I made this widget at MyFlashFetish.com.

Tuesday, July 28, 2009

श्रावणी सोमवारचे व्रत:-



श्रावणी सोमवारच्या व्रतात भगवान शिव आणि पार्वतीची पूजा केली जाते. हे सोमवारचे व्रत तीन प्रकारचे असते. सोमवार, सोळा सोमवार आणि सौम्य प्रदोष. सोमवार व्रताचा विधी सर्व व्रतांत सारखाच असतो. हे व्रत श्रावण महिन्यात सुरू करणे शुभ मानले जाते.

श्रावणी सोमवारचे व्रत सूर्यादयापासून प्रारंभ करून तिसर्‍या प्रहरापर्यंत केले जाते. शंकराच्या पूजेनंतर सोमवार व्रताची कथा ऐकणे गरजेचे आहे. हे व्रत करणार्‍याने दिवसातून एकदाच जेवायला हवे.

श्रावणी सोमवारी ब्रह्म मुहूर्तावर उठावे.
पूर्ण घराची स्वच्छता करावी व स्नान करावे.
गंगा जल वा पवित्र पाणी घरात शिंपडावे.
घरातच किंवा पवित्र ठिकाणी भगवान शिवाची मूर्ती वा चित्र ठेवावे.

पूजेची तयारी झाल्यानंतर खालील मंत्राने संकल्प करा:-

'मम क्षेमस्थैर्यविजयारोग्यैश्वर्याभिवृद्धयर्थं सोमव्रतं करिष्ये'

त्यानंतर खालील मंत्राने ध्यान करा:-
'ध्यायेन्नित्यंमहेशं रजतगिरिनिभं चारुचंद्रावतंसं रत्नाकल्पोज्ज्वलांग परशुमृगवराभीतिहस्तं प्रसन्नम्‌।
पद्मासीनं समंतात्स्तुतममरगणैर्व्याघ्रकृत्तिं वसानं विश्वाद्यं विश्ववंद्यं निखिलभयहरं पंचवक्त्रं त्रिनेत्रम्‌॥

ध्यानानंतर 'ऊँ नमः शिवाय' हा मंत्र म्हणून शिव व पार्वतीची षोडषोपचारे पूजा करा.
पूजेनंतर व्रताची कहाणी ऐका.
त्यानंतर आरती करून प्रसाद वाटा.
मग भोजन वा फलाहार घ्या.

श्रावणी सोमवार व्रताचे फळ:-
सोमवारचे हे व्रत नियमितपणे केल्यास भगवान शिव व पार्वतीची कृपा आपल्यावर होते.
जीवनात संपन्नतेचा अनुभव येतो.
सर्व संकटांना भगवान शिव दूर करतात.

मंगळागौरीचे व्रत:-

श्रावण महिन्याला शुद्ध आणि सात्विकतेचे आवरण आहे. म्हणूनच या महिन्यात अनेक सण समारंभ साजरे केले जातात. अगदी घरगुती सणांचाही हा महिना आहे. लग्न झालेल्या मुलींची मंगळागौर ही याच महिन्यातील मंगळवारी साजरी केली जाते. पूर्वजांनी अतिशय कल्पकतेने धार्मिकतेशी याचा संबंध जोडून महिलांच्या कला-गुणांना आणि मुख्य म्हणजे रिलॅक्स व्हायला या सणाची योजना केली आहे. रोजच्या कामाच्या धबडग्यात हरवलेल्या महिला मंगळागौरीच्या निमित्ताने धमाल करून तोपर्यंतचे कष्ट, श्रम विसरतात आणि ताज्यातवान्या होतात.

असे करतात मंगळागौरीचे व्रत:-
आता मंगळागौरीच्या व्रताविषयी माहिती घेऊ. नवीन लग्न झालेल्या मुली हे व्रत करतात. श्रावणातील चारी मंगळवारी देवी अन्नपूर्णेच्या मूर्तीची पूजा करायची असते. या पूजेसाठी पाच नवविवाहितांचीही गरज असते. या पूजा करणाऱ्या मुलींना वशेळ्या असे म्हटले जाते. या मुलींना काही वस्तूंचे वाण दिलं जातं. लग्न झाल्यापासून पुढील पाच वर्षे ही पूजा करायची असते. लग्न झाल्यावर पहिल्याच वर्षी माहेरी आणि सासरी एक मंगळवार धरून हीच पूजा मोठ्या समारंभपूर्वक केली जाते.

ही पूजा म्हणजे जणू अन्नपूर्णेचा सोहळा असतो. तिला उष्णोदकाने स्नान घातले जाते. नंतर तिला शृंगारण्यात येते. त्यासाठी वेगवेगळी फुले वाहिली जातात. त्याचबरोबर जाई, जुई, मोगरा, गुलाब अशा फुलझाडांच्या पत्रीही वाहिल्या जातात. अत्तर अन् काजळही लावले जाते. नंतर दागिने घातले जातात. या दागिन्यांचे वैशिष्ट्य म्हणजे ते धातूचे अथवा मण्यांचे नसतात. कणकेत हळद आणि तेल लावून तसेच घट्ट भिजवून दागिने तयार केले जातात. या दागिन्यांद्वारे देवीला शृंगारण्यात येते.

पूजेनंतर पिठाच्या किंवा पुरणाच्या दिव्यांनी आरती करतात. मंगळागौरीची कहाणी वाचतात. गोडधोडाचा नैवेद्य देवीला दाखवून भोजन केले जाते. दुपारनंतर देवीच्या पूजेच्या चौरंगावर सुशोभित मांडणी केली जाते. त्यासाठी सुगंधी फुले तसंच शोभेची पाने फुले वापरली जातात. त्यानंतर या देवीचे जागरण केले जाते. त्यासाठी आजूबाजूच्या मुली, बायका, नवविवाहिता यांना बोलावले जाते. या रात्री जेवत नाहीत त्याऐवजी फराळ केला जातो. म्हणजे भाजके अन्न ग्रहण करण्याची पद्धत आहे.

