर फ‍ण‍ीवरवंदना ।
सरळ सोंड वक्रतुंड त्रिनयना ।
दास रामाचा वाट पाहे सदना ।
संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवंदना ।
जय देव जय देव जय मंगलमूर्ती ।
दर्शनमात्रे मनकामना पुरती ।।

देवीची आरती:-
दुर्गे दुर्घट भारी तुजविण संसारी।
अनाथ नाथे अंबे करुणा विस्तारी।
वारी वारी जन्म मरणांते वारी।
हारी पडलो आता संकट निवारी॥१॥

जय देवी जय देवी महिषा सुरमथिनी।
सुरवर ईश्र्वर वरदे तारक संजीवनी॥धृ॥

तुजवीण भुवनी पाहता तुज ऐसे नाही।
चारी श्रमले परंतु न बोलवे काही।
साही श्रमले परंतु न बोलवे काही।
साही विवाद करिता पडले प्रवाही।
ते तू भक्तालागी पावसी लवलाही॥२॥

प्रसन्न वदने प्रसन्न होती निजदासा।
क्लेशांपासूनी सोडवी तोडी भवपाशा।
अंबे तुजवाचून कोण पुरवील आशा।
नरहरी तल्लीन झाला पदपंकजलेशा॥३॥

श्री कृष्णाची आरती:-
ओवाळू आरती मदनगोपाळा । श्यामसुंदरा गळा वैजयंतीमाळा ।।ध्रु।।
चरणकमल ज्याचे ति सुकुमार । ध्वजवज्राकुश ब्रीदाचे तोडर ।। ओवाळू।।1।।
नाभिकमल ज्याचे ब्रह्मचर्याचे स्थान । हृदयी पदक शोभे श्रीवत्सल छान ।। ओवाळू।।2।।
मुखकमल पाहता सुखिचिया कोटी । वेधले मानस हारपली दृष्टी ।। ओवाळू।।3।।
जडित मुगट ज्याचा देदीप्यमान । तेणे कोंदले अवघे त्रिभुवन ।। ओवाळू।।4।।
एका जनार्दनी देखियले रूप । पाहता जाहले अवघे तद्रूप ।ओवाळू।।5।।

श्री विठ्ठल आरती :-
युगे अठ्ठावीस विटेवर उभा ।
वामांगी रखुमाई दिसे दिव्य शोभा।
पुंडलिकाचे भेटी परब्रम्ह आले गा ।
चरणी वाहे भीमा उद्धरी जगा ।

जयदेव जयदेव जय पांडुरंगा ।
रखुमाईवल्लभा राईच्या वल्लभा पावे जीवलगा ।। धृ ।।

तुळसी माळा गळा कर ठेवुनि कटी ।
कासे पितांबर कस्तुरी लल्लाटी ।
देव सुरवर नित्य येती भेटी ।
गरूड हनूमंत पुढे उभे राहती ।। जय देव ।।

धन्य वेणुनाद अनुक्षेपत्रपाळा ।
सुवर्णाची कमळे वनमाळा गळा ।
राई रखुमाबाई राणीया सकळा ।
ओवाळिती राजा विठोबा सावळा ।। जय देव ।।

धन्य पुष्पावती भीमासंगम ।
धन्य वेणूनाद उभे परब्रम्ह ।
धन्य पुंडलिक भक्त निर्वाण ।
यात्रेसी येती साधु सज्जन ।। जय देव ।।

ओवाळू आरत्या कुरवंड्या येती ।
चंद्रभागेमध्ये सोडुनिया देती ।
दिंड्या पताका वैष्णव नाचती ।
पंढरीचा महिमा वर्णावा किती ।। जय देव ।।

आषाढी कार्तिकी भक्तजन येती ।
चंद्रभागेमध्ये स्नान जे करती ।
दर्शन हेळामात्रे तया होय मुक्ती ।
केशवासी नामदेव भावे ओवाळिती ।। जय देव ।।
- संत नामदेव

तुळशीची आरती:-
जय देवी जय देवी जय माय तुळशी।
निजपत्राहुनि लघुतर त्रिभुवन हे ‍तुळशी ।।धृ।।
ब्रम्हा केवळ मुळी मध्ये तो शौरी।
अग्री शंकर तीथे शाखा परिवारी।।
सेवा करिती भावे सकळहि नरनारी।
दर्शनमात्रे पापें हरती निर्धारी।।१।।

