I made this widget at MyFlashFetish.com.

Saturday, October 16, 2010

सोने लुटण्याच्या प्रथेमागची कथा:-

विजयादशमीच्या दिवशी आपट्याची पाने सोने म्हणून लुटण्याविषयी काही कथा आहेत. त्यावरून ही प्रथा कशी अस्तित्वात आली असावी यावर उजेड पडतो..... रामायणाच्या पंचम सर्गांत रघुवंशामध्ये दिलेली कथा अशी- पूर्वी पैठणमध्ये देवदत्त नावाच्या एका ब्राह्मणास कौत्स नावाचा मुलगा होता. तो सुशील होता. मौजीबंधनानंतर तो भडोच नावाच्या शहरी वरतंतू ऋ‍षीच्या घरी विद्यार्जनासाठी गेला. काही काळ लोटल्यावर कौत्स सर्व शास्त्रांत पारंगत झाला, गुरूला गुरुदक्षिणा देऊन त्यांच्या ऋणातून कसे मुक्त व्हावे असा विचार तो करू लागला.गुरूंचा निरोप घेताना त्याने अत्यंत कृतज्ञतापूर्वक त्याचे आभार मानून आपल्या आवडीचा काही पदार्थ असल्यास तो सांगावा, म्हणजे गुरुदक्षिणेदाखल तो आणून देईन असे त्याला सांगिलते. गुरूने उत्तर दिले:- ''कौत्सा, दक्षिणार्थ विद्या शिकविणे हे अनुचित कर्म आहे. शिष्य विद्वान् झालेला पाहून गुरुस जो आनंद प्राप्त होतो तीच गुरुदक्षिणा होय.'' परंतु कौत्सास गुरूच्या ऋणात राहणे न आवडून त्याने आग्रह धरला व पुन: पुन: मी तुम्हाला काय दक्षिणा देऊ? असे विचारू लागला. तेव्हा वरतंतू ऋषी म्हणाले, ''मी दक्षिणा घ्यावी असा तुझा आग्रहच असेल तर तुला शिकविलेल्या प्रत्येक विद्येबद्दल एक कोटी याप्रमाणे चौदा कोटी मुद्रा व त्याही एकाडूनच आणून दे.'' ही अट कौत्साने मान्य करून आपल्या विद्येच्या धीरावर तो तेथून बाहेर पडला, परंतु चौदा कोटी मुद्रा व त्याही एकाच इसमाकडून मिळविणे काही सोपे काम नव्हे हे त्याला लवकरच समजले. रघुराजा मोठा उदार व विद्वानांस आश्रय देणारा आहे असे त्याच्या कानावर येताच तो त्याच्याकडे गेला, परंतु त्या वेळी रघुराजाने विश्वजित् यज्ञ करून ब्राह्मणांकडून सर्व द्रव्यभंडार लुटविले होते, यामुळे त्यालाही अत्यंत गरीबी आलेली होती. कौत्साने त्याच्या एकंदर स्थितीचे सूक्ष्म निरीक्षण केल्यावर आपली इच्छा येथे सफल होणार नाही असे वाटून त्याला दु:ख झाले. रघुराजाने आपल्या द्वारी आलेल्या विद्वान् ब्राह्मणाचा योग्य सत्कार केला व त्याच्या आगमनाचे कारण विचारले. कौत्साने कारण सांगितले व तो पुढे म्हणाला, 'राजा, तुला प्राप्त झालेल्या स्थितीत माझी मनीषा सफल होण्याचा रंग दिसत नाही. तथापि त्याजबद्दल खंत वाटू न देता मला दुसरा दाता शोधून काढण्यासाठी जाऊ दे. हे कौत्साचे भाषण ऐकून राजा हसला. त्याने चौदा कोटी सुवर्ण मुद्रा तीन दिवसात देतो असे कौत्सास आश्वासन देऊन त्याला आपल्या घरी ठेवून घेतले. थकलेली बाकी वसूल करण्यासाठी इंद्राबरोबर लढण्याची तयारी चालविली. ही गोष्ट इंद्रास समजताच त्याने अयोध्या नगराबाहेर आपट्याच्या व शमीच्या झाडांवर कुबेराकडून सुवर्णमुद्रांचा वर्षांव करविला. रघुराजाने त्या सर्व कौत्सास दिल्या. त्याने त्या वरतंतू ऋषिपुढे ठेवून त्यांचा स्वीकार करण्याविषयी विनंती केली.परंतु त्याने फक्त 14 कोटी मुद्रा ठेवून घेऊन बाकीच्या कौत्यसास परत दिल्या. त्या त्याने रघुरराजास आणून दिल्या, पण तोही त्या घेईना. शेवटी त्याच आपट्याच्या व शमीच्या झाडाखाली त्या मुद्रांचा ढिग करून त्याने लोकांस त्या नेण्यास सांगितले. लोकांनी अनायासे श्रीमंत होण्याची ही संधी साधून त्या नगरीच्या सीमेबाहेर असलेल्या त्या झाडांची पूजा केली, सोने यथेच्छ लुटले व एकमेकांस देऊन आनंद व्यक्त केला. हा दिवस विजयादशमीचा होता. त्या वेळेपासून या झाडांची पूजा करून सुवर्णमुद्रांच्या ऐवजी या झाडांची पाने लुटण्याचा प्रघात प्रचारात आला.