जागरणाची धमाल:-
फराळांनंतर देवीची आरती होते. आरतीनंतर पूजा करणार्‍या सुवासिनींनी नावे घेण्याची पद्धत आहे. रात्रभर फुगड्या, झिम्मा, पिंगा, बसफुगडी, टिपऱ्या खेळून रंगीत दोऱ्यांचा गोफ विणणे असे खेळ खेळले जातात. यासाठी एक लिंबू बाई दोन लिंबू झेलू, किस बाई किस दोडका किस यासारखी पारंपरिक गाणी म्हटली जातात. प्रामुख्याने ही गाणी माहेरचे वर्णन करणारी असतात. सासर आणि सासरच्या मंडळींना अनेक गाण्यांतून चांगले टोमणे लगावले जातात.

जिवत्या : नागनरसोबा:-



*श्रावण महिन्यांत सुवासिनी स्त्रिया जिवतीची पूजा दर शुक्रवारी करतात. छार्पाल नागनरसोबाची चित्रे मिळतात.
त्यांची पूजा करतात. नागपंचमीच्या दिवशी नागचित्राची पूजा व चार शनिवारी नरसोबाची पूजा,
चारी बुधवारी बुधाची पूजा व गुरुवारी बृहस्पतीची पूजा करतात.

*प्रत्येक पूजेच्या वेळी कापसाची गजमाळ व आघाडा, दूर्वा यांची माळ वाहतात. दर शुक्रवारी जिवत्यांची पूजा, पुरणाचा नैवेद्य व आरती करतात. सुवासिनी व लेकुरवाळी स्त्री सवाष्ण म्हणून बोलावतात. संध्याकाळी सुवासिनींना हळदी कुंकवास आमंत्रण देऊन दूध-साखर व फुटाणे देतात. मुलाबाळांच्या सुखरूपतेसाठी जिवतीची पूजा करण्याची पद्धत आहे.

कहाणी नागपंचमीची:-
ऐका नागोबा देवा, तुमची कहाणी, एक नगर होतं. तिथं एक ब्राह्मण होता. त्या ब्राह्मणाला पाच सात सुना होता. चातुर्मासात श्रावणमास आला आहे. नागपंचमीचा दिवस आहे. कोणी आपल्या आजोळी, कोणी पंजोळी, कोणी माहेरी अशा सर्व सुना गेल्या आहेत. सर्वांत धाकटी सून होती. तिच्या माहेरचं कोणीच नव्हतं. तेव्हा ती जरा खिन्न झाली व मनात माझा सर्वसंबंधी नागोबा देव आहे असं समजून नागोबा देव मला माहेराहून न्यायला येईल. असं म्हणू लागली.

शेषभगवानास तिची करुणा आली. त्यानं ब्राह्मणाचा वेष घेतला व त्या मुलीला नेण्याकरिता आला. ब्राह्मण विचारात पडला. हा इतके दिवस कुठं लपून राहिला व आताच कोठून आला. पुढं त्यानं मुलीला विचारलं तिनंही हाच माझा मामा असं सांगितलं. ब्राह्मणानं तिची रवानगी कली. त्या वेषधारी मामानं वारूळात नेलं. खरी हकीकत तिला सांगितली आणि फणीवर बसवून आपल्या बायकामुलांना ता‍कीद दिली की, हिला कोणी चावू नका!

एके दिवशी नागाची नागीण बाळंत होऊ लागली. तेव्हा तिला हातात दिवा धरायला सांगितला. पुढं ती व्याली. तिची पिलं वळवळ करी लागली. ही मुलगी भिऊन गेली. हातातला दिवा खाली पडला. पोरांची शेपटं भाजली. नागीण रागावली. सर्व हकीकत नवर्‍याला सांगितली. तो म्हणाला, तिला लौकरच सासरी पोचवू. पुढं ती पूर्ववत् आनंदानं वागू लागली. ऐके दिवशी मुलीला अपार संपत्ती दिली. आपण मनुष्यदेह धारण करून, तिला सासरी पावती केली.

नागाची पोरं मोठी झाली. आपल्या आईपाशी चौकशी केली, आमची शेपटं कशान तुटली? तिनं मुलीची गोष्ट सांगितली. त्यांना फार राग आला. हिचा सूड घ्यावा म्हणून पाटावर व भिंतीवर नागाची चि‍त्रं काढली, त्यांची पूजा केली, जवळ नागाणे, लाह्या, दूध वगैरे ठेवलं. उकडीचा नैवेद्य दाखवला. हा सर्व प्रकार नागांची पिलं पहात आहेत. सरतेशेवटी तिनं देवाची प्रार्थना केली, जय नागोबा देवा, जिथं माझे भाऊ लांडोबा, पुंडोबा असतील तिथं खुशाल असोत, असं म्हणून नमस्कार केला. इकडे सर्व प्रकार ह्यांनी पाहून मनातील सर्व राग घालविला. मनात हिच्याविषयी दया आली. पुढं त्या दिवशी तिथं वस्ती केली, दूध, पाणी ठेवतात त्यात पहाटेस एक नवरत्नांचा हार ठेवून निघून गेले. दुसर्‍या दिवशी हार उचलून गळ्यात घातला. तर जसा तिला नागोबा प्रसन्न झाला तसा तुम्हां आम्हां होवो. ही साठा उत्तराची कहाणी, पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण.