I made this widget at MyFlashFetish.com.

Tuesday, March 24, 2009

गुढीपाडव्याचा गुढार्थ :-

चैत्र महिन्यातील शुक्ल प्रतिपदेला महाराष्ट्रात साजरा होणारा गुढीपाडवा साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानला जातो. शालिवाहन शकाचा प्रारंभ याच दिवसापासून होतो. शालिवाहन शक नावाच्या कुंभार समाजाच्या मुलाने याच दिवशी मातीचे सैनिक बनवून त्यावर पाणी शिंपडले आणि त्यांना सजीव बनविले. त्यांच्या मदतीने शत्रूंचा सामना केला. या विजयाच्या प्रित्यर्थ शालिवाहन शकाचा प्रारंभ झाला.

शालिवाहनाने मातीच्या सैन्यातही प्राणांचा संचार केला ही लाक्षणिक कथा आहे. त्यावेळी लोक चैतन्यहीन, पौरूषहीन आणि पराक्रमहीन बनले होते. त्यामुळे शत्रूसमोर त्यांचा टिकाव लागत नव्हता. मातीपासून निर्मित सैन्य विजयश्री कसे मिळवून देऊ शकते? पण शालिवाहनने त्या चैतन्यहीन लोकांमध्येही चैतन्यांचा संचार केला. पौरूष्य आणि पराक्रम जागविला आणि शत्रू पराजीत झाला.

आजच्या झोपलेल्या चैतन्यहीन समाजाला जागे करण्यासाठीही अशा शालिवाहनांची आवश्यकता आहे. मानवात ईश्वरीशक्ती आहेच. पण आवश्यकता आहे ती त्याला जागविण्याची. आजच्या दिवशी पुरूषार्थ गाजविणारा आणि पराक्रमी सांस्कृतिक वीरांचा समाज तयार करण्यासाठी सुरवात व्हायला हवी.

याच दिवशी श्री रामचंद्रांनी वालीच्या त्रासातून दक्षिणेच्या प्रजेला मुक्त केले होते. वालीच्या त्रासातून मुक्त झालेल्या प्रजेने घरोघरी उत्सव साजरा करीत गुढ्या उभारल्या होत्या. महाराष्ट्रात आजही घराच्या अंगणात गुढ्या उभारण्याची प्रथा प्रचलित आहे. त्यामुळेच या दिवसाला 'गुढीपाडवा' हे नाव मिळाले. घराच्या अंगणात उभारण्यात येणारी ही गुढी विजयाचा संदेश देते. गुढी म्हणजे विजयी पताका. भोगावर योगाचा विजय. विकासावर विचारांचा विजय. मंगलमय आणि पवित्र वातावरणात सतत प्रसारीत करणारी ही गुढी उभारणार्‍याला आत्मनिरिक्षण करून बघावयास हवे की माझे मन शांत, स्थिर आणि सात्विक बनले आहे की नाही?

मलबारमध्ये हा उत्सव विशिष्ट पध्दतीने साजरा केला जातो. घराच्या देवगृहात घरातील सर्व संपत्ती शोभेच्या वस्तू व्यवस्थित मांडून ठेवतात. या दिवशी सकाळी लवकर उठून डोळे उघडल्याबरोबर गृहलक्ष्मीसोबत प्रभूचे दर्शन घेतात. घरातील मुख्य व्यक्ती संपत्ती आणि ऐश्वर्य याने सुशोभित होऊन देवाची आरती करतात. मलबारमधील या प्रथेमागे भारतीय संस्कृतीची झलक दिसते. रोज सकाळी-सकाळी शुभ दर्शन करणार्‍याचा पूर्ण दिवस चांगला जातो असे आपम मानतो. मग वर्षारंभाच्याच दिवशी प्रभूचे दर्शन करणार्‍याचे वर्ष चांगलेच जाईल. यात आश्चर्य ते काय?

या दिवशी कडूलिंबाची पाने चावून खाल्ली जातात. मंदिरात दर्शन करणार्‍याला कडूलिंब आणि साखर प्रसादाच्या रूपात मिळते. कडूलिंब कडू असतो. पण आरोग्यासाठी लाभदायी असतो. त्याचे सेवन करणारा नेहमी निरोगी राहतो. काही विचार कितीही त्रासदायी असले तरी जीवनाला उदात्त बनवितात. अशात सुंदर, सात्विक विचारांचे सेवन करणार्‍यास मानसिक आणि बौध्दिक आरोग्य मिळते. त्याचे जीवन निरोगी बनते. प्रगतीच्या रस्त्यावर चालणार्‍याला जीवनात कितीदा तरी 'कडू घोट' प्यावे लागतात हे देखील यात दिसते.

मंदिरात मिळणार्‍या साखर आणि लिंबाच्या पानाच्या प्रसादामागे मधूर भावना असते. जीवनात सुख, दु:ख कधीच एकटे येत नाही. सुखामागे दु:ख आणि दु:खामागे सुख दडलेले असते. थोडक्यात हा उत्सव चैतन्यहीन मानवात चेतना भरून त्याच्या अस्मितेला जागृत करतो.

2 comments:

Anonymous said...

आवडले, माहीती नसलेली माहीती दिल्याबद्दल शतशः धन्यवाद

Vikram Joshi said...

माहितीबद्धल धन्यवाद ... काही प्रश्न..
गुढी म्हणजे नक्की काय? गुढी चे रूप (तांब्या, श्रीफळ, साडी, ई.) आज आपण पाहतो त्या रचनेमागे काही अर्थ अभिप्रेत आहे का?
तसेच गुडीपाडवा हा आजच्या स्वरुपात अखंडितपणे लोक उत्सव म्हणून कधी पासून सुरु झाला?