I made this widget at MyFlashFetish.com.

Sunday, August 23, 2009

कहाणी ऋषिपंचमीची:-

ऐका ऋषीश्वरांनो तुमची कहाणी. आटपाट नगर होतं. तिथं एक ब्राह्मण होता. तो आपला शेतीभाती करून सुखानं नांदत होता. एके दिवशी त्याची बायको शिवेनाशी झाली. विटाळ तसाच घरात कालविला. त्या दोषानं काय झालं? तिचा नवरा पुढच्या जन्मी बैल झाला. त्या बाईला आपला कुत्रीचा जन्म आला. देवीची करणी! दोघंही आपल्या मुलाच्या घरी होती. तो मोठा धार्मिक होता. देवधर्म करी, श्राद्धपक्ष करी, आल्या ब्राह्मणांचा समाचार घेई.

एके दिवशी त्याच्या घरी श्राद्ध आलं. बायकोला सांगितलं, आज माझ्या आईचं श्राद्ध आहे, खीरपुरीचा सैंपाक केला. इतक्यात काय चमत्कार झाला? खिरींचं भांडं उघडं होतं. त्यात सर्पानं आपलं गरळ टाकलं. हे त्या कुत्रीनं पाहिलं. मनात विचार केला, ब्राह्मण खीर खातील नि मरून जातील. मुलाला ब्रह्महत्येचं पाक लागेल. म्हणून उठली, पटकन खिरीच्या पातेल्याला शिवली. ब्राह्मणाच्या बायकोला राग आला. तिनं जळतं कोलीत घेतलं नि कुत्रीच्या कंबरेत मारलं, तो सैंपाक टाकून दिला, पुन्हा सैंपाक केला, ब्राह्मणांना जेवू घातलं. कुत्रीला उष्टमाष्टं देखील घातलं नाही. सारा दिवस उपास पडला. रात्र झाली तेव्हा ती आपल्या नवऱ्याजवळ म्हणजे बैलाजवळ गेली, आणि आक्रोश करून रडू लागली.

बैलानं तिला कारण विचारलं. तशी म्हणाली, मी उपाशी आहे. आज मला अन्न नाही, पाणी नाही. खिरीच्या पातेल्यात सर्पानं गरळ टाकलं ते माझ्या दृष्टीस पडलं. ब्राह्मण मरतील म्हणून मी पातेल्यास जाऊन शिवले. माझ्या सुनेला राग आला. तिनं जळकं कोलीत घेऊन माझी कंबर मोडली. माझं सारं अंग दुखतं आहे. ह्याला मी काय करू? बैलानं तिला उत्तर दिलं, तू आदल्या जन्मी विटाळशीचा विटाळ घरात कालवलास, त्याचा संपर्क मला झाला. त्या दोषानं मी बैल झालो. आज माझ्या मुलानं मला नांगराला धरलं. तोंड बांधून मला मारलं. मी देखील आज उपाशीच आहे. त्याचं श्राद्ध फुकट गेलं. हे भाषण मुलानं ऐकलं. लागेच उठून बाहेर आला. बैलाला चारा घातला. कुत्रीला अन्न घातलं, दोघांना चांगलं पाणी प्यायला दिलं. मनात फार दु:खी झाला.

दुसरे दिवशी सकाळी उठला. घोर अरण्यात गेला. तिथं ऋषींचा मेळा पाहिला. त्यांना साष्टांग नमस्कार घातला. ऋषींनी त्याला प्रश्न केला, तू असा चिंताक्रांत का आहेस? मुलानं सांगितलं, माझ्या बापाला बैलाचा जन्म आला आहे आणि आईला कुत्रीचा जन्म आला आहे. त्यांना मोक्ष कसा मिळेल, ह्या चिंतेत मी पडलो आहे. कृपा करून मला उपाय सांगा.

