I made this widget at MyFlashFetish.com.

Tuesday, July 28, 2009

मंगळागौरीचे व्रत:-

श्रावण महिन्याला शुद्ध आणि सात्विकतेचे आवरण आहे. म्हणूनच या महिन्यात अनेक सण समारंभ साजरे केले जातात. अगदी घरगुती सणांचाही हा महिना आहे. लग्न झालेल्या मुलींची मंगळागौर ही याच महिन्यातील मंगळवारी साजरी केली जाते. पूर्वजांनी अतिशय कल्पकतेने धार्मिकतेशी याचा संबंध जोडून महिलांच्या कला-गुणांना आणि मुख्य म्हणजे रिलॅक्स व्हायला या सणाची योजना केली आहे. रोजच्या कामाच्या धबडग्यात हरवलेल्या महिला मंगळागौरीच्या निमित्ताने धमाल करून तोपर्यंतचे कष्ट, श्रम विसरतात आणि ताज्यातवान्या होतात.

असे करतात मंगळागौरीचे व्रत:-
आता मंगळागौरीच्या व्रताविषयी माहिती घेऊ. नवीन लग्न झालेल्या मुली हे व्रत करतात. श्रावणातील चारी मंगळवारी देवी अन्नपूर्णेच्या मूर्तीची पूजा करायची असते. या पूजेसाठी पाच नवविवाहितांचीही गरज असते. या पूजा करणाऱ्या मुलींना वशेळ्या असे म्हटले जाते. या मुलींना काही वस्तूंचे वाण दिलं जातं. लग्न झाल्यापासून पुढील पाच वर्षे ही पूजा करायची असते. लग्न झाल्यावर पहिल्याच वर्षी माहेरी आणि सासरी एक मंगळवार धरून हीच पूजा मोठ्या समारंभपूर्वक केली जाते.

ही पूजा म्हणजे जणू अन्नपूर्णेचा सोहळा असतो. तिला उष्णोदकाने स्नान घातले जाते. नंतर तिला शृंगारण्यात येते. त्यासाठी वेगवेगळी फुले वाहिली जातात. त्याचबरोबर जाई, जुई, मोगरा, गुलाब अशा फुलझाडांच्या पत्रीही वाहिल्या जातात. अत्तर अन् काजळही लावले जाते. नंतर दागिने घातले जातात. या दागिन्यांचे वैशिष्ट्य म्हणजे ते धातूचे अथवा मण्यांचे नसतात. कणकेत हळद आणि तेल लावून तसेच घट्ट भिजवून दागिने तयार केले जातात. या दागिन्यांद्वारे देवीला शृंगारण्यात येते.

पूजेनंतर पिठाच्या किंवा पुरणाच्या दिव्यांनी आरती करतात. मंगळागौरीची कहाणी वाचतात. गोडधोडाचा नैवेद्य देवीला दाखवून भोजन केले जाते. दुपारनंतर देवीच्या पूजेच्या चौरंगावर सुशोभित मांडणी केली जाते. त्यासाठी सुगंधी फुले तसंच शोभेची पाने फुले वापरली जातात. त्यानंतर या देवीचे जागरण केले जाते. त्यासाठी आजूबाजूच्या मुली, बायका, नवविवाहिता यांना बोलावले जाते. या रात्री जेवत नाहीत त्याऐवजी फराळ केला जातो. म्हणजे भाजके अन्न ग्रहण करण्याची पद्धत आहे.

जागरणाची धमाल:-
फराळांनंतर देवीची आरती होते. आरतीनंतर पूजा करणार्‍या सुवासिनींनी नावे घेण्याची पद्धत आहे. रात्रभर फुगड्या, झिम्मा, पिंगा, बसफुगडी, टिपऱ्या खेळून रंगीत दोऱ्यांचा गोफ विणणे असे खेळ खेळले जातात. यासाठी एक लिंबू बाई दोन लिंबू झेलू, किस बाई किस दोडका किस यासारखी पारंपरिक गाणी म्हटली जातात. प्रामुख्याने ही गाणी माहेरचे वर्णन करणारी असतात. सासर आणि सासरच्या मंडळींना अनेक गाण्यांतून चांगले टोमणे लगावले जातात.

No comments: