I made this widget at MyFlashFetish.com.

Tuesday, August 4, 2009

रक्षाबंधनाचे महत्त्व:-

रक्षाबंधन व नारळी पौर्णिमा हे दोन पवित्र सण एकाच दिवशी साजरे करण्यात येतात. प्राचीन व महाभारतकालीन ग्रंथातही या सणाचा संदर्भ सापडतो. देव व असुर यांच्यातील संघर्षात देवांचा जय झाल्यानंतर या सणास सुरूवात झाल्याचेही मानण्यात येते. दंतकथेनुसार देव व असुर यांच्यातील युद्धात देवांची पीछेहाट होत असलेली बघून देवराज इंद्र यांनी युद्धात भाग घेण्याचा निर्णय घेतला. इंद्राची पत्नी इंद्राणीने त्याच्या हातात रक्षाबंधन केले. यामुळे त्यांना युद्धात विजय प्राप्त झाला. पुराणांनुसार श्रावण पौर्णिमेस पुरोहितांनी दिलेले आशीर्वाद पवित्र मानले जातात.

या सणांस धर्मबंधनाचे स्वरूपही आहे. मध्ययुगीन भारतात बाहेरील आक्रमकांपासून महिलांचे सरंक्षण करण्यासाठी हा सण साजरा करण्यात येत होता. तेव्हापासून भावाच्या मनगटावर राखी बांधण्याच्या पवित्र संस्कृतीस सुरूवात झाली. महाराष्ट्रात नारळी पौर्णिमा म्हणून प्रचलित असलेल्या ह्या सणाच्या दिवशी पर्जन्यदेवता वरूण राजाची आराधना करण्यात येते.

या पवित्र दिवशी बहीण भावास अक्षता लावून ओवाळते व राखी बांधते. भाऊही आपल्या लाडक्या बहिणीस दागिने, कपडे यासारख्या भेटवस्तू देतात. रक्षाबंधनास सलोनो नावानेही ओळखले जाते. श्रावण पौर्णिमेच्या दिवशी पवित्र नदी किंवा तळ्यात स्नान करून सूर्यदेवास अर्घ्यदान करण्यात येते. गावानजीक नदी नसल्यास विहिरींवरही ही पूजा केली जाते. ब्राह्मण या दिवशी जुन्या जानव्याचा त्याग करून नवीन जानवे धारण करतात. श्रावण महिन्यातील पौर्णिमेस श्रावण नक्षत्र असल्यास त्यास अनुकूल व लाभदायक मानण्यात येते.

आश्विनीपासून रेवतीपर्यंत 27 नक्षत्रात श्रावण नक्षत्राचा क्रम बावीसावा आहे. या नक्षत्राचा स्वामी चंद्र आहे. श्रावण महिन्यातील अंतिम तिथीस येणार्‍या श्रवण नक्ष‍त्राच्या पौर्णिमेस म्हणूनच श्रावणी म्हणण्यात येते. या दिवशीच रक्षाबंधनाचा सण साजरा करण्यात येतो.

श्रावण आणि रक्षाबंधन;-
'श्रवण' नक्षत्रात बांधला जाणारे रक्षासूत्र अमरत्त्व, निर्भरता, स्वाभिमान, कीर्ति, उत्साह तसेच स्फूर्ती प्रदान करणारे आहे. पौराणिक काळात पत्नी पतीच्या सौभाग्यासाठी रक्षासूत्र बांधत असे. मा‍त्र, परंपरेत बदल घडून बहिण-भाऊ यांच्यातील निस्सिम प्रेमाचे प्रतीक म्हणून रक्षाबंधन हा उत्सव मोठ्या उत्सवात साजरा केला जातो.

ज्योतिषशास्त्रानुसार श्रावण मासचे नामकरण 'श्रवण' नक्षत्रावरून झाले आहे. तर श्रवण नक्षत्राचे नामकरण मातृ-पितृ भक्त श्रावणकुमारच्या नावावरून झाले आहे. श्रवण नक्षत्रात तीन तारे असतात. ते तीन चरणांची (विष्णूची वामनावतारातील तीन पद) प्रतीके आहेत. याचप्रमाणे अभिजीत नक्षत्र दशरथ राजा यांचे प्रतीक आहे.

उत्तरा भाद्रपद नक्षत्र स्त्री-पुरुषांची जोडी असून श्रावणकुमारचे आई-वडील आहेत. उत्तराषाढ नक्षत्र हे दशरथ राजाचे व्यासपीठ असून पूर्वाभाद्रपदावर श्रावणकुमार आपल्या आई-वडीलांसोबत स्थानबध्द झाले आहेत.

श्रावण महिन्यात सूर्य कर्क राशीत प्रवेश करत असतो. कर्क राशी ही जलचर राशी आहे. दशरथ राजाने श्रावणी पौर्णिमेला आपल्या पापाचे प्रायश्चित घेतले होते. त्याचप्रकारे पृथ्वीवरील लोक श्रावण मासात अधिक कर्मकांड करताना दिसतात. श्रावण मास अध्ययन व अध्यापनासाठी श्रेष्ठ मानला जातो. 28 नक्षत्रांमध्ये श्रावणाने विशेष महत्त्व प्राप्त केले आहे. श्रावण नक्षत्रात ज्यांचा जन्म होतो, ते स्वभावाने पराक्रमी, स्वाभिमानी, सहनशील, स्पष्टवादी व सेवाभावी असतात. तसेच ते चांगली प्रगती साधतात. परंतु शत्रूच्या भी‍ती पोटी चांगले कार्य अर्ध्यातून सोडून देत असतात.

रक्षासूत्र व श्रवण नक्षत्र यांचाही संबंध आहे. मोहरी, केशर, चंदन, अक्षदा, दूर्वा, सूवर्ण आदी कापडात बांधून ते पुरुषांच्या उजव्या व महिलांच्या डाव्या हातावर बांधून रक्षाबंधन पूर्वी केले जात होते. मात्र काळानुरूप परंपरेत परिवर्तन घडून आल्याने रक्षाबंधन भाऊ-बहिणीचा उत्सव झाला आहे. या दिवशी बहिण भावाच्या उजव्या हातावर राखी बांधून भावाच्या रक्षणासाठी प्रार्थना करते मात्र त्यासोबत त्याच्यावर असलेल्या कर्तव्यांची जाणीव ही करून देत असते.

No comments: