I made this widget at MyFlashFetish.com.

Thursday, March 22, 2012

शालिवाहन शक म्हणजे काय?



हिंदू नववर्षाची आणि मराठी नववर्षाची सुरवात म्हणून गुढीपाडवा साजरा केला जातो. गुढी पाडव्याच्याच दिवशी ब्रह्मदेवाने सृष्टीची रचना केली. विक्रम संवत याच दिवशी सुरू झाले, आणि शालिवाहन शकही याच दिवशी सुरू झाले. मराठी नववर्षाचा प्रारंभ हाच दिवस मानला जातो. पण ज्या शालिवाहनाच्या नावाने हे शक सुरू झाले, त्याविषयी मात्र, आपल्याला फारशी माहिती नसते.



शालिवाहन हे शक सातवाहन राजांशी संबंधित आहे. सातवाहनांची राजधानी तत्कालीन प्रतिष्ठान आणि आताचे पैठण ही होती. या सातवाहन राजांनी दीर्घकाळ महाराष्ट्र व शेजारील प्रदेशावर राज्य केले. इसवी सनाच्या पहिल्या शतकात शकांनी पश्चिम भारतावर आक्रमण करून सातवाहनांची या प्रदेशावरची सत्ता उखडून टाकली. त्यामुळे महाराष्ट्र, व शेजारील प्रदेशावरील सातवाहनांचे वर्चस्व संपले आणि त्यांना दक्षिणेत जावे लागले.



याच सातवाहन घराण्यातील गौतमीपुत्र सातकर्णी हा तेवीसावा राजा अतिशय पराक्रमी होता. त्याच्या पित्याचे नाव शिवस्वाती व आईचे नाव गौतमी बलश्री असे होते. सातवाहन राजांमध्ये मातृसत्ताक पद्धत होती. त्यामुळे राजे आपल्या नावापुढे आईचे नाव लावित असत. गौतमी ही सातकर्णीची आई होती. म्हणूनच त्याचे नाव गौतमीपुत्र सातकर्णी असे होते. नाशिकजवळ गोवर्धन येथे सातकर्णी व शकांमध्ये तुंबळ लढाई झाली. यात शकांचा राजा नहपान हा मृत्युमुखी पडला. सातकर्णी विजयी झाला. त्याने या प्रदेशात पुन्हा एकदा सातवाहनांचे वर्चस्व प्रस्थापित केले.



नाशिकजवळ बौद्धलेणी आहेत. या लेण्यांमध्ये सातकर्णीविषयीची माहिती मिळते. सातकर्णी याचा उल्लेख येथील लेखांत वेदांचा व ब्राह्मणांचा आश्रयदाता असा केला आहे. सातकर्णी वैदिक धर्माचा पोषक असूनही तो अत्यंत धार्मिक व सहिष्णू होता. बौद्ध धर्माच्या बाबतीत तो अतिशय उदार होता. बौद्धांच्या तत्कालीन संघांना त्याने बरीच मदतही केली होती. मुंबईजवळील कार्ले येथी बौद्ध संघालाही त्याने करजक नावाचे गाव दिले होते.



शकांचे दमन करणारा शालिवाहन (सातवाहन) गौतमीपुत्र सातकर्णी असा त्याचा उल्लेख सापडतो. त्यामुळे शालिवाहन शकाचा प्रारंभ त्याच्या जीवनकाळात झाला. त्याचा कार्यकाळ इसवी सन १०६-१३० असा मानला जातो. इसवी सन ७८ पासून हे शालिवाहन शक सुरू झाले. पण गौतमीपुत्र सातकर्णीच्या शासनकाळाशी ही तिथी जुळत नाही. त्यामुळे त्याच्या जन्मापासून हे संवत सुरू झाल्याचे मानले जाते.






शक संवत- शंक संवताचा आरंभ ३ मार्च ७८ रोजी झाला. सम्राट कनिष्काने हे संवत सुरू केले. या दिवशी तो सिंहासनारूढ झाला. कनिष्क हा कुषाण राजा होता. त्याने शकांवर दीर्घकाळ राज्य केले. पण त्याच्या मृत्यूनंतर हे शक संवत म्हणून प्रसिद्ध झाले. याचे कारण म्हणजे कनिष्कानंतर शकांनी बराच काळ सत्ता गाजवली. त्यांनीही हेच संवत शक संवत म्हणून वापरले. त्यामुळे कनिष्क संवतलाच शक संवत म्हटले जाऊ लागले.



विक्रम संवत- भारतीय कालगणनेनुसार कल्प, मन्वंतर आणि युगानंतर संवत्सराचे नाव येते. नवीन संवत चालविण्याच्या शास्त्रीय विधी या आहेत ज्या शासकाला आपल्या महान कर्म किंवा विजयाची स्मृतीत आपले संवत प्रारंभ करावयाचे असेल तर त्याच्या पूर्वी आपल्या राज्याची संपूर्ण प्रजेचे ऋण त्याने अदा केले पाहिजे. भारताचे सर्वमान्य विक्रम संवत हे एकमेव राष्ट्रीय संवत आहे कारण सम्राट विक्रमादित्याने शास्त्रीय विधीचे पालन करून सवंत आरंभ केले होते.
गुढीपाडवा, गुढी, पाडवा, नववर्ष, शालिवाहन शक