
निश्चयाचा महामेरु....
निश्चयाचा महामेरु, बहुत जनांसी आधारु
अखंडस्थितीचा निर्धारु, श्रीमंत योगी
नरपती, हयपती, गजपती, गडपती, भूपती, जळपती
पुरंदर आणि शक्ती, पृष्ठभागी
यशवंत, किर्तीवंत, सामर्थ्यवंत, वरदवंत
पुण्यवंत, नीतीवंत, जाणता राजा
आचार शील, विचारशील, दानशील, धर्मशील
सर्वज्ञपणे सुशील, सकळांठायी
धीर उदार गंभीर, शूर क्रियेसी तत्पर
सावधपणे नृपवर, तुच्छ केले
देव धर्म गोब्राम्हण, करावया संरक्षण
हृदयस्थ झाला नारायण, प्रेरणा केली
या भूमंडळाचे ठायी, धर्मरक्षी ऐसा नाही
महाराष्ट्र धर्म राहिला काही, तुम्हा कारणे
कित्येक दुष्ट संहारिला, कित्येकांसी धाक सुटला
कित्येकांस आश्रय जाहला, शिवकल्याण राजा.
जय जय शिवराया:-
प्राणी मात्र झाले दुःखी, पाहता कोणी नाही सुखी
कठीण काळे, ओळखी धरीनात कोणी
माणसा खावया अन्न नाही, अंथरुण पांघरुण ते ही नाही
घर कराया सामुग्री नाही, विचार सुचेना काही
अखंड चिंतेच्या प्रवाही, पडले लोक
जय देव, जय देव, जय जय शिवराया
या, या अनन्य शरणां, आर्या ताराया
आर्यांच्या देशावरी म्लेच्छांचा घाला
आला आला सावध हो शिवभूपाला
सदगदीता भूमाता दे तुज हाकेला
करुणारव भेदूनी तव हृदय न का गेला
जय देव, जय देव, जय जय शिवराया
श्रीजगदंबा जी तव शुंभादीक भक्षी
दशमुख मर्दूनी ती श्रीरघुवर संरक्षी
ती पूता भूमाता, म्लेंच्छा ही छळता
तुजविण शिवराया तिज कोण दुजा त्राता
जय देव, जय देव, जय जय शिवराया
त्रस्त आम्ही दीन आम्ही, शरण तुला आलो
परवशतेच्या पाशी मरणोन्मुख झालो
साधुपरित्राणाया, दुष्कृती नाशाया
भगवन भगवदगीता सार्थ कराया या
जय देव, जय देव, जय जय शिवराया.
शिवरायांचा पाळणा:-
गुणी बाळ असा जागसि का रे वांया | नीज रे नीज शिवराया
अपरात्री प्रहर लोटला बाई | तरि डोळा लागत नाही ||
हा चालतसे चाळा एकच असला | तिळ उसंत नाही जिवाला ||
निजयावयाचा हरला सर्व उपाय | जागाच तरी शिवराय ||
चालेल जागता चटका
हा असाच घटका घटका
कुरवाळा किंवा हटका
का कष्टविसी तुझी सांवळी काया | नीज रे नीज शिवराया ||१ ||
ही शांत निजे बारा मावळ थेट | शिवनेरी जुन्नर पेठ ||
त्या निजल्या ना तशाच घाटाखाली | कोकणच्या चवदा ताली ||
ये भिववाया बागुल तो बघ बाळा | किति बाई काळा काळा ||
इकडे हे सिद्दीजवान
तो तिकडे अफझुलखान
पलिकडे मुलूख मैदान
हे आले रे तुला बाळ धराया | नीज रे नीज शिवराया || २ ||
No comments:
Post a Comment