शीतळ छाया भूतळव्यापक तूं कैसी।
मंजिरीची बहु आवड कमळारमणासी।।
तव दलविरहित विष्णू राहे उपवासी।
विशेष महिमा तुझा शुभ कार्तिकमासी।।२।।

अच्युत माधव केशव पीतांबरधारी।
तुझिया पूजनकाळी जो हे उच्चारी।।
त्यासी देसी संतति संपति सुखकारी।
गोसावीसुत विनवी मजला तू तारी।।३।।

घालिन लोटांगण:-
घालीन लोटांगण वंदीन चरण ।
डोळ्यांनी पाहिन रूप तुझे ।
प्रेमें आलिंगीन आनंद पूजन ।
भावे ओवाळिन म्हणे नामा ।।

त्वमेव माता पिता त्वमेव ।
त्वमेव बन्धु: सखा त्वमेव ।
त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव ।
त्वमेव सर्वं मम देवदेव ।।

कायेन वाचा मनसेंद्रियैर्वा ।
बुध्यात्मना वा प्रकृति स्वभावात् ।
करमि यद्यत् सकलं परस्मै ।
नारायणायेती समर्पयामि ।।

अच्युतं केशवं राम नारायणम्
कृष्णदामोदरं वासुदेवं भजे।
श्रीधरं माधवं गोपिकावल्लभम्
जानकीनायकं रामचंद्र भजे ।।

हरे राम हरे राम राम राम हरे हरे
हरे कृष्ण हरे कृष्ण कृ्ष्ण कृ्ष्ण हरे हरे ।।

।। मंगलमुर्ती मोरया ।।
।। गणपतिबाप्पा मोरया ।।

हनुमंताची आरती:-
सत्राणें उड्डाणें हुंकार वदनी ।।
करि डळमळ भूमंडळ सिंधुजळ गगनी ।।
गडबडिलें ब्रम्हांड धाके त्रिभुनवी ।।
सुरवर नर निशाचर त्या झाल्या पळणी ।। १ ।।

जय देव जय देव जय हनुमंता ।।
तुमचेनी प्रसादें न भी कृतांता ।। जय।। धृ ।।

दुमदुमली पाताळें उठिला प्रतिशब्द ।।
थरथरिला धरणीधर मानीला खेद ।।
कडकडिले पर्वत उडुगणउच्छेद ।।
रामी रामदासा शक्तपचा शोध ।।
जय देव जय देव जय हनुमंता ।। २ ।।

श्री महालक्ष्मीची आरती:-
जय देवी जय देवी जय महालक्ष्मी
वससी व्यापकरूपे राहे निश्चलरूपे तू स्थूलसुक्ष्मी. जय.....

करवीरपूर वासिनी सुरवर मुनिमाता
पुरहर वरदायिनी मुरहर प्रियकांता
कमलाकारे जठरी जन्मविला धाता
सहस्त्र वदनी भूधर नपुरे गुणगाता. जय.....

मातुल्लिंग गदा खेटक रविकिरणी
झळके हाटकवाटी पीयुष रसपाणि
माणिक रसना सुरंग वसना मृगनयनी
शशीकर वदना राजस मदनाची जननी. जय......

तारा शक्ती अगम्या शीवभजका गौरी
सांख्य म्हणती प्रकृती निर्गुण निर्धारी
गायत्री नीजबीजा निगमागमसारी
प्रगटे पद्मावती निजधर्माचारी. जय.....

अमृत भरिते सरिते अघदुरिते वारी
मारी दुर्घट असुरा भवदुस्तर तारी
वारी माया पटल प्रणमत परिवारी
हे रूप चिद्रुप दावी निर्धारी. जय.....

चतुराननाने कुश्चित कर्मांच्या ओळी
लिहिल्या असतिल माते माझे निजभाळी
पुसोनि चरणातळी पदसुमने क्षाळी
मुक्तेश्वर नागर क्षीरसागर बाळी. जय.....

मंत्र पुष्पांजली:-
ॐ यज्ञेन यज्ञमयजन्त देवास्तनि धर्माणि प्रथमान्यासन् ।
ते ह नाकं महिमान : सचंत यत्र पूर्वे साध्या : संति देवा : ।।
ॐ राजाधिराजाय प्रसह्य साहिने ।
नमो वयं वैश्रवणाय कुर्महे ।
स मस कामान् काम कामाय मह्यं।
कामेश्र्वरो वैश्रवणो ददातु कुबेराय वैश्रवणाय ।
महाराजाय नम: ।
ॐ स्वस्ति। साम्राज्यं भौज्यं स्वाराज्यं
वैराज्यं पारमेष्ठ्यं राज्यं महाराज्यमाधिपत्यमयं
वैराज्यं पारमेष्ठ्यं राज्यं महाराज्यमाधिपत्यमयं
समंतपर्यायीस्यात् सार्वभैम: सार्वायुष आं
तादापरार्धात् पृथिव्यै समुद्रपर्यंताया एकेराळिति
तदप्येष: श्लोको भिगीतो मरूत: परिवेष्टारो
मरूतस्यावसन् गृहे ।
आविक्षितस्य कामप्रेर्विश्र्वेदेवा: सभासद इति ।।

एकदंतायविघ्महे वक्रतुण्डाय धीमहि ।
तन्नोदंती प्रचोदयात् ।

मंत्रपुष्पांजली समर्पयामि ।।
।। गणपतिबाप्पा मोरया ।।

श्री गजानन महाराजांचे शेगाव:-


शेगावमधली ती भर उन्हाळ्यातील दुपार होती. रणरणतं ऊन आसमंतात व्यापलं होतं. तेवढ्यात एका वडाच्या झाडाखाली एक विचित्रसा वाटणारा पण तेजःपुंज तरुण फेकून दिलेल्या पत्रावळीवरील अन्नाची शीत वेचून खात होता. त्याच्या तोंडातून 'गण गण गणात बोते' असा नामघोष चालला होता. त्या नामघोषात त्या तरुणाला रणरणत्या उन्हाचंही काही वाटत नव्हतं. गजानन महाराजांच पहिलं दर्शन असं झालं. बंकटलाल आणि दामोदर या दोघा तरुणांनी महाराजांना प्रथम पाहिलं आणि त्यांच्या त्या विचित्र वागण्यापेक्षाही त्यांच्या चेहर्‍यावरच्या तेजस्वी भावानेच हे त्यांच्याकडे आकर्षित झाले.

हे कोणी दिव्य पुरूष आहेत, याची त्यांना खात्री पटली. म्हणून ते त्यांना गावात घेऊन आले. लोकही त्यांना पाहायला गर्दी करू लागले. त्यांना पंचपक्वान्न, कपडे, दागिने असे काही वाहायला लागले. महाराज निरिच्छपणे ते सगळं फेकून देत असत. त्यांच्या वागण्याचा अदमास कुणालाही येत नसे. ते कुठेही झोप. काहीही खात आणि कपडे घातले तर घातले नाही तर दिगंबरावस्थेतही ते असत.

जगापासून ते स्वतःला तोडण्याचा प्रयत्न करत असत. भौतिक जगतात त्यांचे मन अजिबात रमत नव्हते. पण त्यांच्या विक्षिप्तपणाआड एक अतिशय विद्वान दिव्य पुरूष लपला आहे, याची जाणीवही हळू हळू होऊ लागली. त्यांच्या वेदशास्त्रसंपन्नतेचा दाखला लोकांनाही मिळाला. त्यांची तपश्चर्याही मोठी असल्याची जाणीव लोकांना झाली. त्यांच्यातला योगीही दिसून आला. एवढेच नव्हे, तर प्राण्यांची भाषाही या अवलियाला येत होती, हेही लोकांना कळले.

त्यांची कीर्ती सगळीकडे पसरू लागल्यानंतर मोठमोठी मंडळी त्यांना भेटायला येऊ लागली. दस्तूरखुद्द लोकमान्य टिळकांनीही त्यांची भेट घेतली होती. अकोल्यात शिवजयंतीसंदर्भात झालेल्या एका सभेला, टिळकांबरोबर गजानन महाराजही व्यासपीठावर बसले होते. लोकमान्य आणि अमरावतीचे दादासाहेब खापर्ड्यांसमवेत ते अकोल्यातील प्रभू रामचंद्राच्या मंदिरात दर्शनालाही गेले होते. श्री वासुदेवानंद सरस्वतीही महाराजांना भेटायला शेगावला आले होते. शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रातील अनेक मंडळी महाराजांना भेटायला येऊ लागली.

