I made this widget at MyFlashFetish.com.

Thursday, January 29, 2009

देवाधर्माचा विचार हा एकतर म्हातारपणात करावयाचा असतो किंवा काही अडीअडचणींचा सामना करावयाचा असेल तेव्हा देवाची आठवण होते। तरूणपणात सर्वप्रकारची मौजमजा करून घ्या, मग म्हातारपणात देवाधर्माकडे लक्ष द्यायचेच आहे, असा एक मतप्रवाह आपल्या समाजात रूढ असले आढळतो. कोणी तरूणपणात किंवा प्रौढवयात देवाधर्माकडे वळला की 'करुन करुन भागला, देवपूजेला लागला' ही लोकप्रिय म्हण त्याच्या संदर्भात वापरली जाते। हे कितपत बरोबर आहे?
ज्ञानेश्वरमाऊलींनी अगदी कोवळया वयात 'ज्ञानेश्वरी'सारखा महान अध्यात्मपर ग्रंथ लिहिला। त्यांचे वय झाले होते का? कितीतरी साधुसंत असे आहेत की ते बालवयापासूनच परमार्थाच्या ओढीने वागत होते, जगत होते. परमार्थाकडे वळला की सांसारिक विषय त्याज्य होतात, असे जे समजले जाते ते कितपत बरोबर आहे? म्हणजे असे, की देवाधर्माचे नाव घ्यावयाचे तर त्यासाठी काही अडीअडचणीच यायला पाहिजेत असे आहे का? अडचणींच्या वेळी देवाची आठवण केली तर ते तहान लागल्यावर विहीर खणल्यासारखे होणार नाही का? असे वागणे कितपत योग्य आहे?
मी नेहमी एक दृष्टांत सांगतो। कोणाही माणसाला तुम्ही अडीअडचणींच्या वेळी हाक मारली तर तो ओळखीपाळखीचा असेल तरच तुमच्या हाकेला चटकन धावून येणार, अनोळखी असेल तर तो तसा धावून येईलच याची खात्री नाही. धावून आला तरी तो तुमच्यासाठी काही जीवाला तोशीस लावून घेईल याचाही भरवसा नाही. जर माणसाच्याबाबतीत ओळखीपाळखीला इतपत महत्त्व आहे तर देवाशीसुद्धा आपली जानपहेचान असायला हवी की नको! ती तशी असेल तरच आपण हाक मारल्यावर तो धावून येईल.
किमानपक्षी त्याने तसे धावून यावे अशी अपेक्षा आपल्याला बाळगता येईल। आपण त्याच्यासाठी काही करावयाचे नाही आणि त्याने मात्र आपण सांगू ते काम ऐकावे, आपण म्हणू तेव्हा धावून यावे, ही अपेक्षा कितपत योग्य आहे? आपण व्यवहारातले दाखले ईश्वराच्या विषयातही वापरतो। आपल्या ज्या नीतिमत्तेच्या कल्पना आहेत त्यांचे आदर्श आपण देवांपासून उचलले आहेत. 'न देव चरितम् चरेत्' असे म्हटले असले तरी सर्वसामान्यत: देवाप्रमाणेच आपण वागावे. निदान तसा प्रयत्न करावा. रामाप्रमाणे खरे बोलावे, कृष्णाप्रमाणे जवळच्या लोकांना मदत करावी, मारूतीप्रमाणे परोपकारी असावे असे वाटतेच ना! मग ते देवसुद्धा काही अपेक्षा ठेवूनच वागत असले तर त्यात त्यांची चूक म्हणता येईल का? देवाची भक्ती म्हणजे संसाराकडे पाठ फिरविणे नव्हे. जे लोक सर्वसंग परित्याग करून देवाकडे वळतात त्यांची गोष्टच वेगळी. ते समाजासमोर आदर्श ठरतात, वंद्य ठरतात पण इतरांनीही आपल्या मगदूराप्रमाणें ह्या मार्गानें चालायला काय हरकत आहे? राजमार्गावरून शाही वाहने डौलाने चालत असतात हे खरे पण पादचाऱ्यांनाही त्या मार्गावरून चालण्याचा हक्क असतोच. तसेच या विषयात आहे. ज्यांनी परमेश्वरी उपासना हे जीवनध्येय मानले आहे त्यांची गोष्ट वेगळी पण ज्यांनी तसे मानले नसेल त्यांनीसुद्धा यथाशक्ती, यथामती देवधर्माकडे लक्ष पुरविले पाहिजे. कारण आपली धर्मपरंपरा ही फार प्राचीन आहे आणि आपल्याकडे ज्या गोष्टी देवाधर्माच्या विषयात रूढ झाल्या त्या प्रदीर्घ काळात तावूनसुलाखून निघालेल्या आहेत. त्या सर्वच गोष्टींच्याबाबतीत आपल्याला पूर्ण ज्ञान असेल अशी अपेक्षा बाळगण्यात अर्थ नाही. पण एक गोष्ट नक्की, आज ज्या गोष्टींबद्दल आपणांस पूर्ण ज्ञान नाही ते काही काळानंतर मिळू शकते. आपल्याकडे विविध वनस्पतींचा उपयोग पूजाअर्चांमध्ये केला गेला तो तसा करण्यात केवढा तरी व्यावहारिक दृष्टिकोन आहे. तुळस, बेल, दुर्वा ह्या अतिशय प्रभावी अशा औषधी वनस्पती आहेत. त्या देवाला वाहाण्याचा परिपाठ एवढयासाठीच केला की ह्या वनस्पतींची लागवड, निपज आणि जोपासना नीटपणे केली जावी. आपल्या अंगणातलीच फुले देवाला वाहाणे प्रशस्त समजले जाण्यात पर्यावरणाचा, वृक्षवेलींच्या संवर्धनाचा एक फार मोठा हेतू होता. आपल्या मूर्तीपूजनाला कोणी कितीही नावे ठेवली तरी त्यामागचा व्यावहारिक हेतूसुद्धा अतिशय उदात्त स्वरूपाचा आहे. रोज देवपूजा झाली पाहिजे, देवावरचे फूल कधी चुकता कामा नये, अशी समाजधारणा होती. ही समाजधारणा का होती? त्या निमित्ताने रोज स्नान आवश्यक ठरते. आंघोळ केल्याशिवाय देवाजी पूजा कशी करणार? नीट विचार केलात तर वरवर निरर्थक वाटणाऱ्या गोष्टीतही, 'साध्याही विषयात आशय कधी मोठा किती आढळे' हा अनुभव आपल्याला येतो. आता बदलत्या काळात काही गोष्टी त्याज्य ठरतील, रद्द ठरतील, कालबाहयही होतील त्या वगळल्या तरी चालेल पण जोपर्यंत त्यांची निरर्थकता आपल्या प्रत्ययाला येत नाही आणि त्यापासून काही नुकसान होत नाही अशा साध्या-साध्या गोष्टी नेहमीच्या आचरणात असल्या तर काय बिघडले? पुन्हा त्या आचरणात आणल्यापासून आपला सामाजिक, सार्वजनिक अभ्युदय होत असेल, मन:शांती लाभत असेल, तर त्यात कोणते नुकसान?
साम्भार - जयंत साळगांवकर

1 comment:

Abhijit said...

गुरुजी, आपला ईमेल आयडी मिळेल काय?
धन्यवाद!