तेव्हा त्याला ऋषींनी सांगितलं, तू ऋषिपंचमीचं व्रत कर! ते व्रत कसं करावं? भाद्रपदाचा महिना येतो, चांदण्या पाखांतली पंचमी येते. त्या दिवशी काय करावं? ऐन दुपारच्या वेळी नदीवर जावं. आघाड्याची प्रार्थना करावी. त्याच्या काष्ठानं दंतधावन करावं. आवळकाठी कुटून घ्यावी, तीळ वाटून घ्यावे, ते तेल केसाला लावावं, मग अंघोळ करावी. धुतलेली वस्त्र नेसावी. चांगल्या ठिकाणी जावं. अरुधंतीसह सप्तऋषींची पूजा करावी. असं सात वर्षं करावं शेवटी उद्यापन करावं. ह्या व्रतानं काय होतं? रजस्वलादोष नाहीसा होतो, पापापासून मुक्तता होते. नाना तीर्थाच्या स्नानाचं पुण्य लागतं. नाना प्रकारच्या दानाचं पुण्य लागतं, मनी इच्छिलं कार्य होतं. मुलानं ते व्रत केलं. त्याचं पुण्य आईबापांना दिलं.

त्या पुण्यानं काय झालं? रजोदोष नाहीसा झाला. आकाशातून विमान उतरलं. बैल होता तो सुंदर पुरुष झाला. कुत्री होती ती सुंदर स्त्री झाली. दोघं विमानात बसून स्वर्गास गेली. मुलाचा हेतू पूर्ण झाला, तसा तुमचा आमचा होवो. ही साठा उत्तराची कहाणी पांचा उत्तरी सुफल संपूर्ण.

Thursday, August 13, 2009

राष्ट्रध्वज फडकवण्याची नियमावली:-


*देशाच्या अस्मितेचे प्रतीक असलेला राष्ट्रध्वज तिरंगा राष्ट्रीय सण व अन्य महत्त्वपूर्ण दिवशी सन्मानपूर्वक फडकवला जातो. राष्ट्राचे प्रतीक असलेल्या राष्ट्रध्वजाला फडकावित असताना त्याचा कुठल्याही प्रकारे अवमान होणार नाही, यासाठी काही नियम करण्यात आले आहेत. केंद्रीय गृह मंत्रालयाच्या वतीने भारतीय राष्ट्रध्वज संहिता तयार करण्यात आली आहे. ध्वज संहितेबाबत नागरिकांमध्ये जागृती निर्माण व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.

*राष्ट्रीय ध्वजाबाबत संहिता तयार करण्यात आल्याचे खूप कमी नागरिकांना माहिती असते. संहितेनुसार महत्त्वाचे राष्ट्रीय कार्यक्रम, सांस्कृतिक व मैदानी खेळाच्या वेळी नागरिक कागदाचा झेंडा हातात घेऊन फडकवताना दिसतात. मात्र, कार्यक्रम झाल्यानंतर तेच झेंडे जमिनीवर इतरत्र फेकलेले दिसतात. ते टाळले पाहिजे. प्लॅस्टिकपासून तयार करण्यात आलेल्या झेंड्यांचा उपयोग करू नये.

*ध्वज संहितांनुसार जेव्हा राष्ट्रीय ध्वज फडकविला जातो तेव्हा त्याला सन्मानपूर्वक उच्च स्थान दिले पाहिजे. राष्ट्रीय ध्वज अशा जागेवर फडकवला पाहिजे की, तो सगळ्यांना दिसला पाहिजे. शासकीय इमारतीवर राष्ट्रध्वज फडकवण्याचा प्रथा आहे. रविवार व अन्य सुटीच्या दिवशीही सूर्योदयापासून ते सूर्यास्तापर्यंत ध्वज फडकवला गेलाच पाहिजे. प्रतिकूल हवामानातही ध्वज फडकवणे आवश्यक आहे.

*संहितेनुसार राष्ट्रध्वज नेहमी स्फूर्तीने फडकवला पाहिजे व आदरपूर्वक ध्वज हळूहळू उतरवला गेला पाहिजे. ध्वज फडकवताना व उतरवताना बिगूल वाजविलाच पाहिजे. ध्वज कुठल्याही इमारतीच्या खिडकी, बाल्कनी अथवा दर्शनी भागात आडवा व तिरपा फडकवताना ध्वजातील केशरी रंगांचा पट्टा हा वरच्या बाजूला हवा.

*राष्ट्रध्वज सभेच्या वेळी फडकविताना अशा पद्धतीने फडकाविला गेला पाहिजे की, मान्यवराचे तोंड हे उपस्थिताकडे पाहिजे व ध्वज हा त्यांच्या डाव्या बाजूला पाहिजे. अथवा ध्वज भिंतीवर असेल तर मान्यवरांच्या मागे व भिंतीवर आडवा फडकाविला पाहिजे. कुठल्या पुतळ्याचे अनावरण असेल तर ध्वज सन्मानपूर्वक व वेगळ्या पद्धतीने फडकविला गेला पाहिजे. ध्वज गाडीवर लावताना गाडीच्या बॉनेटवर एक दंड उभा करावा व त्यावर फडकवावा.