शमीची पाने:- दसर्‍याच्या दिवशी शमीची पाने एकमेकांना प्रदान करू नयेत, तर ती पाने आपल्या वास्तूत ठेवावीत. यामुळे वास्तूतील वायूमंडल शुद्ध होण्यास मदत होते. शमी ही तेजतत्त्वरूपी आहे. ही तम-रजात्मक असल्याने तिच्यातून प्रक्षेपित होणारे तेजकण हे वातावरणात आगीची निर्मिती करतात. या सूक्ष्म ज्वाळांनी जिवाचा क्षात्रभाव जागृत होण्यास मदत होते. क्षात्रभाव हा आत्मशक्‍तीच्या बळावर जिवाला संस्कारात्मक अशा क्षात्रवृत्तीकडे नेतो. वनवासाला जातांना प्रभू श्रीरामचंद्रांनी शमीच्या झाडाच्या ढोलीत शस्त्रे ठेवली होती. शमीच्या खोडातून व पानांतून उत्पन्न होणार्‍या तेजतत्त्वरूपी धगीमुळे शस्त्रांतील सुप्‍त मारक शक्‍ती अखंड कार्यरत अवस्थेला राहू शकते. या वेळी प्रभू श्रीरामचंद्रांनी जरी शस्त्रे उतरवली, तरी त्यांनी या शस्त्रांच्या माध्यमातून मारक शक्‍ती दुर्जनांवर सोडून शमीपत्रांच्या साहाय्याने संपूर्ण ब्रह्मांडात मारक तत्त्वाचे कार्य केले. दसर्‍याच्या दिवशी श्रीरामाचे तारक, तर हनुमानाचे मारक तत्त्व कार्यरत असल्याने शमीपत्र हे ते ते तत्त्व आकृष्ट करून घेऊन ते वायूमंडलात प्रक्षेपित करण्याचे महत्त्वाचे कार्य करते.

आपट्याची पाने:- ही आप व तेज या कणांशी निगडित असल्याने शमीकडून प्रक्षेपित झालेल्या लहरी या आपट्याच्या पानांकडून ग्रहण केल्या जाऊन त्या आपतत्त्वाच्या बळावर प्रवाही बनवल्या जातात व जेव्हा या आपट्यांच्या पानांचे आदान-प्रदान होते, त्या वेळी हे तेजतत्त्वरूपी कण आपट्याच्या पानातून जिवाच्या तळहाताकडे संक्रमित होतात. यामुळे जिवाच्या हातावरील देवतांच्या स्थानांचे बिंदू कार्यरत होऊन त्या बिंदूतून ते ते आवश्यक तत्त्व जिवाच्या सूक्ष्मदेहापर्यंत आपकणांच्या साहाय्याने झिरपले जाते. या कारणास्तव शमीची पाने घरात ठेवून दसर्‍याच्या दिवशी वायूमंडलाची शुद्धी करावी व त्यानंतर आपट्याच्या पानांतून तेजतत्त्व एकमेकांना प्रदान करून ईश्‍वरी राज्य स्थापनेला लागणारा क्षात्रभाव जागृत अवस्थेत ठेवावा.

1 comment:

Anonymous said...

Thanks for this information.

Aaptyachi pane Talhatawar kaa thevtat he mahit navhate.

Thanks a lot again.

Priya.