सिद्ध योगी असल्याने अनेक चमत्कारही ते करत. अत्यंत कनवाळू असल्याने कुणाचं दुःख त्यांना पाहवत नसे. खरे तर त्यांच्याकडे येणारी गांजलेली मंडळी त्यांना पाहताच आपलं दुःख विसरून जात असत. महाराज त्यांना त्यांच्या दुःखावर उपाय सांगत असत. लोकांच्या दुःखा ची नस त्यांना चांगलीच कळलेली असे. त्यामुळे त्यांच्या सल्ल्याने त्या व्यक्तीचं भलं झाल्याशिवाय राहत नसे. त्यामुळे लोक भक्तिभावाने त्यांच्याकडे येत.

महाराजांची कीर्ती पुढे वाढतच गेली. विदर्भात तर घरांघरांत ते माहीत होते. पण उर्वरित महाराष्ट्रात आणि शेजारच्या राज्यातही त्यांची कीर्ती वाढत गेली. विदर्भात तर महाराजांना नैवेद्य दाखविल्याशिवाय न जेवणारी मंडळी आजही आहेत. अनेकांनी त्यांना आपले गुरू मानले व त्यांची पूजा सुरू केली. महाराष्ट्रभर त्यांची मंदिरं स्थापली गेली.

महाराजांची कीर्ती वाढत गेल्यानंतर त्यांनी स्वतःच आपल्या शिष्यांना ट्रस्ट स्थापन करायला सांगितला. त्यानंतर मग गजानन महाराज संस्थान या नावाने १९०८ मध्ये ट्रस्ट स्थापन झाला. या ट्रस्टच्या माध्यमातून अनेक सामाजिक कामे केली जाऊ लागली. हे कार्य आजही चालू आहे. हिंदूच्या अनेक धर्मस्थळी या ट्रस्टच्या उत्तम सुविधा असलेल्या धर्मशाळा आहेत.

हे सगळं करत असताना महाराजांचे भौतिक जगातील लक्ष उडून गेले होते. एके दिवशी त्यांनी पंढरपूरला आषाढी एकादशीला समाधी घेण्याच निर्णय जाहीर केला. त्यांच्या या निर्णयाने भक्तांना मोठा धक्का बसला. दुःखाची एक लाटच पसरली. भक्तांनी त्यांना समजविण्याचा खूप प्रयत्न केला. पण महाराज निर्णयावर ठाम होते. त्यांनी समाधीपूर्वी दीड महिना आधी आपल्या मृत्यूचा दिवस आणि वेळ सांगितली होती. शिवाय आपली समाधी कुठे बांधावी हेही सांगितले होते.

त्यानुसार भाद्रपद शुद्ध पंचमीचा अर्थात ऋषी पंचमी, शके १८३२, गुरुवार दिनांक ८ सप्टेंबर १९१० रोजीचा तो दिवस उजाडला. या दिवसावरच एक काळे सावट होते. दुःखाची सावली जणू पडली होती. ठरवल्याप्रमाणे महाराजांनी या दिवशी समाधी घेतली आणि अवघ्या महाराष्ट्राच्या दुःखाला पारावर उरला नाही. भक्तांना सैरभैर झाल्यासारखं झालं. जीवनात जणू 'राम' राहिला नाही, असं वाटलं. कारण एक चैतन्य अनंतात विलीन झालं होतं. त्यांच्या समाधीच्या दर्शनासाठी भक्तांचा जणू सागर शेगावात उसळला. भक्तच काय पण महाराजांचं ज्या पशूपक्ष्यांवर प्रेम होतं, तेही रडत असल्याचे सांगितले जाते.

पण तिकडे महाराजांच्या मुखावर मात्र नेहमीचंच हास्य होतं. निर्वाणाला गेलेल्या अवलियाने जाताना मात्र सगळ्यांना सुखाचा समाधानाचा आणि मुक्तीचा मंत्र सांगितला होता. हा मंत्र होता,
अर्थातच 'गण गण गणात बोते. गण गण गणात बोते.'
जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती असे म्हटलेच जाते. शेगावचे श्री गजानन महाराजही त्यातलेच एक. शेगाव येथे त्यांचे समाधी मंदिर आहे.