*संहितेनुसार राष्ट्रीय ध्वज कुठल्या मिरवणूक किंवा परेडच्या व्यक्तीच्या उजव्या हातात ध्वज असावा. जर इतरही ध्वज असतील तर त्यांच्या मध्यभागी राष्ट्रध्वज असला पाहिजे. फाटलेला, मळलेला ध्वज फडकविला जाता कामा नये. कोणत्या व्यक्तीला अथवा वस्तूला वंदन करताना ध्वज जमिनीच्या दिशेने झुकवू नये. इतर ध्वजांची पताका अथवा ध्वज राष्ट्रध्वजापेक्षा उंच लावू नये.

*राष्ट्रध्वजाचा उपयोग वक्त्याचे व्यासपीठ झाकण्यासाठी अथवा ते सजविण्यासाठी करू नये. केशरी पट्टा जमिनीच्या बाजूने ठेवून ध्वज फडकविला जाऊ नये. तसेच राष्ट्रध्वजाला माती व पाण्याचा स्पर्श होऊ देऊ नये. ध्वज फडकविताना तो फाटणार नाही, अशा पद्धतीने बांधला पाहिजे.

*ध्वजाचा दुरुपयोग थांबविण्यासंदर्भात स्पष्ट दिशा ठरविण्यात आली आहे. त्यानुसार राजकीय व्यक्ती, केंद्रीय सैनिक दलाच्या संबंधित व्यक्तीच्या अंत्ययात्रेव्यतिरिक्त इतरत्र कोठेही त्याचा उपयोग करू नये. ध्वज कुठलेही वाहन, रेल्वे, जहाजावर लावला जाऊ शकत नाही.

*ध्वजाचा उपयोग घराच्या पडद्यासाठी करू नये. कुठलाही पेहराव करताना ध्वजाचे कापड घेता येणार नाही. तसेच राष्ट्रध्वज गादी, रुमाल अथवा नॅपकीनवर काढू नये. राष्ट्रध्वजावर कुठेलीही लिखाण केले जात नाही किंवा त्यावर कुठलीही जाहिरात केली जात नाही. ध्वज ज्या खांबावर फडकविला जातो त्यावरही जाहिरात लावता येणार नाही.

*केवळ प्रजासत्ताक दिन व स्वातंत्र्य दिन याच दिवशी ध्वज फुलांच्या पाकळ्या ठेवून फडकविला जातो. राष्ट्रीय ध्वज फडकवताना अथवा उतरवताना उपस्थित नागरिक कवायतीच्या सावधान स्थितीत पाहिजेत. शासकीय पोषाखात असलेले सरकारी अधिकारी ध्वजाला मानवंदना देतील. जेव्हा ध्वज सैन्याच्या तुकडीतील जवानाच्या हातात असेल व तो सावधान स्थितीत उभा राहिल. सरकारी अधिकार्‍यांच्या जवळून ध्वज जात असताना त्यांनी ध्वजाला सन्मानपूर्वक मानवंदना दिली पाहिजे. आदरणीय व्यक्ती डोक्यावर टोपी न घालताही राष्ट्रध्वजाला मानवंदना देऊ शकतात.

Tuesday, August 4, 2009

नारळी पौर्णिमा:-

समुद्राकाठी रहाणार्‍या व प्रामुख्याने मासेमारी करणार्‍या कोळी लोकांचा हा महत्त्वाचा सण आहे. पावसाळ्यात समुद्र प्रचंड खवळलेला असतो. बोटी, जहाजांची वर्दळ या काळात बंद असते. समुद्राचा कोप होऊ नये, जहाजे, नौका सुरक्षित रहाव्यात, समुद्र शांत होण्यासाठी कोळी बांधव या दिवशी समुद्राची पूजा करतात. पूजेसाठी समुद्राला यथाशक्तीप्रमाणे सोन्याचा नारळ अथवा नारळ अर्पण करत असतात. म्हणून या सणाला नारळी पौर्णिमा असे म्हणतात. याद‍िवशी कोळी लोक आपल्या होळ्या घेऊन मासेमारी करण्यासाठी समुद्रात जातात.

