I made this widget at MyFlashFetish.com.

Sunday, February 15, 2009

श्री गजानन महाराजांचे शेगाव:-


शेगावमधली ती भर उन्हाळ्यातील दुपार होती. रणरणतं ऊन आसमंतात व्यापलं होतं. तेवढ्यात एका वडाच्या झाडाखाली एक विचित्रसा वाटणारा पण तेजःपुंज तरुण फेकून दिलेल्या पत्रावळीवरील अन्नाची शीत वेचून खात होता. त्याच्या तोंडातून 'गण गण गणात बोते' असा नामघोष चालला होता. त्या नामघोषात त्या तरुणाला रणरणत्या उन्हाचंही काही वाटत नव्हतं. गजानन महाराजांच पहिलं दर्शन असं झालं. बंकटलाल आणि दामोदर या दोघा तरुणांनी महाराजांना प्रथम पाहिलं आणि त्यांच्या त्या विचित्र वागण्यापेक्षाही त्यांच्या चेहर्‍यावरच्या तेजस्वी भावानेच हे त्यांच्याकडे आकर्षित झाले.

हे कोणी दिव्य पुरूष आहेत, याची त्यांना खात्री पटली. म्हणून ते त्यांना गावात घेऊन आले. लोकही त्यांना पाहायला गर्दी करू लागले. त्यांना पंचपक्वान्न, कपडे, दागिने असे काही वाहायला लागले. महाराज निरिच्छपणे ते सगळं फेकून देत असत. त्यांच्या वागण्याचा अदमास कुणालाही येत नसे. ते कुठेही झोप. काहीही खात आणि कपडे घातले तर घातले नाही तर दिगंबरावस्थेतही ते असत.

जगापासून ते स्वतःला तोडण्याचा प्रयत्न करत असत. भौतिक जगतात त्यांचे मन अजिबात रमत नव्हते. पण त्यांच्या विक्षिप्तपणाआड एक अतिशय विद्वान दिव्य पुरूष लपला आहे, याची जाणीवही हळू हळू होऊ लागली. त्यांच्या वेदशास्त्रसंपन्नतेचा दाखला लोकांनाही मिळाला. त्यांची तपश्चर्याही मोठी असल्याची जाणीव लोकांना झाली. त्यांच्यातला योगीही दिसून आला. एवढेच नव्हे, तर प्राण्यांची भाषाही या अवलियाला येत होती, हेही लोकांना कळले.

त्यांची कीर्ती सगळीकडे पसरू लागल्यानंतर मोठमोठी मंडळी त्यांना भेटायला येऊ लागली. दस्तूरखुद्द लोकमान्य टिळकांनीही त्यांची भेट घेतली होती. अकोल्यात शिवजयंतीसंदर्भात झालेल्या एका सभेला, टिळकांबरोबर गजानन महाराजही व्यासपीठावर बसले होते. लोकमान्य आणि अमरावतीचे दादासाहेब खापर्ड्यांसमवेत ते अकोल्यातील प्रभू रामचंद्राच्या मंदिरात दर्शनालाही गेले होते. श्री वासुदेवानंद सरस्वतीही महाराजांना भेटायला शेगावला आले होते. शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रातील अनेक मंडळी महाराजांना भेटायला येऊ लागली.

सिद्ध योगी असल्याने अनेक चमत्कारही ते करत. अत्यंत कनवाळू असल्याने कुणाचं दुःख त्यांना पाहवत नसे. खरे तर त्यांच्याकडे येणारी गांजलेली मंडळी त्यांना पाहताच आपलं दुःख विसरून जात असत. महाराज त्यांना त्यांच्या दुःखावर उपाय सांगत असत. लोकांच्या दुःखा ची नस त्यांना चांगलीच कळलेली असे. त्यामुळे त्यांच्या सल्ल्याने त्या व्यक्तीचं भलं झाल्याशिवाय राहत नसे. त्यामुळे लोक भक्तिभावाने त्यांच्याकडे येत.

महाराजांची कीर्ती पुढे वाढतच गेली. विदर्भात तर घरांघरांत ते माहीत होते. पण उर्वरित महाराष्ट्रात आणि शेजारच्या राज्यातही त्यांची कीर्ती वाढत गेली. विदर्भात तर महाराजांना नैवेद्य दाखविल्याशिवाय न जेवणारी मंडळी आजही आहेत. अनेकांनी त्यांना आपले गुरू मानले व त्यांची पूजा सुरू केली. महाराष्ट्रभर त्यांची मंदिरं स्थापली गेली.

महाराजांची कीर्ती वाढत गेल्यानंतर त्यांनी स्वतःच आपल्या शिष्यांना ट्रस्ट स्थापन करायला सांगितला. त्यानंतर मग गजानन महाराज संस्थान या नावाने १९०८ मध्ये ट्रस्ट स्थापन झाला. या ट्रस्टच्या माध्यमातून अनेक सामाजिक कामे केली जाऊ लागली. हे कार्य आजही चालू आहे. हिंदूच्या अनेक धर्मस्थळी या ट्रस्टच्या उत्तम सुविधा असलेल्या धर्मशाळा आहेत.

हे सगळं करत असताना महाराजांचे भौतिक जगातील लक्ष उडून गेले होते. एके दिवशी त्यांनी पंढरपूरला आषाढी एकादशीला समाधी घेण्याच निर्णय जाहीर केला. त्यांच्या या निर्णयाने भक्तांना मोठा धक्का बसला. दुःखाची एक लाटच पसरली. भक्तांनी त्यांना समजविण्याचा खूप प्रयत्न केला. पण महाराज निर्णयावर ठाम होते. त्यांनी समाधीपूर्वी दीड महिना आधी आपल्या मृत्यूचा दिवस आणि वेळ सांगितली होती. शिवाय आपली समाधी कुठे बांधावी हेही सांगितले होते.

त्यानुसार भाद्रपद शुद्ध पंचमीचा अर्थात ऋषी पंचमी, शके १८३२, गुरुवार दिनांक ८ सप्टेंबर १९१० रोजीचा तो दिवस उजाडला. या दिवसावरच एक काळे सावट होते. दुःखाची सावली जणू पडली होती. ठरवल्याप्रमाणे महाराजांनी या दिवशी समाधी घेतली आणि अवघ्या महाराष्ट्राच्या दुःखाला पारावर उरला नाही. भक्तांना सैरभैर झाल्यासारखं झालं. जीवनात जणू 'राम' राहिला नाही, असं वाटलं. कारण एक चैतन्य अनंतात विलीन झालं होतं. त्यांच्या समाधीच्या दर्शनासाठी भक्तांचा जणू सागर शेगावात उसळला. भक्तच काय पण महाराजांचं ज्या पशूपक्ष्यांवर प्रेम होतं, तेही रडत असल्याचे सांगितले जाते.

पण तिकडे महाराजांच्या मुखावर मात्र नेहमीचंच हास्य होतं. निर्वाणाला गेलेल्या अवलियाने जाताना मात्र सगळ्यांना सुखाचा समाधानाचा आणि मुक्तीचा मंत्र सांगितला होता. हा मंत्र होता,
अर्थातच 'गण गण गणात बोते. गण गण गणात बोते.'
जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती असे म्हटलेच जाते. शेगावचे श्री गजानन महाराजही त्यातलेच एक. शेगाव येथे त्यांचे समाधी मंदिर आहे.

श्री गजानन महाराज दिगंबर वृत्तीचे सिद्ध कोटीचे साधू होते. मिळेल ते खाणे, मिळेल त्या जागी राहणे, नेहमी भ्रमण करणे अशी त्यांची नित्याचीच दिनचर्या होती. त्यांच्या मुखात परमेश्वराचेच नामस्मरण, भजन असायचे.

भक्तांची संकटे दूर करून त्यांना परमेश्वराचे दर्शन घडवून देण्याचे शेकडो उदाहरणे त्यांच्या चरित्रात सामील आहेत. महाराष्ट्रातील प्रमुख तीर्थस्थानांमध्ये गणले जाणारे शेगाव स्थित गजानन महाराजांच्या मंदिरात दर्शनासाठी नेहमीच भाविक गर्दी करतात.

कसे पोहचाल?
महाराष्ट्राच्या बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव, सेंट्रल रेल्वेच्या मुंबई-नागपूर मार्गावर आहे. गीतांजली एक्सप्रेस सोडून इतर सर्व रेल्वेगाड्या येथे थांबतात. स्टेशनच्या बाहेरून मंदिरापर्यंत पायी गेल्यास फक्त 15 मिनिटाचा रस्ता आहे.

स्टेशनपासून मंदिरापर्यंत येण्या-जाण्यास मोफत बससेवा उपलब्ध आहे. महाराष्ट्रातून येथे 172 बस येतात. त्या व्यतिरिक्त देवास-उज्जैन, पैठण, पंढरपूर या स्थानकांहूनही बस चालतात.


श्री गजानन महाराजांचे मंदिर शहराच्या मधोमध स्थित आहे. मंदिराच्या महाद्वाराच्या खिडक्या रात्रभर उघड्याच असतात. श्रींची समाधी मंदिराच्या गुहेत आहे. मंदिर परिसरात वर्षभर भजन आणि प्रवचन असते. रोज सकाळी पाच वाजेपासून रात्री 9.30 पर्यंत पूजा-अर्चना विधिवत चालते. काकड आरती ते शयन आरतीपर्यंत नियमित रूपाने विविध कार्यक्रम चालतात.

प्रमुख उत्सव:-
श्री गजानन महाराजांचा प्रकट दिवस (फेब्रुवारी महिन्यात) तसेच त्यांची पुण्यतिथी (ऋषी पंचमीला) हे येथील प्रमुख उत्सव आहेत. त्यावेळी येथे रोषणाई केली जाते. श्रींची हत्ती, घोडा, रथ पालकी, दिंडी इत्यादींसोबत मिरवणूक निघते.

राहण्यासाठी व्यवस्था:-
भाविकांच्या सुविधेसाठी भव्य 'भक्त निवास' मंदिर परिसरातच बांधले आहे. त्याठिकाणी अगदी स्वस्तात खोल्या मिळतात. भाविक पाच दिवसांपेक्षा जास्त दिवस या खोल्यांमध्ये राहू शकत नाहीत. त्या ठिकाणी भोजन कक्षेचीही व्यवस्था आहे. सकाळी अकरा ते एक पर्यंत महाराजांचा प्रसाद दिला जातो. रोज येथे जवळपास पाच हजारांवर लोक जेवण करतात. या मंदिरात दररोज वीस हजार भाविक दर्शनासाठी येतात.

अन्य आकर्षण:-
शहराच्या झगमगाटापासून लांब असलेल्या शेगावात साधे आणि महाराष्ट्रातील ग्रामीण जीवनाच्या सहजतेची झलक पाहावयास मिळते. आध्यात्मिक शांतीच्या शोधात असणार्‍या भाविकांसाठी हे ठिकाण सर्वोत्तम आहे. मंदिराच्या परिसरातच धार्मिक वाचनालय असून भाविकांसाठी सतत खुले असते. जवळच 'गजानन वाटिका' नावाचे सुंदर उद्यान आणि एक प्राणी संग्रहालय देखील आहे.

1 comment:

Unknown said...

Mr Ajay..

Hi Khup Mahawatwachi Gost mala kalai ..

thank..x for this one..


Pravin Nikhar