श्री गजानन महाराज दिगंबर वृत्तीचे सिद्ध कोटीचे साधू होते. मिळेल ते खाणे, मिळेल त्या जागी राहणे, नेहमी भ्रमण करणे अशी त्यांची नित्याचीच दिनचर्या होती. त्यांच्या मुखात परमेश्वराचेच नामस्मरण, भजन असायचे.

भक्तांची संकटे दूर करून त्यांना परमेश्वराचे दर्शन घडवून देण्याचे शेकडो उदाहरणे त्यांच्या चरित्रात सामील आहेत. महाराष्ट्रातील प्रमुख तीर्थस्थानांमध्ये गणले जाणारे शेगाव स्थित गजानन महाराजांच्या मंदिरात दर्शनासाठी नेहमीच भाविक गर्दी करतात.

कसे पोहचाल?
महाराष्ट्राच्या बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव, सेंट्रल रेल्वेच्या मुंबई-नागपूर मार्गावर आहे. गीतांजली एक्सप्रेस सोडून इतर सर्व रेल्वेगाड्या येथे थांबतात. स्टेशनच्या बाहेरून मंदिरापर्यंत पायी गेल्यास फक्त 15 मिनिटाचा रस्ता आहे.

स्टेशनपासून मंदिरापर्यंत येण्या-जाण्यास मोफत बससेवा उपलब्ध आहे. महाराष्ट्रातून येथे 172 बस येतात. त्या व्यतिरिक्त देवास-उज्जैन, पैठण, पंढरपूर या स्थानकांहूनही बस चालतात.


श्री गजानन महाराजांचे मंदिर शहराच्या मधोमध स्थित आहे. मंदिराच्या महाद्वाराच्या खिडक्या रात्रभर उघड्याच असतात. श्रींची समाधी मंदिराच्या गुहेत आहे. मंदिर परिसरात वर्षभर भजन आणि प्रवचन असते. रोज सकाळी पाच वाजेपासून रात्री 9.30 पर्यंत पूजा-अर्चना विधिवत चालते. काकड आरती ते शयन आरतीपर्यंत नियमित रूपाने विविध कार्यक्रम चालतात.

प्रमुख उत्सव:-
श्री गजानन महाराजांचा प्रकट दिवस (फेब्रुवारी महिन्यात) तसेच त्यांची पुण्यतिथी (ऋषी पंचमीला) हे येथील प्रमुख उत्सव आहेत. त्यावेळी येथे रोषणाई केली जाते. श्रींची हत्ती, घोडा, रथ पालकी, दिंडी इत्यादींसोबत मिरवणूक निघते.

राहण्यासाठी व्यवस्था:-
भाविकांच्या सुविधेसाठी भव्य 'भक्त निवास' मंदिर परिसरातच बांधले आहे. त्याठिकाणी अगदी स्वस्तात खोल्या मिळतात. भाविक पाच दिवसांपेक्षा जास्त दिवस या खोल्यांमध्ये राहू शकत नाहीत. त्या ठिकाणी भोजन कक्षेचीही व्यवस्था आहे. सकाळी अकरा ते एक पर्यंत महाराजांचा प्रसाद दिला जातो. रोज येथे जवळपास पाच हजारांवर लोक जेवण करतात. या मंदिरात दररोज वीस हजार भाविक दर्शनासाठी येतात.

अन्य आकर्षण:-
शहराच्या झगमगाटापासून लांब असलेल्या शेगावात साधे आणि महाराष्ट्रातील ग्रामीण जीवनाच्या सहजतेची झलक पाहावयास मिळते. आध्यात्मिक शांतीच्या शोधात असणार्‍या भाविकांसाठी हे ठिकाण सर्वोत्तम आहे. मंदिराच्या परिसरातच धार्मिक वाचनालय असून भाविकांसाठी सतत खुले असते. जवळच 'गजानन वाटिका' नावाचे सुंदर उद्यान आणि एक प्राणी संग्रहालय देखील आहे.