श्रावणातील ही पौर्णिमा ही समुद्र किनार्‍यालगत राहणार्‍या लोकांना मोठी आनंदाची असते. खवळलेला समुद्र शांत होतो, पावसाचा जोर ओसरतो व कोळी बांधव मासेमारीस प्रारंभ करतात. सुरक्षिततेची समुद्र देवाला प्रार्थना केली जाते. या सणाला नारळाचे गोड पदार्थ यार केले जातात. भारताला सुमारे 1517 कि.मी. लांबीचा व महाराष्ट्राला सुमारे 720 कि.मी. लांबीचा समुद्रकिनारा लाभला आहे.

रक्षाबंधनाचे महत्त्व:-

रक्षाबंधन व नारळी पौर्णिमा हे दोन पवित्र सण एकाच दिवशी साजरे करण्यात येतात. प्राचीन व महाभारतकालीन ग्रंथातही या सणाचा संदर्भ सापडतो. देव व असुर यांच्यातील संघर्षात देवांचा जय झाल्यानंतर या सणास सुरूवात झाल्याचेही मानण्यात येते. दंतकथेनुसार देव व असुर यांच्यातील युद्धात देवांची पीछेहाट होत असलेली बघून देवराज इंद्र यांनी युद्धात भाग घेण्याचा निर्णय घेतला. इंद्राची पत्नी इंद्राणीने त्याच्या हातात रक्षाबंधन केले. यामुळे त्यांना युद्धात विजय प्राप्त झाला. पुराणांनुसार श्रावण पौर्णिमेस पुरोहितांनी दिलेले आशीर्वाद पवित्र मानले जातात.

या सणांस धर्मबंधनाचे स्वरूपही आहे. मध्ययुगीन भारतात बाहेरील आक्रमकांपासून महिलांचे सरंक्षण करण्यासाठी हा सण साजरा करण्यात येत होता. तेव्हापासून भावाच्या मनगटावर राखी बांधण्याच्या पवित्र संस्कृतीस सुरूवात झाली. महाराष्ट्रात नारळी पौर्णिमा म्हणून प्रचलित असलेल्या ह्या सणाच्या दिवशी पर्जन्यदेवता वरूण राजाची आराधना करण्यात येते.

या पवित्र दिवशी बहीण भावास अक्षता लावून ओवाळते व राखी बांधते. भाऊही आपल्या लाडक्या बहिणीस दागिने, कपडे यासारख्या भेटवस्तू देतात. रक्षाबंधनास सलोनो नावानेही ओळखले जाते. श्रावण पौर्णिमेच्या दिवशी पवित्र नदी किंवा तळ्यात स्नान करून सूर्यदेवास अर्घ्यदान करण्यात येते. गावानजीक नदी नसल्यास विहिरींवरही ही पूजा केली जाते. ब्राह्मण या दिवशी जुन्या जानव्याचा त्याग करून नवीन जानवे धारण करतात. श्रावण महिन्यातील पौर्णिमेस श्रावण नक्षत्र असल्यास त्यास अनुकूल व लाभदायक मानण्यात येते.

आश्विनीपासून रेवतीपर्यंत 27 नक्षत्रात श्रावण नक्षत्राचा क्रम बावीसावा आहे. या नक्षत्राचा स्वामी चंद्र आहे. श्रावण महिन्यातील अंतिम तिथीस येणार्‍या श्रवण नक्ष‍त्राच्या पौर्णिमेस म्हणूनच श्रावणी म्हणण्यात येते. या दिवशीच रक्षाबंधनाचा सण साजरा करण्यात येतो.

श्रावण आणि रक्षाबंधन;-
'श्रवण' नक्षत्रात बांधला जाणारे रक्षासूत्र अमरत्त्व, निर्भरता, स्वाभिमान, कीर्ति, उत्साह तसेच स्फूर्ती प्रदान करणारे आहे. पौराणिक काळात पत्नी पतीच्या सौभाग्यासाठी रक्षासूत्र बांधत असे. मा‍त्र, परंपरेत बदल घडून बहिण-भाऊ यांच्यातील निस्सिम प्रेमाचे प्रतीक म्हणून रक्षाबंधन हा उत्सव मोठ्या उत्सवात साजरा केला जातो.

ज्योतिषशास्त्रानुसार श्रावण मासचे नामकरण 'श्रवण' नक्षत्रावरून झाले आहे. तर श्रवण नक्षत्राचे नामकरण मातृ-पितृ भक्त श्रावणकुमारच्या नावावरून झाले आहे. श्रवण नक्षत्रात तीन तारे असतात. ते तीन चरणांची (विष्णूची वामनावतारातील तीन पद) प्रतीके आहेत. याचप्रमाणे अभिजीत नक्षत्र दशरथ राजा यांचे प्रतीक आहे.

उत्तरा भाद्रपद नक्षत्र स्त्री-पुरुषांची जोडी असून श्रावणकुमारचे आई-वडील आहेत. उत्तराषाढ नक्षत्र हे दशरथ राजाचे व्यासपीठ असून पूर्वाभाद्रपदावर श्रावणकुमार आपल्या आई-वडीलांसोबत स्थानबध्द झाले आहेत.

श्रावण महिन्यात सूर्य कर्क राशीत प्रवेश करत असतो. कर्क राशी ही जलचर राशी आहे. दशरथ राजाने श्रावणी पौर्णिमेला आपल्या पापाचे प्रायश्चित घेतले होते. त्याचप्रकारे पृथ्वीवरील लोक श्रावण मासात अधिक कर्मकांड करताना दिसतात. श्रावण मास अध्ययन व अध्यापनासाठी श्रेष्ठ मानला जातो. 28 नक्षत्रांमध्ये श्रावणाने विशेष महत्त्व प्राप्त केले आहे. श्रावण नक्षत्रात ज्यांचा जन्म होतो, ते स्वभावाने पराक्रमी, स्वाभिमानी, सहनशील, स्पष्टवादी व सेवाभावी असतात. तसेच ते चांगली प्रगती साधतात. परंतु शत्रूच्या भी‍ती पोटी चांगले कार्य अर्ध्यातून सोडून देत असतात.

रक्षासूत्र व श्रवण नक्षत्र यांचाही संबंध आहे. मोहरी, केशर, चंदन, अक्षदा, दूर्वा, सूवर्ण आदी कापडात बांधून ते पुरुषांच्या उजव्या व महिलांच्या डाव्या हातावर बांधून रक्षाबंधन पूर्वी केले जात होते. मात्र काळानुरूप परंपरेत परिवर्तन घडून आल्याने रक्षाबंधन भाऊ-बहिणीचा उत्सव झाला आहे. या दिवशी बहिण भावाच्या उजव्या हातावर राखी बांधून भावाच्या रक्षणासाठी प्रार्थना करते मात्र त्यासोबत त्याच्यावर असलेल्या कर्तव्यांची जाणीव ही करून देत असते.

Sunday, August 2, 2009

कहाणी श्रावण महिन्यातील:-

*कहाणी सोमवारची फसकीची:-
ऐका महादेवा, तुमची कहाणी. आटपाट नगर होतं, त्यांत गरीब सवा‍शीण बाई रहात असे. तिनं आपलं श्रावणमास आला, म्हणजे काय करावं? दर सोमवारी पहाटेस उठावं, स्नान करावं, पूजा घ्याव. एक उपडा दुसरा उताणा पसाभार तांदूळ घ्यावे व महादेवाच्या देवळी जाऊन मनोभावं पूजा करावी, नंतर प्रार्थनेच्या वेळी 'जय महादेवा, घे फसकी व दे लक्ष्मी,' असं म्हणून महादेवाच्या मस्तकी तांदूळ अर्पण करावे. उरले तांदूळ नंदीच्या पाठीवर वाहून आपण घरी यावं.
असं चारी सोमवारी तिनं केलं. शठकर तिला प्रसन्न झाला. दिवसोंदिवस ती श्रीमंत झाली. मनामध्ये समाधान पावली. पुढं उद्यापनाचे वेळी तिनं देवी अन्नपूर्णेला गजनीची चोळी पाठविली, काशीविश्वेश्वराला रुपया पाठविला. आणि आपल्या व्रताची समाप्ति केली. शंकरांनी तिला निरोप पाठविला- अजून तुल नंदीच्या सेवेचं फळ मिळालं नाही. माझ्या सेवेचं तर अद्याप देणंच आहे. पुढं शंकरांनी तिला अपार देणं दिलं. तर जसा तिला विश्वेश्वर प्रसन्न झाला. तसा तुम्हां आम्हां होवो. ही साठां उत्तरांची कहाणी पांचा उत्तरी सुफळ संपूर्ण.